‘रुपे’चे सीमोल्लंघन | पुढारी

‘रुपे’चे सीमोल्लंघन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्यावसायिक बँकांना रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड जारी करण्याची परवानगी दिल्यानंतर आता लवकरच या कार्डचा उपयोग जगभरातील देशांत करता येणार आहे. यासंदर्भात आरबीआयकडून अधिसूचना जारी केली जाणार असून, यानुसार नवे नियम लागू केले जाणार आहेत. याप्रमाणे दरवर्षी परदेशात जाणार्‍या लाखो भारतीयांना बराच फायदा मिळणार आहे.

आरबीआयने आता देशातील सर्व व्यावसायिक, खासगी बँकांना रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड जारी करण्याची परवानगी दिली असून, येत्या काही काळात अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. या कार्यवाहीनंतर सर्व बँकांकडून फॉरेक्स कार्ड जारी होईल. आरबीआयच्या निर्णयामुळे परदेशात राहणार्‍या भारतीयांना आर्थिक व्यवहार, बिल भरणा किंवा अन्य कामासाठी फॉरेक्स कार्डचा पर्याय उपलब्ध होईल आणि या कार्डच्या जागतिक मान्यतेचे नवे पर्वदेखील सुरू होईल.

रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड म्हणजे काय?

रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्डसंबंधी जाणून घेण्याच्या अगोदर प्रीपेड फॉरेक्स कार्ड म्हणजे काय हे माहीत करून घेणे महत्त्वाचे आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास अनेक प्रकारच्या चलनात व्यवहार करण्यास परवानगी देणारे कार्ड म्हणजे प्रीपेड फॉरेक्स कार्ड होय. हे कार्ड परदेशातील प्रवासाच्या वेळी उपयुक्त ठरते. आपण ज्या देशांचा प्रवास करतोय, त्या देशाचे चलन या कार्डच्या मदतीने एटीएममधून काढू शकता. प्रीपेड फॉरेक्स कार्ड जगभरात चालते. याप्रमाणे रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्डच्या माध्यमातून कोणत्याही देशातील एटीएममधून स्थानिक चलन काढता येणे शक्य आहे. अर्थात कार्ड घेण्यापूर्वी एक निश्चित रक्कम जमा करावी लागते.

कार्डचे काय फायदे

रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्डचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे परदेश दौर्‍यात स्थानिक एटीएममधून डेबिट कार्डच्या मदतीने तेथील चलन काढू शकता. कार्ड जारी करणार्‍या बँकेच्या सहायक बँकेतून कोणत्याही देशात व्यवहार करू शकतो. हे कार्ड पूर्णपणे प्रीपेड असल्याने नव्याने खाते उघडण्याची किंवा वेगळ्या खात्याची गरज भासत नाहीत. एटीएम कार्ड इन्सर्ट करताच कार्डमध्ये जमा असलेल्या रकमेपैकी परकी चलनातील आवश्यक रक्कम एटीएममधून बाहेर येईल. याशिवाय या कार्डचा वापर पीओएस मशिन आणि ऑनलाइन शॉपिंगमध्ये करता येतो. कार्डची खासियत म्हणजे ऑफलाइन व्यवहार करताना ओटीपीची गरज भासत नाही.

कार्ड कसे घ्यावे

रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड खरेदी करताना कोणतीही किचकट आणि मोठी प्रक्रिया नाही. आपण कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन कार्डसाठी अर्ज देऊ शकता. कार्ड खरेदीचे इच्छुक असणारा व्यक्ती अर्ज भरेल. त्यानंतर केवायसी कागदपत्रे जमा केल्यानंतर बँक ग्राहकास कार्डमध्ये पैसे भरणाविषयी विचारणा करेल. आपल्याला गरजेनुसार निश्चित केलेली रक्कम कॅश काऊंटरवर जमा करावी लागेल. किती कालावधीसाठी कार्ड हवे, अशी विचारणा बँकेकडून केली जाईल. आपल्याला दोन महिने, चार महिने, सहा महिन्यांसाठी कार्ड हवे असेल तर तशी माहिती बँकेला द्या.

आता परदेशातही कार्ड मिळेल

परदेशस्थित भारतीय बँकांच्या शाखेत किंवा बहुराष्ट्रीय बँकांच्या शाखेत रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड मिळणार आहे. यासाठी स्थानिक शाखेत जाऊन कोणताही व्यक्ती रुपे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड मिळवू शकतो. यासाठी किरकोळ शुल्क आकारले जाते. या कार्डचा वेगवेगळ्या देशांत सहजपणे वापर करता येऊ शकतो. या निर्णयामुळे संपूर्ण जगात प्रीपेड फॉरेक्स कार्डला एक प्रकारे जगमान्यता मिळेल.

परदेशात शिकणार्‍यांना फायदा

रुपे प्रीपेड डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा सर्वाधिक फायदा परदेशात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मिळेल. मुलांना पैशाची गरज भासत असेल आणि विद्यार्थ्याकडे रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड असेल, तर त्याचे पालक भारतातूनच नाहीतर जगभरातून कोणत्याही देशातून ऑनलाइनने त्यात रक्कम अपलोड करू शकतात. त्यानंतर संबंधित पाल्य हा ज्या देशात राहतो तेथील चलन रुपे फॉरेक्स कार्डच्या मदतीने काढू शकतो.

Back to top button