निफ्टी व सेन्सेक्स : अर्थवार्ता | पुढारी

निफ्टी व सेन्सेक्स : अर्थवार्ता

प्रीतम मांडके

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांनी आपल्या आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीकडे झेप घेतली. निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांक अनुक्रमे 363.15 अंक व 1293.48 अंक वधारून 17895.2 व 60059.06 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी व सेन्सेक्समध्ये सप्ताहात एकूण 2.07 टक्के व 2.2 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे (बीएसई) भांडवल बाजारमूल्य पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर म्हणजेच 266 लाख कोटींवर पोहोचले. केवळ एका आठवड्यात भांडवल बाजार मूल्य सुमारे 7 लाख कोटींनी वाढले.

* रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर. देशातील व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. रेपो रेट 4 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला. रिझर्व्ह बँकेच्या समितीने सलग आठव्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी 22 मे 2020 ला व्याजदरात बदल करण्यात आला होता. देशातील किरकोळ महागाई दर चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत 5.9 टक्के, तिसर्‍या तिमाहीत 5.3 टक्के तर चौथ्या तिमाहीत 5.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 9.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

* अखेर एअर इंडियाला टाटा समूहाकडे सोपवण्याचा निर्णय. टाटा समूहाने 18 हजार कोटींना एअर इंडिया विकत घेतली. अजयसिंग यांच्या स्पाईस जेटतर्फे 15,100 कोटींची बोली लावण्यात आली होती. एअर इंडियासाठीची राखीव किंमत सरकारतर्फे 12,906 कोटी ठेवण्यात आली होती. एअर इंडियावर एकूण 61,562 कोटींचे कर्ज आहे. यामधील 15,300 कोटींच्या कर्जाची जबाबदारी टाटा समूहातर्फे घेतली जाणार. तसेच 2700 कोटी रुपये सरकारला दिले जाणार. डिसेंबर 2021 अखेर संपूर्ण व्यवहार पूर्ण केला जाणार. पुढील 1 वर्षासाठी टाटा समूहाला एअर इंडियामध्ये किमान 51 टक्के हिस्सा ठेवणे बंधनकारक. तसेच एअर इंडिया व एअर इंडिया एक्स्प्रेसच्या 13,500 कर्मचार्‍यांसाठी पुढील एक वर्षासाठी रोजगाराची हमी देण्यात आली. एअर इंडियाची पुन्हा टाटा उद्योग समूहामध्ये घरवापसी झाल्यामुळे रतन टाटांनी समाधान व्यक्त केले.

* रिझर्व्ह बँकेने रोखे खरेदीस विराम देण्याचा निर्णय जाहीर केला. मागील सहा महिन्यात तब्बल 2.37 लाख कोटी रिझर्व्ह बँकेने भारतीय बाजारात आणले. 10 वर्षे कालावधीच्या सरकारी रोख्यांचा व्याजदर थेट 6.10 टक्क्यांवरून 6.3178 टक्क्यांपर्यंत चढला. यापुढे देखील मंदीच्या काळात गरज पडल्यास मदत म्हणून लिक्विडीटी (तरलता) वाढवण्यासाठी रोखे खरेदीचा मार्ग मोकळा असल्याचे देखील रिझर्व्ह बँक गव्हर्नर ‘शक्तिकांता दास’ यांनी स्पष्ट केले. सध्या अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यास प्राधान्य असून कोणतेही धक्कादायक अथवा स्तिमित करणारे निर्णय घेणार नसल्याचे गव्हर्नरकडून स्पष्ट करण्यात आले.

*‘डिजिटल इंडिया’ मोहिमेस प्रोत्साहन देण्याच्या द़ृष्टीने इंटरनेटशिवाय डिजिटल पेमेंटचे व्यवहार करता येईल का, याद़ृष्टीने रिझर्व्ह बँकेची चाचपणी. तसेच ऑनलाईन पैसे पाठवण्याची सेवा असलेल्या ‘आयएमपीएस’ची 2 लाखांची मर्यादा वाढवून 5 लाख करण्यात आली.

* तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक प्लस’ने उत्पादनातील वाढ ठरल्याप्रमाणे ‘4 लाख बॅरल प्रतिमहिना’ या वेगानेच करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. जगभरातील मागणी लक्षात घेता ही वाढ अपुरी आहे. असे भारतासारख्या तेल आयात करणार्‍या देशांचे म्हणणे. या टंचाईमुळे ब्रेंटक्रुड या कच्च्या तेलाचा दर 83 डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचला. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पेट्रोलचे दर 109 रुपये, तर डिझेलचे दर 98 रुपयांच्या जवळपास पोहोचले. रुपया चलनदेखील डॉलरच्या तुलनेत 20 पैसे कमजोर होऊन 74.99 रुपये प्रती डॉलरच्या स्तरावर बंद झाले.

* झी एंटरटेन्मेंट आणि त्यातील गुंतवणूकदार इन्व्हेस्को यांच्यातील वाद टोकाला. इन्व्हेस्को आडमार्गाने झी कंपनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची ‘झी’चा आरोप. इन्व्हेस्कोचा ‘झी’ कंपनीमध्ये 17.88 टक्क्यांचा हिस्सा. ‘द नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल’ या सरकारी संस्थेकडे या वादावर उत्तर देण्यासाठी ‘झी’ कंपनीला 22 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

* सप्टेंबर तिमाहीत ‘टीसीएस’चा नफा 14.1 टक्के वधारून 9,624 कोटी झाला. महसुलात 3.2 टक्क्यांनी वाढ होऊन महसूल 46,8767 कोटी झाला.

* ‘मोबिक्विक’ या ई-वॉलेट असणार्‍या कंपनीला आयपीओद्वारे भांडवल बाजारात उतरण्यास ‘सेबी’ची मान्यता. एकूण 1900 कोटी रुपये उभे करण्याचा कंपनीचा मानस.

* ‘एलआयसी’मध्ये 20 टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता देण्याचा केंद्र सरकारचा विचार.

* भारताची परकीय गंगाजळी 1 ऑक्टोबर रोजी संपलेल्या सप्ताहाअखेर 1.169 अब्ज डॉलर्सनी घटून 637.477 अब्ज डॉलर्स झाली.

Back to top button