Stock Market Closing | शेअर बाजार सुस्त, सेन्सेक्स १९३ अंकांनी घसरून बंद, निफ्टी १८,५०० च्या खाली | पुढारी

Stock Market Closing | शेअर बाजार सुस्त, सेन्सेक्स १९३ अंकांनी घसरून बंद, निफ्टी १८,५०० च्या खाली

पुढारी ऑनलाईन : संमिश्र जागतिक संकेतांचा मागोवा घेत आज गुरुवारी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. परिणामी आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex), निफ्टीत (Nifty) चढ-उतार दिसून आला. सुरुवातीला BSE सेन्सेक्सने १०० अंकांनी वाढून ६२,७०० वर तर निफ्टीने १८,५४७ वर व्यवहार केला. (Stock Market Updates) त्यानंतर काही वेळ दोन्ही निर्देशांक सपाट झाले. पण बाजार बंद होताना त्यात घसरण झाली. सेन्सेक्स आज १९३ अंकांनी घसरून ६२,४२८ वर बंद झाला. तर निफ्टी ४६ अंकांच्या घसरणीसह १८,४८७ वर स्थिरावला. निफ्टी आयटी आणि निफ्टी फार्मा आज वाढले. पण निफ्टी बँक आणि फायनान्सियल स्टॉक घसरले.

‘हे’ शेअर्स घसरले

सेन्सेक्सवर भारती एअरटेल आणि कोटक बँक यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. हे शेअर्स सुमारे ३ टक्क्यांहून अधिक घसरले. आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, मारुती, रिलायन्स यांनीदेखील लाल चिन्ह्यात व्यवहार केला. तर टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, टीसीएस, सन फार्मा, ॲक्सिस बँक, विप्रो यांचे शेअर्स वाढले.

अदानींचे ‘या’ दोन शेअर्सची पुन्हा उसळी

MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समधून बाहेर पडूनही अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅसचे शेअर्स (Adani Total Gas shares) गुरुवारच्या व्यवहारात BSE वर ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किट्समध्ये पोहोचले. Adani Transmission च्या शेअरने १ मार्च रोजी ६३१.५० रुपयांपर्यंत खाली येत ५२ आठवड्यांचा निचांक गाठला होता. आता पुन्हा या शेअरने उसळी घेतली आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर हा शेअर ८५ टक्क्यांनी घसरला होता. अदानी टोटल गॅसचा शेअर १९ मे रोजी ६३३ रुपयांवर ५२ आठवड्यांच्या निचांकी पातळीवरून आला होता. २३ जानेवारी रोजी या शेअरने ४ हजारांवर जाऊन ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता.

कोल इंडियाचे शेअर्स गडगडले, जाणून घ्या कारण

कोल इंडियाचे शेअर्स (Shares of Coal India) ४ टक्क्यांहून अधिक घसरले. कारण केंद्र सरकार गुरुवारपासून दोन दिवसांच्या ऑफर-फॉर-सेल (OFS) द्वारे सुमारे ४,२०० कोटी उभारण्यासाठी कोल इंडियामधील त्यांच्या ३ भागभांडवलाची विक्री करणार आहे. या पार्श्वभूमीवर Coal India चे शेअर्स गडगडले आहेत. हा शेअरची किंमत आज २३० रुपयांवर आली.

जागतिक बाजारातील स्थिती

जागतिक अर्थव्यवस्था आणि महागाईची चिंता वाढल्याने अमेरिकेतील शेअर बाजार काल बुधवारी घसरून बंद झाले. एस अँड पी, नॅस्डॅक कंपोझिट (Nasdaq composite), डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) हे निर्देशांक खाली आले आहेत. पण आशियाई बाजारात तेजीचे वातावरण दिसत आहे. जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँगसेंग हे वधारले.

जीडीपीचे आकडे चांगले

सरत्या आर्थिक वर्षात ७.२ टक्के इतक्या जीडीपी दराची नोंद झाली असल्याची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (एनएसओ) बुधवारी देण्यात आली. तत्पूर्वीच्या म्हणजे वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपी दर ९.१ टक्के इतका नोंदवला गेला होता. सरकारकडून जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीचे आकडेही जाहीर करण्यात आले असून या तिमाहीत जीडीपी दर ४.४ टक्क्यांच्या तुलनेत ६.१ टक्के इतका नोंदवला गेला आहे. सरत्या आर्थिक वर्षात जीडीपी दर साडेसहा टक्क्यांच्या आसपास राहील, असे भाकीत रिझर्व्ह बँकेने वर्तवले होते. त्या तुलनेत जीडीपीचे आकडे चांगले आल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा :

Back to top button