Stock Market Closing Bell | बाजारात विक्रीचा मारा! सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी उडाले | पुढारी

Stock Market Closing Bell | बाजारात विक्रीचा मारा! सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी उडाले

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आज बुधवारी चौफेर विक्रीचा मारा झाला. मुख्यतः मीडिया, PSU बँका आणि एनर्जी शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली. यामुळे आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ८०० अंक म्हणजेच १.१० टक्क्यांनी घसरून ७२,३०० च्या खाली व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स ७९० अंकांच्या घसरणीसह ७२,३०४ वर बंद झाला. तर निफ्टी २४७ अंकांच्या घसरणीसह २१,९५१ वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांची आजची घसरण प्रत्येक सुमारे १ टक्के होती. (Stock Market Closing Bell)

आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. ऑटो, ऑइल आणि गॅस, पॉवर आणि रियल्टी प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप १.८२ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक १.९४ टक्क्यांनी घसरला.

गुंतवणूकदारांना ६.२४ लाख कोटींचा फटका

आजच्या ट्रेडिंग सत्रात विक्रीचा मारा राहिला. यामुळे मिडकॅप, स्मॉलकॅप आणि मायक्रोकॅप निर्देशांक प्रत्येकी २ टक्क्यांच्या आसपास घसरले. यामुळे गुंतवणूकदारांना सुमारे ६.२४ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. कारण आज २८ फेब्रुवारी रोजी सर्व बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३८५.७५ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. जे मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी ३९१.९९ लाख कोटी रुपये होते.

सेन्सेक्स आज ७३,१६२ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७२,३०० पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, मारुती, इंडसइंड बँक, एम अँड एम, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स, टाटा स्टील, एशियन पेंट्स हे टॉप लूजर्स होते. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, टीसीएस शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली.

निफ्टी सलग आठ सत्रांमध्ये २२ हजारांच्या वर बंद झाला होता. यामुळे सकारात्मक कल सूचित झाला होता. पण निफ्टी आज बुधवारच्या व्यवहारात २२ हजारांच्या खाली आला. निफ्टीवर पॉवर ग्रिड, अपोलो हॉस्पिटल, आयशर मोटर्स, मारुती, इंडसइंड बँक ३ ते ४.६५ टक्क्यांदरम्यान घसरले. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, भारती एअरटेलमध्ये किरकोळ वाढ दिसून आली. निफ्टी ५० सह निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस प्रत्येकी १ टक्क्यांनी अधिक घसरले.

Paytm शेअर्समध्ये पुन्हा घसरण

दरम्यान, आजच्या ट्रेडमध्ये Paytm ची मूळ कंपनी One97 Communications चे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरून ४०६.१ रुपयांच्या लोअर सर्किटवर पोहोचले. विजय शेखर शर्मा यांनी Paytm पेमेंट्स बँकेचे अर्धवेळ नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि बोर्ड सदस्य म्हणून राजीनामा दिला आहे. दोन दिवसांच्या ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किट्सनंतर कालच्या व्यवहारात हा शेअर्स सपाट पातळीवर बंद झाला होता.

सेन्सेक्स, निफ्टी आणि स्मॉलकॅप्समधील घसरणीमागील प्रमुख घटक

गुंतवणुकीशी संबंधित जोखमींबाबत सेबी ॲक्शन मोडवर

स्मॉलकॅप आणि मिडकॅप फंडांमधील गुंतवणुकीशी संबंधित जोखमींबाबत बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंडांना गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त माहिती देण्यास सांगितले आहे; जेथे तरलता एक आव्हान असू शकते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अलीकडील वर्षात स्मॉलकॅप आणि मिडकॅप फंडांमध्ये मोठ्या गुंतवणुकीचा ओघ दिसून आला आहे. शेअर बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर या फंडांनी जोरदार परतावाही दिला आहे. पण म्युच्युअल फंडांना मोठ्या रिडमशनसाठी किती वेळ लागू शकतो, मोठ्या आउटफ्लोचा पोर्टफोलिओच्या मूल्यावर काय परिणाम होऊ शकतो आणि आउटफ्लोसाठी फंडाकडे किती रोख आणि लिक्विड ॲसेट आहे हे उघड करण्यास सांगितले आहे.

फेडकडून व्याजदर कपातीची शक्यता कमी

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून लवकर व्याजदरात कपातीची शक्यता कमी आहे. यामुळे ट्रेडर्सना जानेवारीच्या अमेरिकेच्या पर्सनल कन्झमशन एक्सपेंडिचर्स प्राइस इंडेक्स (पीसीई) डेटाची प्रतीक्षा लागली आहे. ज्यामुळे फेड व्याजदर वाढीवर परिणाम होऊ शकतो.

जागतिक बाजार

MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक ०.४४ टक्क्यांनी घसरून ५२५.४० अंकांवर आला. त्यानंतर तो ५२३ वर स्थिरावला. जपानचा बेंचमार्क निक्केई किरकोळ अंकांनी घसरला. तर हाँगकाँगमधील हँग सेंग १.५ टक्क्यांनी घसरला, तर शांघाय कंपोझिट १.९ टक्क्यांनी खाली आला.

प्रॉफिट बुकिंग

बाजारात प्रॉफिट बुकिंगचा मूड दिसून येत आहे. यामुळे घसरण पाहायला मिळत आहे. (Stock Market Closing Bell)

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

त्यात परदेशी संस्थात्मक गुंतणूकदारांनी (FII) मोठ्या प्रमाणात भारतीय शेअर्सची विक्री केली आहे. यामुळे बाजारात मोठी घसरण झाली आहे. FII ने या महिन्यात आतापर्यंत १७,६५० कोटी रुपयांच्या शेअर्सची निव्वळ विक्री केली आहे.

हे ही वाचा :

Back to top button