अर्थवार्ता

Stock Market
Stock Market
Published on
Updated on

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांंकात अनुक्रमे एकूण 208.40 अंक व 882.85 अंकांची घट होऊन दोन्ही निर्देशांक 19542.65 अंक व 65397.62 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 1.06 टक्के व सेन्सेक्समध्ये 1.33 टक्क्यांची घट नोंदवली गेली. सर्वाधिक घट होणार्‍या कंपन्यांच्या समभागांमध्ये डिव्हीज लॅब (-4.9 टक्के), विप्रो (-4.7 टक्के), बजाज फायनान्स (-3.5 टक्के), यूपीएल (-3.2 टक्के), एचयूएल (-2.9 टक्के) यांचा समावेश होतो. सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागांमध्ये बजाज ऑटो (8.7 टक्के), एसटीआय माईंडट्री (6.3 टक्के), हिरोमोटोकॉर्प (3.6 टक्के), एसबीआय लाईफ (3.5 टक्के), नेस्ले इंडिया (-3.1 टक्के) यांचा समावेश होतो. या सप्ताहात भारतीय बाजारावर प्रामुख्याने आखाती देशात चालू असणार्‍या युद्धाचा परिणाम झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध चालू राहण्याचे संकेत मिळत असल्याने खनिज तेलाच्या किमती सलग दुसर्‍या आठवड्यात वाढल्या. ब्रेंट क्रूडच्या किमती पुन्हा 92 डॉलर प्रतिबॅरल पातळीवर पोहोचल्या आहेत. अमेरिकेचे डब्ल्यूटीआय क्रूड 88 डॉलर प्रतिबॅरल किमतीवर पोहोचले आहे.

सप्टेंबर महिन्यात भारतातील घाऊक महागाई निर्देशांक – 0.26 टक्के इतका राहिला. घाऊक महागाई दर सलग सहाव्या महिन्यात ऋणमध्ये (Negative Zone) राहिला आहे. ऑगस्टमध्ये हा निर्देशांक -0.52 टक्के इतका होता.

रिझर्व्ह बँकेची बँक ऑफ बडोदावर कारवाई. बीओबी वर्ल्ड या बँकेच्या अ‍ॅपवर नवीन ग्राहक घेण्यास काही काळ स्थगिती. ग्राहकांची सम्मती न घेता त्यांना थेट बँकेच्या अ‍ॅपवर नोंदणी केल्या गेल्याचा संशय. व्यावसायिक लक्ष्य पूर्ण (Business Target) करण्यासाठी व्यवस्थापक (Managers) तसेच कर्मचारीवर्गाने हे केले असण्याची शक्यता असल्याचा अंदाज.

देशातील सर्वाधिक मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेचा दुसर्‍या तिमाहीचा नफा 51 टक्के वधारून 10606 कोटींवरून 15976 कोटींवर पोहोचला. निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) तब्बल 30.3 टक्के वधारून 27385 कोटी झाले. एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 1.23 टक्क्यांवरून 1.34 टक्के झाले. निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 0.33 टक्क्यांवरून 0.35 टक्के झाले. एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक यांच्या एकत्रीकरणपश्चात (Merger) नफ्याचे प्रमाण वाढले असले, तरी अनुत्पादित कर्जाचे प्रमाण वाढले असल्याचे पाहावयास मिळते.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत आयटी कंपनी विप्रोचा नफा 7.5 टक्के घटून 2667 कोटींवर खाली आला. कंपनीचा एकूण महसूलदेखील 1.4 टक्के घटून 22516 कोटींवर खाली आला. कंपनीतील कर्मचारी संख्येत 5051 ची घट पाहायला मिळाली. दुसर्‍या तिमाहीत देशातील पहिल्या चार महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये (टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, विप्रो) मिळून एकूण 21213 कर्मचारी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वाधिक घट टीसीएसमध्ये (7530 जण) पाहायला मिळाली.

देशातील महत्त्वाची खासगी बँक इंडसिंड बँकेचे चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर. बँकेचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत 22 टक्क्यांनी वधारून 2202 कोटी झाला. नफ्यातील वाढ ही प्रामुख्याने निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income) वाढल्याने झाली. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 18 टक्के वधारून 5077 कोटींवर पोहोचले. कर्ज वितरणाचे प्रमाण 21 टक्के वधारून 3.2 लाख कोटींवर गेले. एकूण मालमत्तेचे प्रमाण 12 टक्के वधारून 4.8 लाख कोटी झाले. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 2.11 टक्क्यांवरून 1.9 टक्क्यांपर्यंत खाली आले.

2023 आणि 2024 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये होणार्‍या एकूण वाढीमध्ये भारत आणि चीन यांच्या अर्थव्यवस्थांचा वाटा सुमारे 50 टक्के असेल, असे भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) केले आहे. आर्थिक वर्ष 2024 आणि 2025 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने म्हणजे 6.3 टक्के दराने वाढेल, असा अंदाज आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत सज्जन जिंदाल यांच्या जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने 2760 कोटींचा निव्वळ नफा कमावला. मागील वर्षी याच तिमाहीत 848 कोटींचा तोटा झाला होता. कंपनीच्या महसुलातदेखील 6.7 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 44,584 कोटींवर पोहोचला.

देशातील महत्त्वाची आदित्य बिर्ला समूहाची कंपनी अल्ट्राटेक सिमेंटचा नफा 79.6 टक्के वधारून 1281 कोटी झाला. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत कंपनीचा महसूलदेखील मागील वर्षीच्या तुलनेत 15.3 टक्के वधारून 16,012 कोटींवर पोहोचला. कंपनीने या तिमाहीत क्षमतेच्या एकूण 75 टक्के उत्पादन केले.

सिप्ला कंपनी खरेदी करण्यासाठी टोरंट फार्मा कंपनीने 5 अब्ज डॉलर्स निधीची तजवीज केली. टोरंट फार्मा सिप्ला कंपनीला 11 अब्ज डॉलर्सला खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, सिप्ला कंपनीचा संस्थापक परिवार (Founding Family) 13 अब्ज डॉलर्स किमतीची मागणी करत आहे. या परिवाराकडे असलेला सिप्ला कंपनीतील 33 टक्के हिस्सा टोरंट फार्मा खरेदी करणार आहे. शुक्रवारअखेरच्या बंद भावानुसार सिप्लाचे सध्याचे मूल्य 11.7 अब्ज डॉलर्स इतके आहे.

देशातील सर्वात मोठी गैरबँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) बजाज फायनान्सचा नफा 28 टक्के वधारून 2781 कोटींवरून 3551 कोटी झाला. निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) 26 टक्के वधारून 8845 कोटी झाले. एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 1.17 टक्क्यांवरून 0.9 टक्के झाले. कंपनीचे व्यवस्थापन अंतर्गत बाजारमूल्य 2.2 लाख कोटींवरून 2.9 लाख कोटींवर पोहोचले.

एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी आयटीसीचा निव्वळ नफा दुसर्‍या तिमाहीत 6 टक्के वधारून 4898 कोटी झाला. कंपनीचा महसूल 3.6 टक्के वधारून 19270 कोटी झाला.

गुगल ही आंतरराष्ट्रीय कंपनी लवकरच पिक्सेल मोबाईल भारतात बनवणार. 2024 पासून हे मेड इन इंडिया फोन उपलब्ध होतील. सध्या अ‍ॅपल कंपनी भारतात सर्वाधिक फोनचे उत्पादन घेते. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान भारतातून 45 हजार कोटींच्या फोनची निर्यात परदेशात करण्यात आली. या निर्यातीपैकी सुमारे 50 टक्के निर्यात अ‍ॅपल कंपनीची असून आता या संधीचा फायदा घेण्यासाठी गुगलदेखील भारतात येत आहे.

देशातील महत्त्वाची दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटोचा दुसर्‍या तिमाहीचा निव्वळ नफा 1836 कोटींवर पोहोचला. नफ्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांची वाढ झाली. कंपनीचा महसूल 6 टक्के वधारून 10777 कोटी झाला. कंपनीचा मोटारसायकल प्रकारातील बाजारातील हिस्सा 2 टक्के वाढून 36 टक्के झाला.

13 ऑक्टोबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 1.2 अब्ज डॉलर्सनी वधारून 585.9 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news