ग्वार गम हे ग्वार वनस्पतीच्या एंडोस्पर्मपासून (सायमोप्सिस टेट्रागोनोलोबा) तयार केले जाते. ग्वार (गवार) हे शेंगांचे पीक आहे, जे वालुकामय जमिनीत चांगले वाढते आणि भरपूर सूर्यप्रकाशासह मध्यम, अधूनमधून पावसाची गरज असते. गवार बिया सोलून, बारीक करून गाळून ग्वार गमचे उत्पादन केले जाते.
ग्वार गमचा वापर अन्न, कापड, कागद, औषध आणि तेल उद्योगात मोठ्या प्रमाणात केला जातो. उच्च प्रतीचे रिफाईंड ग्वार गम खाद्य उद्योगात आइस्क्रीममध्ये स्टॅबिलायझर म्हणून, मीट बाईंडर म्हणून आणि चीज, इन्स्टट पुडिंग्ज आणि व्हीप्ड क्रीम पर्यायांसाठी स्टॅबिलायझर म्हणून वापरला जातो. कापड आणि कागदाचे उत्पादन, तेल विहीर ड्रिलिंगसह विविध उद्योगांत ग्वार गमचा वापर केला जातो. ग्वार गमला वायदा बाजारातील 'ट्रेंडिंग' कमोडिटी म्हणून ओळखले जाते.
देशात ग्वारचे सरासरी वार्षिक उत्पादन 50 लाख क्विंटल होते. राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात प्रामुख्याने हे पीक घेतले जाते. जगातील ग्वारच्या एकूण उत्पादनापैकी भारत 90 टक्के उत्पादन करतो. त्या उत्पादनापैकी 72 टक्के वाटा एकट्या राजस्थानचा आहे. वायदा बाजारात NCDEX ग्वार गम फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट सध्या 11,366 रुपयांच्या आसपास आहे. ग्वार आणि कमोडिटी बाजार यांचा खूप जवळचा संबंध असून ग्वार गम ट्रेंडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वॉल्यूम आणि तरलता (लिक्विडिटी) पाहायला मिळते. सरकारी धोरणे, हवामानाची स्थिती आणि प्रत्यक्षात उत्पादन याचा ग्वार गमच्या वायदा बाजारातील उलाढालीवर थेट परिणाम पाहायला मिळतो.
गवार बियाण्यापासून काढलेला ग्वार गम हा भारतातील सर्वात मूल्यवान कृषी निर्यात वस्तू बनला आहे. या पिकाची पेरणी साधारणपणे पावसाळ्यानंतर जुलैच्या उत्तरार्धापासून ते ऑगस्टच्या पहिल्या सहामाहीत केली जाते आणि ऑक्टोबरच्या उत्तरार्धात ते नोव्हेंबरच्या सुरुवातीस कापणी केली जाते. गवार हे नैसर्गिकरीत्या पावसावर अवलंबून असलेले पीक आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन आणि आफ्रिकेतही काही प्रमाणात हे पीक घेतले जाते.
भारत हा जगातील ग्वार गमचा एक प्रमुख निर्यातदार देश आहे. भारत विविध प्रकारची ग्वार उत्पादने मोठ्या संख्येने विविध देशांना निर्यात करतो. भारताने 2022-23 मध्ये 406,513.53 टन (MT) ग्वार गम निर्यात करून 4,944.60 कोटी (617.14 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) रुपये मिळवले. भारताने 2022-23 मध्ये प्रामुख्याने अमेरिका, जर्मनी, रशिया, नॉर्वे आणि नेदरलँड या देशांना ग्वार गमची निर्यात केली होती. त्यामुळे देशातील ग्वार गमच्या उत्पादनाचा कमोडीटी बाजारावर तत्काळ परिणाम पाहायला मिळतो.
ग्वार गमचा वापर कापड आणि अन्न प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात केला जातो. फार्मास्युटिकल, पेपर, टेक्स्टाईल आणि पर्सनल केअर इंडस्ट्रीजमध्येही ग्वार गमचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. शेल गॅस आणि तेल उद्योगाच्या विस्तारामुळे गमला सर्वाधिक मागणी आहे. 90 टक्के निर्यात तेल आणि शेल गॅस (शेल फॉर्मेशनमध्ये अडकलेला नैसर्गिक वायू) पिळून काढण्यासाठी वापरला जातो. शुद्ध आणि अशुद्ध ग्वार गम एक बहुमुखी आणि कार्यक्षम बायोपॉलिमर आहे, ज्याचा वापर ऑईल ड्रिलिंग, कापड छपाई, मानवी अन्न आणि पाळीव प्राण्यांचे अन्न, कागद, स्फोटके, पाणी प्रक्रिया इत्यादीसारख्या विस्तृत औद्योगिक प्रक्रियेत केला जातो.
(क्रमश:)