Stock Market Closing Bell | सलग पाचव्या सत्रांत तेजी, दिवसभरात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा | पुढारी

Stock Market Closing Bell | सलग पाचव्या सत्रांत तेजी, दिवसभरात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात सोमवारी सलग पाचव्या सत्रांत तेजी कायम राहिली. विशेषतः बेंचमार्क निर्देशांक निफ्टी ५० ने २२,१३५ अंकावर झेप घेत नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यानंतर निफ्टी ८१ अंकांच्या वाढीसह २२,१२२ वर स्थिरावला. तर सेन्सेक्स २८१ अंकांनी वाढून ७२,७०८ वर बंद झाला.

बाजारातील तेजीत FMCG आणि एनर्जी स्टॉक्स आघाडीवर राहिले. ऑटो, फार्मा आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रांमध्ये तेजी राहिली. क्षेत्रीय पातळीवर कॅपिटल गुड्स, मेटल आणि रियल्टी वगळता इतर सर्व निर्देशांकांनी हिरव्या रंगात व्यवहार केला. ऑटो, बँक, हेल्थकेअर, पॉवर ०.५-१ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.७ टक्क्यांनी वाढला.

सेन्सेक्स आज ७२,६२७ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७२,८८१ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, सन फार्मा, टायटन, मारुती, आयटीसी हे टॉप गेनर्स राहिले. तर विप्रो, एलटी, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स हे शेअर्स काही प्रमाणात घसरले.

निफ्टी आज २२,१०३ वर खुला झाला होता. त्यानंतर तो २२,१८६ पर्यंत वाढला. निफ्टीवर ग्रासीम, बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, सिप्ला, आयसीआयसीआय बँक हे २ ते ३ टक्क्यांदरम्यान वाढले. तर कोल इंडिया, विप्रो, एलटी, एसबीआय लाईफ, LTIMindtree हे शेअर्स घसरले.

Paytm ला दिलासा, शेअर्समध्ये वाढ

Paytm च्या शेअर्सला आज सोमवारी बाजार खुला होताच अप्पर सर्किट लागले. या शेअर्समध्ये सलग दोन ट्रेडिंग सत्रात तेजी राहिली आहे. पेटीएम पेमेंट बँकेवरील बंदीनंतर पेटीएमचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते. आता पेटीएम पेमेंटस् बँकवरील बंदी १५ दिवस पुढे ढकलली. ३१ जानेवारीच्या आदेशानुसार ठेवी स्वीकारणे, फास्टटॅग रिचार्ज करणे, वॉलेटमध्ये पैसे जमा करणे यांसारखे व्यवहार करण्यास पेटीएमवर २९ फेब्रुवारीनंतर बंदी घालण्यात आली होती. पण रिझर्व्ह बँकेनी ही बंदी मुदत १५ मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. या पार्श्वभूमीवर पेटीएम शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. (One97 Communications Share Price) आज हा शेअर्स एनएसईवर ५ टक्के वाढीसह ३५८.३५ रुपयांवर स्थिरावला.

LIC शेअर्सही तेजीत

१५ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाकडून २१,७४० कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड मिळाल्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चा शेअर्स BSE वर आजच्या ट्रेडमध्ये जवळपास ९ टक्क्यांनी वाढून १,१३० रुपयांवर पोहोचला होता. पण त्यानंतर हा शेअर्स १.०६० रुपयांच्या खाली आला. (LIC shares)

गुंतवणूकदार सलग पाचव्या सत्रांत मालामाल

बाजारातील आजच्या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १९ फेब्रुवारी रोजी ३९१.६८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याआधीच्या सत्रात १६ फेब्रुवारी रोजी ते ३८९.५३ लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ आज सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात २.१५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

हे ही वाचा :

 

Back to top button