जागतिक बाजारपेठेत भारतीय शेअर बाजाराचा डंका! हाँगकाँगला टाकले पिछाडीवर
पुढारी ऑनलाईन डेस्क : देशांतर्गत शेअर बाजारासाठी (Stock market)२०२३ हे वर्ष लक्षणीय आणि स्मरणीय ठरले आहे. जागतिक बाजारपेठेचा विचार करताभारतीय शेअर बाजाराने हाँगकाँगला पिछाडीवर टाकत सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे, असे 'वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्स्चेंज'च्या ( World Federation of Exchanges ) ताज्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.
भारतीय शेअर बाजाराची 2023 मध्ये 'विक्रमी' कामगिरी
यावर्षी BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी या निर्देशांकांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आता २०२३ वर्ष निरोप घेताना भारतीय शेअर बाजाराने हाँगकाँगला मागे टाकत बाजारमूल्याच्या बाबतीत जगातील सातव्या क्रमांकाचा शेअर बाजार बनला आहे.बाजार भांडवलाच्या बाबतीत भारताने आता आणखी एक पायरी वर केली आहे.
बाजार मूल्य कितीवर पोहचले?
काही दिवसांपूर्वीच BSE चे एकूण बाजारमूल्य प्रथमच ४ ट्रिलियन रुपयांवर पोहोचले होते. BSE निर्देशांक सेन्सेक्सने 70 हजारांचा आकडाही पार केला. त्याचवेळी निफ्टीनेही 21,031 चा सर्वकालीन उच्चांक देखील गाठला. NSE चे बाजारमूल्य 3.989 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे, तर हाँगकाँगचे बाजारमूल्य 3.984 ट्रिलियन डॉलरवर आहे.
निफ्टीमध्ये १६ टक्क्यांनी वाढ
निफ्टी या वर्षी 16 टक्क्यांनी वाढला आहे. सलग आठव्या वर्षी नफ्याचा आलेख वाढताच आहे. याउलट, हाँगकाँगचा बेंचमार्क निर्देशांक हँग सेंग इंडेक्स या वर्षी 17 टक्क्यांनी घसरला आहे. अशा स्थितीत भारताने यावर्षी एका क्रमवारीत पुढे जाण्यात यश मिळविले आहे.
देशांतर्गत गुंतवणूकदारांचा पाठिंबा
आशियाई क्षेत्रांच्या भाडवली बाजारपेठांचा विचार करता भारतीय बाजारपेठेलादेशांतर्गत गुंतवणूकदारांचा पाठिंबा मिळाल्याच दिसले. चलनवाढ आणि जीडीपीच्या सकारात्मक आकडेवारीसह रोखे उत्पन्नात घट यासारख्या घटकांमुळे बाजार तेजीत दिसत आहे. याशिवाय नुकत्याच पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हे आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्थिर सरकारचे संकेत देत असल्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसत असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा :

