रिव्हाइज्ड रिटर्न दाखल करताय?, तर ही माहिती वाचाच... | पुढारी

रिव्हाइज्ड रिटर्न दाखल करताय?, तर ही माहिती वाचाच...

अनिल विद्याधर

कोणत्याही असेसमेंट इअरसाठी आयटीआर दाखल करण्याची जी डेडलाईन असते, तीच रिव्हाइज्ड रिटर्न भरण्याचीदेखील शेवटचीच तारीख असते. प्रारंभी प्राप्तिकर विभागाचा मेल आपण काळजीपूर्वक वाचा. चूक समजून घेण्यासाठी आपला फॉर्म-16 आणि गुंतवणूक/बचत आणि अन्य सर्व कागदपत्रे आपल्याकडे ठेवा.

प्राप्तिकर विवरण दाखल करताना एखादी चूक झाल्यास कालांतराने प्राप्तिकर विभागाकडून मेल येतो. त्यानंतर रिव्हाइज्ड रिटर्न फाईल करावे लागते. इथेही शेवटची तारीख लक्षात ठेवावी लागते. आयटीआर भरताना आपल्याकडून किरकोळ चुका होऊ शकतात. या चुका आयटीआर भरताना लक्षात येत नाही. मात्र जेव्हा मेल मिळतो, तेव्हा रिव्हाइज्ड आयटीआर भरावा लागतो. आयटीआर पुन्हा कसे भरावे, यासंदर्भात इथे सांगता येईल. तत्पूर्वी काही मंडळींनी अद्याप आयटीआर भरलेले नसेल तर 31 डिसेंबरपर्यंत बिलेटेड आयटीआर भरण्यासाठी तातडीने हालचाल करावी. अन्यथा पेनल्टीची रक्कम वाढू शकते. जर डिसेंबरअखेरीस आयटीआर भरल्यास पाच हजारांचा दंड भरून सुटका होऊ शकते. मात्र त्यानंतर आयटीआर भरल्यास तो दंड 10 हजार रुपये बसू शकतो.

कोणत्याही असेसमेंट इअरसाठी आयटीआर दाखल करण्याची जी डेडलाईन असते, तीच रिव्हाइज्ड रिटर्न भरण्याची देखील शेवटचीच तारीख असते. प्रारंभी प्राप्तिकर विभागाचा मेल आपण काळजीपूर्वक वाचा. चूक समजून घेण्यासाठी आपला फॉर्म 16 आणि गुंतवणूक/बचत आणि अन्य सर्व कागदपत्रे आपल्याकडे ठेवा. त्यानंतर पुढीलप्रमाणे प्रक्रिया पार पाडा.
प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर जा.
तेथे उजव्या बाजूला रजिस्टर्ड यूजर दिसेल. त्याखाली ‘लॉगिन हिअर’वर क्लिक करा
त्यानंतर युजर आयडी (पॅन क्रमांक), पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.

आता वरच्या बाजूला निळ्या पट्टीत माय अकाऊंट दिसेल. त्याला क्लिक करा. याठिकाणी दुसरा पर्याय विव्ह इ फाइल्ड रिटन्स/फॉर्म्सवर क्लिक करा.

सिलेक्ट अ‍ॅन ऑप्शनमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न्सचा पर्याय निवडा. त्याखाली सबमिटवर क्लिक करा.
याठिकाणी जुने आयटीआर फॉर्म्स दिसतील. त्यापैकी चालू वर्षाचा फॉर्म निवडायचा आहे. त्याचा अकनॉलेजमेंट नंबरदेखील दिलेला असतो. त्याचा उल्लेख मेलमध्येदेखील केलेला असतो. त्या अकनॉलेजमेंट नंबरवर क्लिक करा.

आता पान उघडेल आणि ज्या दिवशी आपण आयटीआर भरला, ती तारीख दिसेल. ही तारीख लिहून घ्या. त्याचवेळी डाऊनलोड/स्टेटस डिस्क्रिप्शन लिहिलेले दिसेल. त्याखाली लिहिलेल्या आयटीआर/फॉर्मवर क्लिक करा.

आता आपल्याला जुना आयटीआर फॉर्म दिसेल. त्याची प्रिंट काढून ठेवा. त्यात चूक पाहा. ती चूक फॉर्म-16 आणि गुंतवणुकीच्या दुसर्‍या कागदपत्राशी पडताळून पाहा. चूक लक्षात आल्यास ती नोंदवून घ्या. जर चूक लक्षात येत नसेल तर कर सल्लागाराची मदत घ्या.

व्हेरिफाय करण्यास विसरू नका : रिव्हाइज्ड रिटर्न फाईल केल्यानंतर त्यास व्हेरिफाय करणे गरजेचे आहे. जर रिव्हाइज्ड रिटर्न व्हेरिफाय केले नाही तर प्राप्तिकर विभागाकडून हे रिटर्न मान्य होणार नाही. व्हेरिफिकेशनसाठी आधारचा ओटीपी हा चांगला पर्याय आहे. व्हेरिफिकेशनसाठी ओटीपीला क्लिक करा. त्यानंतर आधारच्या लिंकने मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी भरल्यानंतर कन्फर्मेशन मेसेज आपल्या मोबाईलवर येईल.

पुढे काय : रिव्हाइज्ड रिटर्नची प्राप्तिकर विभागाकडून तपासणी होर्सल. आपल्याकडून चुुकीची दुरुस्ती झाली असेल तर ती मान्य केली जाईल. जर चूक कायम राहिली तर प्राप्तिकर विभागाकडून पुन्हा एकदा मेल येईल आणि रिव्हाइज्ड रिटर्न फाईल करावा लागेल.

असे भरा रिव्हाइज्ड रिटर्न

जर चूक लक्षात आली असेल आणि तातडीने रिव्हाइज्ड आयटीआर भरायचा असेल, तर प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावरील निळ्या रंगाच्या पट्टीत लिहलेल्या ई-फाईलवर क्लिक करा. तेथे पहिला पर्याय इन्कम टॅक्स रिटर्नवर क्लिक करा.

आता असेसमेंट इअर निवडा. त्यानंतर आयटीआर फॉर्म नंबरमध्ये आयटीआर-1 वर सिलेक्ट करा. त्याखाली असलेल्या फायलिंग टाईपमध्ये ओरिजिनल/रिव्हाइज्ड रिटर्नवर क्लिक करा. आता त्याखाली सबमिशन मोडमध्ये प्रिपेअर अँड सबमिट ऑनलाईनवर क्लिक करा.

त्याखाली आपले बँक खात्याचा क्रमांक येईल. जर एकापेक्षा अधिक खाते असतील, तर ते खाते देखील दिसतील. सतत वापर होत असलेल्या खात्याची निवड करावी आणि खाली लिहलेल्या कंटिन्यूव्हवर क्लिक करा.

आता आपल्याला आयटीआर-1 फॉर्म दिसेल. त्यात पार्ट ए जनरल इन्फॉर्मेशनच्या टॅबमध्ये महत्त्वाची माहिती दिलेली असेल. याखाली आपल्याला फाईल्ड यू/एसचा पर्याय दिसेल. त्याखालच्या बॉक्सवर क्लिक करा. तेथे रिव्हाइज्ड रिटर्नवर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर खाली रिसिप्ट नंबर लिहावा लागेल. हा नंबर आपण चुकीने भरलेला आयटीआर फॉर्मचा अकनॉलेजमेंट नंबर असतो. तेथेच जुने आयटीआर भरलेली तारीख असते. तेथे क्लिक करताच कॅलेंडर दिसेल. तेथे आपल्याला जुन्या आयटीआर भरल्याचीच तारीख द्यावी लागेल. त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे आयटीआर भरता येईल.

Back to top button