मालमत्तेवरील विमा कशामुळे नाकारतात? - पुढारी

मालमत्तेवरील विमा कशामुळे नाकारतात?

विनिता शाह

नैसर्गिक आपत्ती विशेषत: पूर, भूकंप, आग, तलाव फुटणे यांसारख्या गोष्टींमुळे घराचे नुकसान होऊ शकते. अशा संकटापासून घरांना वाचवण्यासाठी विमा उतरवला जातो; परंतु विमा उतरवताना नैसर्गिक संकटाचा उल्लेख नसेल तर आपला दावा फेटाळला जाऊ शकतो.

प्रॉपर्टी मालक आणि भाडेकरू हे दोघेही घराचा विमा उतरवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, हा विमा आरोग्य आणि जीवन विम्याइतकाच महत्त्वाचा आहे. अतिशय कष्टाने उभारलेल्या वास्तूला संरक्षण देणे गरजेचे आहे. एखाद्या कारणांमुळे मालमत्तेचे नुकसान होत असेल तर विमा कवचमुळे घराचे संरक्षण होऊ शकते. आपला दावा फेटाळला जाऊ नये, यासाठी पॉलिसीशी निगडित नियम आणि अटी चांगल्या रितीने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मालमत्तेशी संबंधित विम्याचे दावे फेटाळण्यामागे काही कारणे असून काही खबरदारी घेऊन ते आपण सहजपणे टाळू शकतो.

दावा कशासाठी फेटाळला जाऊ शकतो

मालमत्तेसाठी विमा उतरवताना आपण ज्या जोखमींचा उल्लेख करत नाही, त्याला विमा कंपनीकडून कवच दिले जात नाही. एक स्टँडर्ड प्रॉपर्टी इन्शूरन्स पॉलिसी ही प्रत्येक प्रकारची जोखीम कव्हर करत नाही. अशा काही पॉलिसी असतात की त्यातून आपल्या मालमत्तेला सुरक्षा मिळेलच असे नाही.

सर्वसाधारणपणे स्टँडर्ड पॉलिसी या आग, चक्रीवादळ, वीज पडणे, हिमस्खलन, धूर, चोरीसारख्या काही जोखमींना कवच प्रदान करतात.
अतिरिक्त हप्ता भरून आपण पॉलिसीला अ‍ॅड ऑन किंवा रायडर जोडू शकता. जसे की पुरापासून बचाव, भूकंप, घराची दुरुस्ती, पाण्यामुळे नुकसान आदीला कवच देऊ शकता.

नैसर्गिक किंवा मानवी संकटामुळे मालमत्तेला नुकसान झाले आणि पॉलिसीत या धोक्याचा समावेश नसेल तर आपला दावा फेटाळला जाऊ शकतो.

जर या कारणाने नुकसान झाले तर

होम इन्शूरन्स पॉलिसीत काही जोखमींचा समावेश करू शकत नाही. या पॉलिसीत युद्ध, अण्वस्त्र हल्ला यामुळे होणारी हानी, प्रदूषण, सरकारकडून होणारी हानी. तसेच जीर्ण घराची पडझड, हिमस्खलन, पक्षी आणि कीटकांपासून होणारे नुकसान, जाणीवपूर्वक झालेले नुकसान आदींमुळे घराची हानी झाल्यास त्यास विमा संरक्षण मिळत नाही. आपल्या मालमत्तेचे या कारणांमुळे नुकसान झाले असेल तर विमा मंजूर होईलच असे नाही.

देखभाल नसेल तर…

आपल्या मालमत्तेची डागडुजी किंवा दुरुस्तीची गरज असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा फटका बसू शकतो. मालमत्तेच्या निरीक्षणासाठी विमा कंपन्यांकडून काही अधिकारी पाठवले जातात. घराच्या तपासणीदरम्यान ते निष्काळजीपणा ओळखतात. त्यामुळे आपला दावा फेटाळण्याची शक्यता अधिक राहते.

जर याकडे लक्ष दिले नाही तर..

बहुतांश पॉलिसीत काही अटी असतात आणि त्याचे पालन नाही केले तर विमा कंपन्यांकडून दावा मान्य केला जाणार नाही. अटींचे काही उदाहरण दिले आहेत. अग्निशामकाच्या नियमानुसार प्रत्येक दरवाजाला सुरक्षा कुलूप, विशेषत: मुख्य दरवाजा कुलूपबंद असणे गरजेचे आहे. ते जर आढळून आले नाही तर दावा फेटाळला जातो.

चुकीची माहिती देणे

कोणत्याही प्रकारच्या पॉलिसीत खरी माहिती न दिल्याने किंवा चुकीची माहिती नमूद केल्याने विमा कंपनीकडून दावा फेटाळण्याची शक्यता अधिक राहते. ही कंपनीची फसवणूक असल्याचे मानले जाते. त्यामुळे विमा उतरवताना सत्य स्थितीची माहिती देणे गरजेचे आहे. किरकोळ चूक असली तरी त्याचा उल्लेख केल्यास भविष्यात होणारे मोठे नुकसान टाळता येऊ शकते.

वेळेवर आणि योग्य रितीने दावा न करणे

सर्वसाधारणपणे आपल्याला दावा करण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. जर पॉलिसीधारकांकडून त्याचे पालन केले गेले नाही तर दावा फेटाळण्याची शक्यता अधिक राहते. आपत्तीनंतर सर्वात अगोदर विमा कंपनीला माहिती देणे गरजेचे आहे. तक्रारीची कालमर्यादा ही पॉलिसीवर आधारित असते.

काळजी न घेतल्यास

आपले प्राथमिक पातळीवर झालेल्या नुकसानीला वेळीच रोखले नाही किंवा हालचाली केल्या नाहीत आणि अशा स्थितीत दावा करत असाल तर मागणी फेटाळण्याची शक्यता अधिक राहते.

Back to top button