Gold standard : गुंतवणूक : कमोडिटीमधील ‘गोल्ड’ स्टँडर्ड ! | पुढारी

Gold standard : गुंतवणूक : कमोडिटीमधील ‘गोल्ड’ स्टँडर्ड !

अर्थपंडित

सोने ही जगातील सर्वात मौल्यवान वस्तूंपैकी एक आहे. जागतिक चलनांचे आधारभूत आर्थिक साधन म्हणून सोने ही सुरक्षित मालमत्ता मानली जाते. जगभरात सोन्याच्या किमतीतील चढ-उतार हा त्याचा पुरवठा-मागणी, सकल देशांतर्गत उत्पादन, महागाई, व्याजदर इत्यादी मूलभूत घटकांवर अवलंबून असतो.
जर बाजार अस्थिर किंवा मंदीचा असेल, तर धास्तावलेले गुंतवणूकदार सोन्यासारख्या मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक करतात. याउलट स्थिर जागतिक स्थितीत सोन्याच्या किमती घसरतात. कारण अशावेळी गुंतवणूकदारांना सोन्यातील गुंतवणुकीपेक्षा इतर मार्ग अधिक व्यवहार्य वाटू लागतात. जगभरात सोन्याच्या किमतीतील चढ-उतार हा त्याचा पुरवठा-मागणी, सकल देशांतर्गत उत्पादन, महागाई, व्याजदर इत्यादी मूलभूत घटकांवर अवलंबून असतो. कमोडिटी मार्केटमधील फ्युचर्स आणि ऑप्शन्स वापरून सोन्यामध्ये खरेदी-विक्री केली जाऊ शकते किंवा एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ETF) द्वारे व्यापार केला जाऊ शकतो.

फ्युचर्स आणि ऑप्शन्स

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) ही भारतातील सर्वात मोठी आणि जगातील सहाव्या क्रमांकाची कमोडिटी एक्स्चेंज मार्केट आहे. मुंबईमध्ये स्थित एक्स्चेंजमध्ये सोने ही सर्वात जास्त खरेदी-विक्री होणारी कमोडिटी आहे. देशात 2003 मध्ये जेव्हा  चउद आणि  NCDEX सारखे राष्ट्रीयीकृत कमोडिटी एक्स्चेंज अस्तित्वात आले, तेव्हा सुरुवातीला सोन्याच्या केवळ फ्युचर्स ट्रेडिंगला परवानगी होती. MCX वर ट्रेडिंगसाठी सोन्याच्या फ्युचर्सचे चार प्रकार आहेत. त्यामध्ये गोल्ड 1 किलो, गोल्ड मिनी (100 Gms), गोल्ड गिनी (8 Gms), आणि गोल्ड पेटल (1 Gm)यांचा समावेश आहे. 28 सप्टेंबर 2015 रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने ट्रेडिंगमध्ये ऑप्शन्सचा समावेश करून कमोडिटी मार्केट इको-सिस्टम मजबूत केली.  2017 मध्ये, MCX ने सेबीकडून मान्यता मिळवल्यानंतर सोन्याचे ऑप्शन्स ट्रेडिंग सुरू केली आणि नंतर बुलियन इंडेक्स, BULLDEX लाँच केले गेले. ज्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना  गुंतवणूक आणि ट्रेडिंगचे व्यापक पर्याय उपलब्ध झाले.

पुढील दोन वर्षे सोने दरात तेजीची शक्यता

जागतिक बाजारपेठेत सोन्याची झळाळी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर आता इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याची चमक वाढत आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, चीनमधील किमती, तैवानमध्ये सोने आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहचले होते. अस्थिर आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सोन्याच्या किमतीने आतापर्यंतची सर्वोच्च पातळी म्हणजेच प्रति औंस 3,159 ची पातळी गाठली. आंतराष्ट्रीय जाणकारांच्या मते, पुढील दोन वर्षे सोने दरात तेजी राहणार आहे.

 सर्वकालिक उच्चांकावर सोने

मागील महिन्यात ऑस्ट्रेलिया बाजारात सोने AUD 3159 प्रति औंस, जपानमध्ये JPY296, 735 प्रति औंस या सर्वकालिक उच्चांकावर होते. चीनमध्ये सोन्याने CNY14488.70 प्रति औंस असा विक्रमी उच्चांक गाठला.  तैवानमध्येही सोने 5 महिन्यांच्या उच्चांकावर जाऊन पोहचले. ऑस्ट्रेलिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे. त्यामुळे तेथे दर वाढल्यानंतर जागतिक बाजारालाही दखल घ्यावी लागते. भारतात सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. त्यामुळे भारत ही सोन्याच्या सर्वात मोठ्या बाजारपेठापैकी एक बाजारपेठ समजली जाते. 27 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची सर्वाधिक किंमत 62,120 तर चेन्नईत 62,210 इतकी किंमत नोंदवली गेली.

सोने आणि चलन यांचा संबंध

सोन्याचा इतिहास पैशांशी फार पूर्वीपासून जोडलेला आहे. परंतु दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटी ब्रेटन वूड्स चलन प्रणाली, स्थिर विनिमय दराची व्यवस्था निर्माण झाली. दुसर्‍या महायुद्धात हे स्पष्ट झाले होते की, युद्ध संपल्यानंतर गोल्ड स्टँडर्डच्या जागी नवीन आंतरराष्ट्रीय प्रणालीची आवश्यकता असेल. 1944 मध्ये अमेरिकेतील ब्रेटन वूड्स कॉन्फरन्समध्ये त्याची रचना तयार करण्यात आली होती.
अमेरिकेच्या राजकीय आणि आर्थिक वर्चस्वामुळे या प्रणालीच्या केंद्रस्थानी डॉलर होते. सोने आणि डॉलरचे प्रमाण US35 प्रति औंस या तत्कालीन परिस्थितीनुसार निश्चित केले गेले. गोल्ड स्टँडर्ड ही एक अशी प्रणाली होती, ज्या अंतर्गत जवळजवळ सर्व देश त्यांच्या चलनांचे मूल्य सोन्याच्या विशिष्ट रकमेनुसार निश्चित करतात किंवा त्यांचे चलन अशा देशाशी जोडतात ज्याने असे केले आहे.

 तिमाहीत सोन्याची मागणी 6% ने घटली..!

जागतिक सोन्याची मागणी 2023 च्या तिसर्‍या तिमाहीत 6% ने घटून 1,147.5 टन झाली आहे आणि केंद्रीय बँकांकडून बार आणि नाण्यांची मागणी कमी झाली आहे, असे जागतिक सुवर्ण परिषदेच्या (WGC) ताज्या अहवालात म्हटले आहे. जगातील सर्वात मोठे सोने वापरणारे राष्ट्र चीनमध्ये सोन्याची मागणी किरकोळ वाढून या वर्षी तिसर्‍या तिमाहीत 242.7 टन होती. तर जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सोन्याचा वापर करणार्‍या भारतात सोन्याची मागणी 10% वाढून 210.2 टन झाली आहे, जी एका वर्षापूर्वी 191.7 टन होती. शेजारील देशांच्या बाबतीत, पाकिस्तानची सोन्याची मागणी 2023 च्या तिसर्‍या तिमाहीत 11% कमी होऊन 11.6 टन झाली आहे, जी वर्षभरापूर्वी 13 टनांवर होती. श्रीलंकेची सोन्याची मागणी 0.3 टन वरून 2.4 टन इतकी वाढली आहे. अहवालानुसार, या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत जागतिक दागिन्यांची मागणी 1% ने घटून 578.2 टन झाली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 582.6 टन होती.
      (क्रमशः)

Back to top button