उत्सवाच्या हंगामाची बँकांकडून तयारी सुरू झाली आहे. चांगला सिबिल स्कोर असणार्या ग्राहकांसाठी मंजुरीपूर्व वैयक्तिक किंवा गृहकर्ज देण्याची ऑफर बँकांकडून आणली जात आहे. जर आपल्यालाही बँकेकडून मंजुरीपूर्व पर्सनल लोन किंवा होमलोन संदर्भात कॉल किंवा मेसेज आला असेल, तर घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. बँकिंग तज्ञांच्या मते, कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी अन्य बँकांच्या व्याजदराची तुलना करा. याशिवाय प्रक्रिया शुल्क, नियम आणि अटींचे आकलन करा.
पर्सनल लोन हे कोणत्याही कामासाठी घेतले जाऊ शकते. घराची सजावट किंवा नूतनीकरण, दुचाकी खरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी आदींसाठी वैयक्तिक कर्जाचा वापर केला जातो. सणासुदीचा काळ हा खरेदीचा मोसम असल्याने या काळात कर्जालादेखील मागणी राहते. त्यामुळे कर्ज वाटप करण्यासाठी बँकांत स्पर्धा सुरू होते आणि त्यातून ग्राहकांच्या पदरात विविध ऑफर पडतात. परिणामी, आपल्याला एकापेक्षा अनेक बँकांचे फोन येऊ शकतात. प्रत्येकाची पडताळणी करूनच गरज भासल्यास वैयक्तिक कर्जाचा विचार करावा.
एखादी बँक अर्ज न करताही आपल्याला कर्ज देण्यास तयार आहे, असा मंजुरीपूर्व कर्जाचा अर्थ होतो. प्री-अप्रव्यूड पर्सनल लोन, प्री-अप्रव्यूड होम लोन आदी स्वरूपातून आपल्याला मिळू शकते. हे कर्ज चांगल्या सिबिल स्कोरच्या आधारावर बँक ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाते.
सणासुदीचा हंगाम सुरू झाला की, बँकांकडून कर्जसंबंधीचे कॉल किंवा मेसेज यायला सुरुवात होतात. ठरावीक कालावधीसाठी अमूक व्याजदरावर एवढे कर्ज मिळू शकते, अशा प्रकारचे फोन येतात. कमी व्याजदर, दीर्घ कालावधी आणि कर्जाचा आकडा पाहून काही जण हुरळून जातात. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी काही मंडळी लगेच तयार होतात. मात्र कालांतराने काही बँकांनी कोणत्या ना कोणत्या मार्गाने शुल्क वसुली केल्याचे निदर्शनास येते. अर्थात त्याचा उल्लेख अटी आणि नियमात केलेला असतो; मात्र आपण त्याचे वाचन काळजीपूर्वक करत नाहीत.
नियम आणि अटी वाचा : बँकांकडून मंजुरीपूर्व पर्सनल लोनची ऑफर मिळाल्यानंतर त्याचे नियम आणि अटी वाचा. एवढेच नाही, तर एखाद्या मार्केटिंग असिस्टंटकडून कर्जाविषयी माहिती घ्या. व्याजदराची स्थिती, प्री-पेमेंटच्या अटी, फ्लोटिंग की फिक्स रेट आदींसंदर्भात माहिती घ्या. बँकेच्या ग्राहक सेवा अधिकार्याची भेट घेऊन अटींची पडताळणी करा.
झीरो प्रोसेसिंग फीसची मागणी करा : जर आपल्याला बँकेकडून मंजुरीपूर्व पर्सनल लोन मिळत असेल, तर बँकेकडून झीरो प्रोसेसिंग फीसची मागणी करा. बँक आपले रेकॉर्ड पाहून कर्ज मंजुरीची विनाशुल्क प्रक्रिया पार पाडू शकते.
व्याजदराची तुलना : पर्सनल लोनवरचे व्याज हे नेहमीच गृहकर्ज आणि अन्य मॉर्गेज कर्जाच्या तुलनेत महागडे असते. यासाठी कर्ज घेण्यापूर्वी दुसर्या बँकांच्या व्याजदराची तुलना करा. जर मंजुरीपूर्व वैयक्तिक कर्जाचे व्याजदर अधिक असेल तर कर्ज घेणे टाळावे.
बँकेचे क्रेडिट स्कोर तपासा : कर्ज देण्यापूर्वी बँक क्रेडिट स्कोर तपासते. चांगला क्रेडिट स्कोर असल्यास बँक मंजुरीपूर्व कर्ज ऑफर करते. जर आपला क्रेडिट स्कोर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तर कमी व्याजावर कर्ज मिळू शकते.
गरज असेल तरच कर्ज घ्या : मंजुरीपूर्व कर्ज हे ऐकण्यास चांगले वाटते; मात्र कर्जाच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी वास्तविकपणे आपल्याला कर्जाची खरोखरच गरज आहे काय, याचा विचार करावा. केवळ हौसमौजेखातर किंवा फिरण्यासाठी कर्ज घेऊ नये. वैयक्तिक कर्जावर सध्या 11 ते 20 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारले जाते. तसेच एक वर्षापासून ते पाच वर्षांपर्यंत पर्सनल लोनची ऑफर दिली जाते.