

ईपीएफओच्या सध्याच्या नियमांनुसार पीएफ मध्ये कर्मचार्यांच्या मूळ वेतन (बेसिक आणि डीए)च्या 12 टक्के रक्कम जमा केली जाते. काही कंपन्या संपूर्ण वेतनावर कपात लागू करतात. वेतनातून कपात होणारी 12 टक्के रक्कम ही पीएफ खात्यात जमा होते, तर कंपन्यांकडून दिले जाणारे योगदान हे ईपीएफमध्ये जमा न होता विविध घटकात विभागले जाते.
यात 3.67 टक्के पीएफमध्ये, 8.33 टक्के पेन्शन खात्यात जमा होते. या योजनेत सर्व कर्मचार्यांच्या खात्यात केंद्र सरकार 1.16 टक्के योगदान देते. ईपीएफच्या मूळ वेतनाची कमाल मर्यादा सध्या 15 हजार रुपये दरमहा आहे. अशा वेळी ईपीएसमध्ये दर महिन्याला 1250 रुपये कमाल जमा होऊ शकतात.
कर्मचार्यांचे 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पेन्शन मिळवण्यास पात्र ठरतात. मात्र हे पेन्शन मिळण्यासाठीही अट घातली आहे. ती म्हणजे ईपीएसच्या खात्यात किमान दहा वर्षांचे योगदान असणे गरजेचे आहे. कर्मचार्यांचे योगदान आणि नोकरीचा कालावधी या आधारावर पेन्शनचे आकलन केले जाते.
* पेन्शन कशी निश्चित होते?
कर्मचारी पेन्शन योजना 15 नोव्हेंबर 1995 रोजी सुरू झाली. यानुसार सध्या किमान पेन्शनची रक्कम 1000 रुपये, तर कमाल 7500 रुपये आहे. महागाईच्या काळात ही रक्कम खूपच कमी आहे.
यानुसार कर्मचारी संघटना किमान पेन्शनची रक्कम वाढवून ती 5 हजार रुपये करण्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात सरकारवर आपल्याच सहयोगी संस्थांचा दबाव वाढला आहे. जर कोरोना संसर्ग आला नसता तर याबाबत निर्णय झाला असता. परंतु आता ही रक्कम कधी वाढेल, हे सांगता येत नाही. परंतु पेन्शनची रक्कम कशी निश्चित होते, याबाबत अनेक जण द्विधा मन:स्थितीत आहेत. यासाठी ईपीएफचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे.
या आधारावर आपण पेन्शनची रक्कम समजू शकता. जर एखादा व्यक्ती ईपीएसमध्ये दहा वर्षांपर्यंत योगदान देत असेल, तर तो पेन्शनसाठी पात्र ठरेल. मात्र ही सुविधा वयाच्या 58 व्या वर्षांनंतर मिळेल. अर्थात काही अटी आणि नियमांसह वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही पेन्शन मिळू शकते.
जर एखादा कर्मचारी 20 वर्षांची सेवा पूर्ण करत असेल, तर त्यात दोन वर्ष बोनस म्हणून गृहीत धरले जाते. वयाचे आकलन हे राऊंड फिगरमध्ये केले जाते. जर पेन्शन योग्य सेवा दहा वर्षे 6 महिने असेल, तर त्यास 11 वर्षे असे गृहीत धरले जाते. बारा वर्षे होण्यास सहा महिन्यांचा कालावधी राहिला असला तरी सहा महिने सोडून दिले जातात.
* पेन्शन = बेसिक+डीए (गुणिले) नोकरीचे वर्षे/70
उदाहरणार्थ, अमितचे गेल्या वर्षी सरासरी वेतन हे (बेसिक आणि डीए) 15 हजार रुपये होते आणि पेन्शनपात्र नोकरीचा कालावधी 21 वर्र्षे होता. यानुसार 15 हजार गुणिले 21 भागिले 70 म्हणजे त्याला दरमहा साडेचार हजार रुपये निवृत्तीवेतन मिळेल.
* पैसे कधी काढू शकतो?
आपल्याला प्रॉव्हिडंड फंडमधून पैसे काढायचे असतील, तर आपल्या खात्यात जमा असलेली रक्कम कधीही काढू शकता. मग नोकरीचा कालावधी हा एक वर्षाचा असो किंवा दहा वर्षांचा असो. जर नोकरी बदलल्यानंतर आपण पीएफचे एका खात्यातून दुसर्या खात्यात ट्रान्स्फर करत असाल, तर पेन्शनची रक्कम काढू शकत नाही.
पेन्शनची रक्कम ही सर्व्हिस हिस्ट्रीला जोडली जाते. जर आपण वेगवेगळ्या संस्थेत काम करत असताना सलग दहा वर्षे सेवा झाली, तर आपण पेन्शनला पात्र म्हणून गृहीत धरले जातो. या स्थितीत वयाच्या 58 व्या वर्षांनंतर मासिक पेन्शन मिळत राहील.
नोकरी सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीची असेल, तर आपण केवळ पीएफच काढू शकता. यानुसार आपल्याला निवृत्तीवेतन मिळणार नाही. आपली नोकरी दहा वर्षांची असेल तरीही पीएफबरोबर पेन्शनची रक्कम काढू शकणार नाही. या स्थितीत आपल्याला नियमानुसार 58 वर्षांनंतरच कायमची पेन्शन मिळत राहील.
जर नोकरी सहा महिन्यांपेक्षा अधिक आणि साडेनऊ वर्षांपेक्षा कमी असेल, तर आपण ईपीएफमध्ये फॉर्म 19 आणि 10 सीच्या माध्यमातून पीएफबरोबरच पेन्शनची रक्कमदेखील काढू शकता. ही प्रक्रिया आपल्याला ईपीएफओ कार्यालयात जाऊन पूर्ण करावी लागेल.
कर्मचार्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना सुरू करण्यात आली. अर्थात महागाईच्या तुलनेत पेन्शनची रक्कम खूपच कमी आहे. परंतु कमी उत्पन्नधारकांसाठी ही स्किम उपयुक्त असून ती वृद्धापकाळात आर्थिक आधार ठरू शकते.
महेश यादव