अर्थवार्ता

अर्थवार्ता
Published on
Updated on

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये एकूण अनुक्रमे 518.10 अंक व 1829.48 अंकांची घट होऊन दोन्ही निर्देशांक 19674.25 अंक तसेच 66009.15 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये एकूण 2.57 टक्के, तर सेन्सेक्समध्ये एकूण 2.70 टक्क्यांची घट नोंदवली गेली. सर्वाधिक घट होणार्‍या कंपन्यांच्या समभागामध्ये एचडीएफसी बँक (-6.95 टक्के), अल्ट्राटेक सिमेंट (-5.20 टक्के), जेएसडब्लू स्टील (-4.52 टक्के), आयसीआयसीआय बँक (-3.99 टक्के), विप्रो (-3.95 टक्के) यांचा समावेश होतो, तर सर्वाधिक वाढ होणार्‍यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा (4.57 टक्के), बजाज ऑटो (4.01 टक्के), टेक महिंद्रा (3.57 टक्के), पॉवर ग्रीड (3.08 टक्के), आयशर मोटर्स (2.68 टक्के) या कंपन्यांच्या समभागांचा समावेश होतो. या आठवड्यात बाजारावर प्रामुख्याने अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे व्याजदरासंबंधी पतधोरण आणि भारत व कॅनडा यांच्यामध्ये ताणलेले राजकीय संबंध यांचा प्रभाव पाहायला मिळाला.

गत सप्ताहात भारत तसेच कॅनडा यांच्यामधील राजनैतिक संबंध ताणले गेले. भारताने कॅनडासाठीची व्हिसा सेवा स्थगितीचा कठोर निर्णय घेतला. कॅनडाच्या नागरिकांसाठी भारताची व्हिसा सेवा अनिर्णित काळासाठी थांबवण्यात आली. महिंद्रासारख्या भारतीय उद्योग समूहाने कॅनडामधील गुंतवणूक असलेली उपकंपनी रेसन एअररोस्पेस कार्पोरेशनचे कॅनडामधील कामकाज थांबवले. या कंपनीत महिंद्राचा 11.18 टक्के हिस्सा आहे. तसेच कॅनडास्थित पेन्शन फंडांचीदेखील भारतात गुंतवणूक आहे. कोटक महिंद्रा बँक, झोमॅटो, इंडस टॉवर, नायकासारख्या कंपन्यांसह एकूण सुमारे 70 सूचिबद्ध कंपन्यांमध्ये कॅनडा पेन्शन फंडांची गुंतवणूक आहे. कॅनडास्थित विविध फंडांची भारतीय भांडवल बाजारात एकूण 30 अब्ज डॉलर्स (सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची) गुंतवणूक आहे.

जेपी मॉर्गन या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या इमर्जिंग मार्केट डेट इंडेक्स फंडामध्ये भारतीय रोख्यांचा (बाँडस) समावेश होणार. यामुळे 25 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 2 लाख कोटी रुपये) निधी भारतीय रोखे बाजारात येणार असल्याचा विश्लेषकांचा अंदाज. सध्या जेपीमॉर्गन कंपनीचा इमर्जिंग मार्केट डेट इंडेक्स फंड 236 डॉलर्सची (अंदाजे 19 लाख कोटी) गुंतवणूक सांभाळतो. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेशवरन यांच्या विश्लेषणानुसार, परदेशातून भारतीय रोखे बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आल्याने भारताची चालू वित्त खात्यातील तूट कमी होण्यास मदत होईल. या घटनेचे जसे फायदे आहेत, तसेच यामुळे काही आव्हानेदेखील निर्माण होणार आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय घटनांचे थेट परिणाम भारताच्या रोख्यांच्या भावामध्ये दिसू लागतील. सरकारी रोख्यांचे रुपये चलनातील व्यवहार आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढीस लागतील. यामुळे रुपया काही प्रमाणात मजबूत होईल. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार थेट रुपया चलनावर होतील. भारतीय रोखेबाजार हा चीन आणि ब्राझीलनंतर विकसनशील अर्थव्यवस्थामध्ये सर्वात मोठा तिसर्‍या क्रमांकाचा रोखेबाजार आहे. परंतु तरीदेखील आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा भारतीय रोखे बाजारातील हिस्सा केवळ 2 टक्के इतकाच आहे. आता हा हिस्सा वाढीस लागेल.

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील कंपनी डेल्टा कॉर्पला जीएसटी विभागाकडून 11139.6 कोटींच्या जीएसटी कर मागणीची नोटीस. जुलै 2017 ते मार्च 2022 दरम्यान जीएसटी वाजवीपेक्षा कमी भरल्याचा सरकारी जीएसटी विभागाकडून डेल्टा कॉर्मवर आरोप. ऑनलाईन गेमिंगमध्ये सरसकट रकमेवर 28 टक्के करभरणा होणे अपेक्षित असल्याचे सरकारचे म्हणणे. यापूर्वी याच क्षेत्रातील कंपनी गेम्स क्राफ्टकडे कर विभागाने 21 हजार कोटींची कर मागणीची नोटीस पाठवली होती.

भारतीय कुटुंबांची घरगुती बचत मागील 50 वर्षांच्या नीचांकी पातळीवर. रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालाचा निष्कर्ष, एप्रिल 2022 ते मार्च 2023 या आर्थिक वर्षात भारतातील कुटुंबाची घरगुती बचत 55 टक्क्यांनी घसरून जीडीपीच्या तुलनेत 5.1 टक्क्यांपर्यंत खाली आली. आर्थिक वर्ष 2021 ची तुलनेत कर्जभारदेखील दुप्पट होऊन 15.6 लाख कोटींवर पोहोचला. एसबीआय रिसर्चच्या अहवालानुसार, मागील आर्थिक वर्षांत देशातील कुटुंबावर एकूण 8.2 लाख कोटींचे कर्ज झाले. यापैकी 7.1 लाख कोटींचे कर्ज हे घर खरेदी व घरसंबंधी कारणांसाठी घेतले गेल्याचे अहवाल स्पष्ट करतो. मालमत्ता खरेदीकडे भारतीय कुटुंबाचा ओढा वाढत असल्याचे या अहवालावरून दिसते. कर्जभार वाढण्याचे प्रमाण हे स्वातंत्र्यापश्चात दुसर्‍यांदा इतक्या वेगाने (Second Fastest Pace) वाढले आहे.

अ‍ॅपल कंपनीच्या आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस यांना भारतीय बाजारपेठेत तुफान प्रतिसाद. आयफोन 14 च्या तुलनेत आयफोन 15 ची विक्री 40 ते 50 टक्क्यांनी अधिक होण्याची शक्यता. सध्या बनवलेले आयफोन 15 हे भारतामध्ये फॉक्सकॉन कंपनीच्या चेन्नई प्रकल्पामधून भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात केले जात आहेत. अ‍ॅपल फोनला वाढता प्रतिसाद पाहता, फॉक्सकॉन कंपनीने भारतातील उत्पादन क्षमता दुपटीने वाढवण्याचे ठरवले आहे. सध्या अ‍ॅपल कंपनीच्या मालकीच्या दोन दुकानांमधून तसेच 3 हजार रिटेल दुकानांमधून विक्री करण्यास प्राधान्य देत आहे. भारतीय मोबाईल कंपनी लाव्हानेदेखील फोरजी तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल फोन्सची मालिका ग्राहकांसमोर सादर करून स्वस्त किमतीच्या फिचर फोन बाजारातील 35 टक्के हिस्सा काबीज करण्याचे धोरण आखले आहे.

घरगुती वायरलेस ब्राँड क्षेत्रात एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांची स्पर्धा तीव्र. फाईव्हजी तंत्रज्ञानावरील जिओ कंपनीचे वायरलेस Wi-Fi Air Fiber बाजारात उपलब्ध. एअरटेलचे वायरलेस फायबर सध्या दोन शहरात उपलब्ध असून, जिओने पदार्पणातच मुंबई-पुण्यासह देशातील 8 शहरांमध्ये एअर फायबर सेवा पुरवण्यास सुरुवात केली.

निरमा कंपनीने औषध कंपनी ग्लेनमार्क फार्मा कंपनीची उपकंपनी ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस मधील 75 टक्के हिस्सा 5651.5 कोटींना घेण्याचे निश्चित केले. एकूण 615 रुपये प्रतिसमभाग दरावर निरमा कंपनी ग्लेनमार्क लाईफ सायन्सेसचा 75 टक्के हिस्सा खरेदी करणार. या व्यवहारानुसार, ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस कंपनीचे मूल्य (Enterprise Value) 7535.4 हजार कोटी इतके असल्याचे सांगितले. कंपनीतील 7.84 टक्के हिस्सा ग्लेनमार्क फार्माकडेच कायम राहील.

मणिपाल हॉस्पिटल्सने एएमआरआय हॉस्पीटल्समधील 84 टक्के हिस्सा 2450 कोटींना विकत घेतला. एएमआरआय हॉस्पिटल्स कंपनीची कोलकात्यामध्ये 3, तर भुवनेश्वरमध्ये 1 हॉस्पिटल असून यामध्ये इमामी समूहाचा 98 टक्के हिस्सा होता. तसेच 2 टक्के हिस्सा पश्चिम बंगाल सरकारचा आहे. इमामी समूह हिस्साविक्री करून, या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील आहे.

टोरंट फार्मा कंपनी आपली प्रतिस्पर्धी कंपनी सिप्ला खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील. सुमारे 7 अब्ज डॉलर्सची देशातील तिसर्‍या क्रमांकाची औषध कंपनी असलेली सिप्ला खरेदी करण्यासाठी त्याहून लहान आकाराची टोरंट फार्मा सुमारे 3 ते 4 अब्ज डॉलर्सचा निधी कर्जस्वरूपात उभा करण्यासाठी विविध गुंतवणूकदारांशी प्राथमिक स्वरूपात चर्चा करत आहे. यासाठी टोरंट फार्माने 1 अब्ज डॉलर्स कर्जासाठी अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट कंपनीसोबत, त्याचप्रमाणे बेन कॅपीटल व सीव्हीसी पार्टनर्ससोबत 1.5 अब्ज डॉलर्स कर्जाबाबत बोलणी सुरू केली आहे. सिप्ला कंपनीच्या संस्थापक सदस्य परिवाराने स्वतःजवळील कंपनीचा 33.4 टक्के हिस्सा विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव पुन्हा 100 डॉलर्स प्रती बॅरलची पातळी ओलांडण्याचे गोल्डमन सॅक्स या गुंतवणूकदार व पतमानांकन संस्थेचे भाकीत. या तिमाहीत दर दिवशी 2 दशलक्ष बॅरल खनिज तेलाचा उत्पादन तुटवडा राहण्याचा गोल्डमन सॅक्सचा अंदाज. मागील 10 महिन्यांत ब्रेट क्रूड खनिज तेलाचा भाव सुमारे 25 टक्के वाढून 93 डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचला. सौदी अरेबिया आणि रशिया यांनी एकत्रितपणे दरदिवशी 1.3 दशलक्ष बॅरल उत्पादन कपातीचा निर्णय 2023 सालाच्या शेवटपर्यंत कायम ठेवण्याचे घोषित केले. यामुळे मागील 10 महिन्यांत झालेल्या भाववाढीमध्ये सर्वाधिक वाटा हा खनिज तेलाची उत्पादन कपात या निर्णयाचा आहे. सध्या या दोन देशांकडून निर्माण केला गेलेला तुटवडा अमेरिका, ब्राझील, इराण यासारख्या इतर तेल उत्पादक देशांकडून उत्पादन वाढ करून भरून काढला गेला. परंतु हिवाळ्यातदेखील अशीच उत्पादन कपात चालू राहिल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव आणखी भडकण्याची चिन्हे असल्याचे अर्थ विश्लेषकांचे मत.

जेपी मॉर्गन इमर्जिंग मार्केट डेट इंडेक्स फंडमध्ये भारतीय रोख्यांचा समावेश केल्याने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय निधी भारतात वळवण्याच्या शक्यतेने भारतीय रुपया चलन शुक्रवारअखेर डॉलरच्या तुलनेत 15 पैसे मजबूत होऊन 82.94 रुपये प्रती डॉलर स्तरावर बंद झाले.

15 सप्टेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारतीय विदेश चलन गंगाजळी 867 दशलक्ष डॉलर्सनी घटून 4 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर म्हणजे 593.04 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news