Stock Market Crash | सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना ३ लाख कोटींचा फटका, जाणून घ्या घसरणीमागची कारणे? | पुढारी

Stock Market Crash | सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना ३ लाख कोटींचा फटका, जाणून घ्या घसरणीमागची कारणे?

Stock Market Crash : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या भूमिकेमुळे कर्जदार चिंतेत आहेत. या जागतिक कमकुवत संकेतांचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले. आज शुक्रवारी (दि.१०) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल ८०० अंकांनी कोसळून ५९ हजारांपर्यंत खाली आला. तर निफ्टी १७,४०० च्या खाली आला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्सची घसरण ९०० अंकांजवळ गेली होती. सेन्सेक्स ६७१ अंकांच्या घसरणीसह ५९,१३५ वर बंद झाला. तर निफ्टी १७६ अंकांनी घसरून १७,४१२ वर स्थिरावला. आज सर्व क्षेत्रात विक्री दिसून आली. सेन्सेक्सच्या आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना ३ लाख कोटींचा फटका बसला. सर्व बीएसई सूचीबद्ध स्टॉक्सचे बाजार भांडवल २६१.२४ लाख कोटींवर आले आहे. (Stock Market Crash)

अदानींच्या ‘या’ शेअर्सला फटका

अदानी एंटरप्रायजेसचा शेअर आज ६.७ टक्क्यांपर्यंत घसरला. काल हा शेअर ४.२ टक्क्यांनी घसरून बंद झाला होता. याचाच अर्थ दोन दिवसांत हा शेअर सुमारे ११ टक्क्यांने खाली आला आहे. अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी हे शेअर्स ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये आहेत. एनडीटीव्ही, अदानी विल्मर आणि अंबुजा सिमेंट्स यांची कामगिरी आज बाजारात समाधानकारक नव्हती.

हे होते टाॅप लूजर्स

सेन्सेक्सवर आयसीआयसीआय, बजाज फायनान्स, एल अँड टी, बजाज फिनसर्व्ह हे टॉप लूजर्स होते. हे शेअर्स १.५ टक्क्यांपर्यंत घसरले. टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, इन्फोसिस आणि ॲक्सिस बँक हेदेखील घसरले. टाटा मोटर्स आणि भारतीय एअरटेल यांनी वाढून व्यवहार केला.

‘या’ बँकिंग स्टॉक्सचे नुकसान

आजच्या व्यवहारात युनियन बँक, यूको बँक आणि कॅनरा बँक यांना सर्वाधिक फटका बसला. हे शेअर्स ३ टक्क्यांपर्यंत घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांत PSU बँक सुमारे २ टक्के आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस १.६९ टक्क्यांने खाली आला. मेटल, फार्मा, रिअल्टी, consumer durables, एफएमसीजी आणि IT यांचेदेखील नुकसान झाले आहे. Nifty PSU Bank मध्ये कॅनरा बँक (-३.४० टक्के), युनियन बँक ऑफ इंडिया (-२.३५ टक्के), बँक ऑफ बडोदा (-२.०१ टक्के), पंजाब नॅशनल बँक (-१.८७ टक्के), पंबाज अँड सिंध बँक (-१.६० टक्के), स्टेट बँक ऑफ इंडिया (-१.६८ टक्के), बँक ऑफ इंडिया (-१.७० टक्के), इंडियन बँक (-१.५२ टक्के), बँक ऑफ महाराष्ट्र (-१.६६ टक्के), इंडियन ओव्हरसीज बँक (-१.८१ टक्के), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (-१.३१ टक्के), युको बँक (-१.४८ टक्के) हे शेअर्स घसरले होते.

कमकुवत जागतिक संकेत

फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या संकेतांमुळे अमेरिकेतील शेअर बाजार गडगडला. एस अँड पी ५०० निर्देशांक आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज २ टक्क्यांने खाली आला. नॅस्डॅक कंपोझिट २ टक्क्यांहून अधिक घसरला. आशियाई बाजारातही शुक्रवारी कमकुवत स्थिती होती. जपानचा निक्केई १.६७ टक्के खाला आला. चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँककाँगचा हँग सेंग देखील घसरला. हँग सेंगने २.६ टक्के घसरून व्यवहार केला. (Stock Market Crash) या जागतिक कमकुवत संकेतांचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारातही घसरण झाली.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीवर जोर

एक्सचेंज डेटानुसार, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) गुरुवारी भांडवली बाजारात निव्वळ विक्रेते होते. काल त्यांनी दिवसभरात ५६१.७८ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

हे ही वाचा :

Back to top button