‘एमआयएस’ने वाढवा मासिक उत्पन्न | पुढारी

‘एमआयएस’ने वाढवा मासिक उत्पन्न

लघू बचत योजनांवरील व्याजदरात वाढ झाल्यामुळे आता पोस्टाची मंथली इन्कम स्कीम म्हणजेच एमआयएसच्या व्याजदरातदेखील वाढ झाली आहे. ‘एमआयएस’च्या गुंतवणुकीवर आता 7.4 टक्के दराने व्याज दिले जात आहे आणि म्हणून मासिक उत्पन्न मिळवण्याच्या द़ृष्टीने गुंतवणूक करणार्‍या मंडळींसाठी ही योजना आकर्षक झाली आहे. या योजनेत कमाल गुंतवणूक केली, तर यानुसार दरमहा नऊ हजार रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न राहू शकते.

गेल्या काही वर्षांत महागाईचा दर वाढल्याने सामान्यांंचे जीवन अडचणीत आले आहे. वाढत्या महागाईमुळे निवृत्ती वेतनावर अवलंबून असलेल्या लोकांना पेन्शन पुरेशी ठरताना दिसून येत नाही. या आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पोस्टाची मासिक उत्पन्न योजना (एमआयएस) मोलाची ठरू शकते. यात काही रक्कम जमा केल्यास महागाईदराच्या परिणामाला काही अंशी वेसण घालणे शक्य राहू शकते.

ही मासिक उत्पन्न योजना ही भारत सरकारची असून, त्यात एकरकमी पैसे जमा करू शकतो आणि त्यावरच्या व्याजावर दरमहा चांगले पैसे मिळवू शकतो. हे व्याज आपल्याला योजनेचा कालावधी संपेपर्यंत म्हणजे पाच वर्षांपर्यंत मिळत राहील. पाच वर्षांनंतर मूळ रक्कम मिळेल. या योजनेचा सर्वाधिक फायदा म्हणजे गुंतवलेली रक्कम ही पूर्णपणे सुरक्षित राहतेच आणि दरमहा उत्पन्नदेखील सुरू होते. ही योजना कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करता येते.

किती करू शकता गुंतवणूक?

या योजनेत किमान एक हजार रुपये तर कमाल नऊ लाख रुपयांपर्यंत पैसे जमा करता येतात. दोन व्यक्ती संयुक्त रूपाने या योजनेत पैसे जमा करत असतील, तर त्यांना 15 लाख रुपयांपर्यंत पैसे भरता येतात. पंधरा लाखांच्या गुंतवणुकीवर वार्षिक 7.4 टक्के दराने व्याज दिले जात असेल तर वर्षाला 1.11 लाख रुपये व्याज मिळेल. मासिक रूपाने त्याची विभागणी केली तर 9250 रुपये मिळतील. यानुसार गुंतवणूकदारास पाच वर्षांपर्यंत दरमहा 9250 रुपये अतिरिक्त पेन्शन किंवा रक्कम मिळत राहील.

गुंतवणूक कशी करावी?

ही योजना प्रामुख्याने नोकरदार वर्गासाठी तयार करण्यात आली आहे. निवृत्तीनंतर पीएफ आणि ग्रॅच्युईटीची भरभक्कम मिळते. ही रक्कम पुढील चार पाच वर्षांत वापरली जात नसेल, तर या योजनेत गुंतवणूक करून त्याचा लाभ उचलता येईल. निवृत्तीनंतर अनेक जण मुलांचा विवाह, घरखरेदी, परदेश दौरा यावर खर्च करत राहतात. मात्र या गोष्टी कोणत्या ना कोणत्या कारणाने काही वर्षांसाठी पुढे ढकलल्या जात असतील, तर पाच वर्षांसाठी ही रक्कम एमआयएस म्हणजेच मंथली इन्कम स्कीममध्ये गुंतवण्याचा विचार करायला हवा.

गुंतवणूक सुरू कशी करावी?

या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते सुरू करावे लागेल. खाते सुरू झाल्यानंतर मंथली इन्कम स्कीमसाठी वेगळा अर्ज भरून गुंतवणुकीची रक्कमही भरावी लागेल. गुंतविण्यात येणारी रक्कम ही धनादेश किंवा ड्राफ्टच्या माध्यमातून द्यावी लागेल. या योजनेत भारतातील कोणताही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो. अल्पवयीन पाल्याच्या नावावरदेखील खाते सुरू करू शकता. दहा वर्षांवरील मुलाच्या नावावर पालकाच्या देखरेखीखाली खाते सुरू करण्याची सुविधा आहे. शिवाय किमान एक आणि कमाल तीन वयस्क व्यक्तींच्या नावावर संयुक्त खाते सुरू करता येते. कमाल पंधरा लाख रुपये गुंतवणूक करू शकता.

कसे मिळते व्याज?

सरकारकडून लघू बचत योजनांचे व्याजदर तिमाही रूपातून जाहीर केले जाते. एक एप्रिलला घोषित व्याजदर हा तीन महिन्यांसाठी असतो. सध्या 7.4 टक्के व्याज दिले जात आहे. परंतु भविष्यात या योजनेवरचा व्याजदर वाढू शकतो किंवा कमी देखील होऊ शकतो. परंतु आपण ज्या दराने पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली आहे, तोच व्याजदर कायम राहतो. या आधारावर व्याजदर मिळत राहते. नवीन व्याजदर हा नव्या गुंतवणूकदारांना लागू राहतो.

अनिल विद्याधर

Back to top button