Thematic Funds : जितकी जोखीम तितकाच लाभही | पुढारी

Thematic Funds : जितकी जोखीम तितकाच लाभही

भरत साळोखे

Risk comes from not knowing what you are doing असे वॉरन बफे यांनी म्हटलेले आहे; परंतु प्रत्येक वेळी आंधळेपणाने गुंतवणूक करणारेच जोखीम घेतात असे नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेचा, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा, शेअर बाजाराचा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा सखोल अभ्यास करून जोखीमयुक्त साधनांमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार कमी नसतात आणि असा संपूर्ण अभ्यास करून जे Risky गुंतवणूक करतात, त्यांना त्याचा लाभही भरघोस मिळतो कसा? तोच तर आमच्या लेखाचा विषय आहे.

Thematic किंवा Sectoral फंडस् हे जोखीम घेण्याची क्षमता असणार्‍या गुंतवणूकदारांसाठी योग्य असणारे फंड आहेत. कारण Thematic फंडस् हे केवळ एखाद्या Theme ला केंद्रीभूत मानून तिच्याशी निगडित असणार्‍या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. उदा. Financial Services अशी जर संकल्पना असेल तर तो फंड Banking, Financial Services companies, NBFCs, Insurance companies, Broking companies अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करेल.

वर म्हटल्याप्रमाणे जे लोक अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण अभ्यास करून एखाद्या Thematic फंडाची निवड करतात त्यांना त्याचा चांगला लाभही मिळतो. परंतु, असा उच्च लाभ मिळण्यासाठी Thematic फंडामध्ये अंगभूत असणार्‍या काही जोखमींचाही ते स्वीकार करत असतात. सर्वात पहिली जोखीम म्हणजे Thematic फंड हे एखाद्या Theme शी संबंधित असणार्‍या कंपन्यांच्या शेअर्समध्येच गुंतवणूक करत असल्यामुळे तो Highly Concentrated होतो.

Diversification हा जो मूळ म्युच्युअल फंडाचा गाभा आहे, तोच Thematic फंडामध्ये मर्यादित होतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचा गुंतवणूक कालावधी किमान पाच वर्षांचा आहे, त्यांच्यासाठी गुंतवणूक योग्य मल्टी कॅप, फ्लेक्झीकॅप किंवा लार्ज कॅप फंड निवडणे सोपे असते; परंतु Thematic फंड निवडण्यासाठी सखोल आणि चौफेर अभ्यासाची गरज असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे Thematic फंड हे Cyclical असतात. म्हणजे मार्केटमध्ये काही Sectors हे सदासर्वकाळ तेजीत न राहता काही मर्यादित कालावधीपुरते तेजीत राहतात. त्यामुळे अशा फंडामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक न करता Entryआणि Exit चे अचूक Timing साधणे महत्त्वाचे असते.

असे असले तरी भारतामध्ये आज आणि आगामी काळात Energy ही Theme सर्वाधिक मागणी असणारी Theme ठरेल, यात शंका नाही. अमर्याद औद्योगिकीकरणामुळे व्यापारी वापरासाठी आणि वाढत्या Global warming मुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतच राहील. गेले काही दिवस कोळशाचा तुटवडा सर्वच देशांना कसा भेडसावत आहे, त्याच्या बातम्या आपण ऐकतच असाल. कारण Solar power, wind power, hydro power यांचा Energy Sector मधील सहभाग वाढत असला तरी आजही वीजनिर्मितीचे प्रमुख साधन कोळसा हेच आहे. त्यामुळे कोळसा, वीज यांना असलेली प्रचंड मागणी हे Energy Sector इथून पुढेही सर्वाधिक गुंतवणूक खेचणारे आणि गुंतवणूकदारांनाही भरघोस परतावा देणारे क्षेत्र राहील यात शंका नाही. गेल्या काही दिवसांमध्ये Coal India, Tata power, NTPC, वगैरे शेअर्सच्या किमतीमध्ये जी दमदार वाढ झाली ती याच गोष्टीमुळे.

या पार्श्वभूमीवर Energy थीमशी संबंधित दोन म्युच्युअल फंडांनी आपल्या अत्याकर्षक परवान्याने साहसी, जोखीम स्वीकारण्याची तयारी असणार्‍या गुंतवणूकदारांचे लक्ष चांगलेच वेधून घेतले आहे. Tata Resources and Energy Fund आणि DSP Natural Resources and New Energy fund हे ते दोन फंड होत. या फंडांच्या आर्थिक कामगिरीवर एकवार नजर टाका.

वरीलपैकी Tata Resources and Energy फंडाने स्थापनेपासून (28 डिसेंबर 2015) 21.33 टक्के असा आकर्षक परतावा दिला आहे. असे असूनही फंडाचा AUM 30 सप्टेंबर 2021 अखेर केवळ 140 कोटी रु. आहे. DSP Natural Resoruces and New Energy हा फंड स्थापन होऊनही (25 एप्रिल 2008) 13 वर्षे होऊन गेली; परंतु त्याचाही AUM फक्त रु. 735 कोटी इतका आहे. त्यावरून हे फंड किती जोखमीचे आहेत आणि सर्वसाधारण गुंतवणूकदार अशा फंडापासून कसे दूर राहतात हे दिसून येते.

परंतु सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ज्यांनी जोखीम घेऊन या फंडामध्ये गुंतवणूक केली त्यांना या फंडानी मालामाल केले यात शंका नाही. DSP Natural Resoruces and New Energy या फंडाचा गेल्या एक वर्षातील 99.22 टक्के परतावा पाहिल्यास केवळ एक वर्षात या फंडातील गुंतवणूक दुप्पट झाली हे लक्षात येते.

Back to top button