अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

* गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांनी आपली वाढ सलग दुसर्‍या सप्ताहातदेखील कायम ठेवली. निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांक एकूण अनुक्रमे 239.40 अंक आणि 841.45 अंकांची वाढ दर्शवून 17599.15 व 59832.97 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 1.38 टक्के आणि सेन्सेक्समध्ये 1.43 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. याच सप्ताहात ‘रिझर्व्ह बँके’ची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक संपन्न झाली. आश्चर्यकारकरीत्या यावेळेला मध्यवर्ती बँकेने व्याजदर (रेपोरेट) जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला.

रेपोरेट सध्या 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मागील 11 महिन्यांमध्ये रेपोरेटमध्ये तब्बल 2.5 टक्क्यांची वाढ करण्यात आली. परंतु आता महागाई नियंत्रणासोबतच अर्थव्यवस्था वाढीलादेखील प्राधान्य देण्याचे रिझर्व्ह बँकेने ठरवले आहे. परंतु व्याजदर वाढीवरील हा विराम तात्पुरत्या स्वरूपाचा असून, किरकोळ महागाई दर (रिटेल इन्फेलेशन) 6 टक्क्यांच्यावरती राहिल्यास पुन्हा व्याजदर वाढ केली जाऊ शकते, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर ‘शक्तिकांत दास’ यांनी केले. आर्थिक वर्ष 2023-24 साठी भारतातील किरकोळ महागईदर (रिटेल इन्फोलेशन) 5.2 टक्के राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.

* आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणार्‍या ‘मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस कंपनी’मध्ये सिंगापूरच्या टेमसेफ होलिग्स कंपनीने 41 टक्के हिस्सा खरेदी केला. यापूर्वी ‘टेमसेक’चा मणिपालमध्ये 18 टक्के हिस्सा होता. परंतु आता या व्यवहारापश्चात हा हिस्सा 59 टक्क्यांवर पोहचला. ‘मणिपाल हेल्थ एंटरप्राईस’चे बाजारमूल्य सध्या 40 हजार कोटी इतके आहे.

* मुकेश अंबानीचा ‘रिलायन्स उद्योग समूह’ लवकरच ‘नॉन बँकिंग फायनान्शियल सेक्टर’मध्ये उतरणार. बँका सोडून ज्या वित्तसंस्था ग्राहकांना कर्जपुरवठा करतात, त्यांना ‘नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी(NBFC)’ असे म्हटले जाते. या व्यवसायात उतरण्यासाठी ‘रिलायन्स स्ट्रॅटेजीक इन्व्हेसमेंट’ ही उपकंपनी मुख्य ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’पासून विलग (Demerge) करण्यात आली आणि याचे नाव बदलून ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ असे करण्यात आले. ‘आयसीआयसीआय (ICICI)’ बँकेचे माजी प्रमुख के. व्ही. कामत या नव्या कंपनीचे नेतृत्व करतील.

* आरोग्य क्षेत्रातील कंपनी ‘मॅन फाईंड फार्मा’ लवकरच भांडवल बाजार (Capite Market) मध्ये उतरणार. ‘आयपीओ’च्या माध्यमातून सुमारे 4500 ते 4700 कोटींचा निधी उभा करण्याची कंपनीची योजना. कंपनीतील सध्याचे गुंतवणूकदार ‘क्रिस कॅपिटल(CRIS Capite)’ आणि मॅनकाईंड फार्माचे प्रवर्तक (Promoters) प्रत्येकी 2.5 टक्के हिस्सा विक्री करतील. तसेच याच कंपनीतील आणखी एक प्रमुख गुंतवणूकदार ‘कॅपिटल इंटरनॅशनल लूप्स’ 5 टक्के हिस्सा ‘क्रिस कॅपिटल’कडे 10 टक्के आणि ‘कॅपिटल इंटरनॅशनल’कडे 11 टक्के हिस्सा आहे.

* पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर. पाकिस्तानमधील व्याजदर थेट 21 टक्क्यांवर पोहोचले. सध्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेकडून 6.5 अब्ज डॉलर्सच्या मदतनिधीची अपेक्षा. पाकिस्तानातील महागाई दर 35.37 टक्क्यांवर पोहोचला. मागील पन्नास वर्षांतील महागाईचा हा उच्चांकी दर आहे. त्याचप्रमाणे एप्रिल 2023 ते जून 2026 या तीन वर्षांत पाकिस्तानने चीन आणि सौदी अरेबियातून 77 अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडणे अपेक्षित आहे.

* आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतींनी पुन्हा उसळी घेतली. आखाती देशांच्या ‘ब्रेंट क्रूड’ने पुन्हा 85 डॉलर प्रती बॅरलचा टप्पा गाठला, तर अमेरिकेच्या ‘डब्लूटीआय (WTI)’ क्रूडने सुमारे 80 डॉलर प्रती बॅरल किमतीचा टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘खनिज तेला’चे भाव चढे ठेवण्यासाठी खनिज तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक प्लस’ने उत्पादन कपातीचा निर्णय घेतला. यामध्ये सौदी अरेबिया आणि रशिया यांनी प्रत्येकी 5 लाख बॅरल्स प्रतिदिन खनिज तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ इराक, दुबई, कुवेत यांनीदेखील 1.5 ते 2 लाख बॅरल्सची उत्पादन कपात जाहीर केली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका आणि युरोप- मधील देश प्रयत्न करत असताना, या प्रयत्नात खोडा घालण्याचे काम तेल उत्पादक देश करत आहेत. असा आरोपदेखील विकसित देशांकडून केला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ‘जो बायडन’ यांनी सौदी अरेबियाला याचा परिणाम भोगण्यास तयार राहण्याचा इशारादेखील दिला.

* सरकारी कंपनी (NMDC) ‘एनएमडीसी’ स्टीलचे खासगीकरण चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत होण्याची शक्यता. केेंद्र सरकार एनएमडीसी स्टीलमधील 50.79 टक्के हिस्सा विक्री करून एकूण 11 हजार कोटींचा निधी उभा करण्याची शक्यता. एनएनडीसी स्टील कंपनीमधील एक हजार कर्मचार्‍यांना मुख्य कंपनी एनएमडीसी लिमिटेडमध्ये सामावून घेतले जाणार.

* गत सप्ताहात बुधवारी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीने 61,181/- रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठला. अमेरिकेमध्ये व्याजदर वाढीचे सत्र थांबून वर्षा अखेरपर्यंत व्याजदर कपात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव उच्चांकी पातळीपर्यंत पोहचले. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढल्यानेदेखील सोन्याचे भाव वाढले.

* दिवाळखोर ‘रिलायन्स कॅपिटल’ या अनिल अंबानीच्या कंपनीची लिलाव प्रक्रिया 16 एप्रिलपर्यंत संपणे अपेक्षित आहे. परंतु रिलायन्स कॅपिटल कंपनीचे कर्जदाते ही प्रक्रिया मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोरंट उद्योग समूह आणि ‘हिंदुजा उद्योग समूह’ यांच्यामध्ये लिलाव प्रक्रियेतील वादामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया रखडली आहे.

* घरगुती सीएनजी, पीएनजी गॅस दरांमध्ये 9-11 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता. पीएनजी, सीएनजी कंपन्यांची किंमत ठरविण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांच्यातील तेजी-मंदीचा परिणाम कमी करून किमती स्थिर ठेवण्याच्या द़ृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

* भारताची विदेश चलन गंगाजळी 31 मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात 329 दशलक्ष डॉलर्सने कमी होऊन 578.4 अब्ज डॉर्लसपर्यंत खाली आली.

Back to top button