गेल्या काही आठवड्यात अदानी उद्योग समूहाच्या समभागांत मोठी घसरण झालेली दिसली. यातील काही टक्के पडझड एकाच दिवसांत झाली. ती त्याहूनही अधिक झाली असती; परंतु लोअर सर्किट लावलेले असल्याने ती टळली.
शेअर बाजाराशी संबंधित बातम्यांमध्ये अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट असे शब्द कानावर पडतात. अनेकदा याबाबत नेमकेपणाने गुंतवणूकदारांनाही कल्पना नसते. तेजीला वेसण घालण्यासाठी 'अप्पर' सर्किट, तर घसरणीला मर्यादित ठेवण्यासाठी 'लोअर' सर्किट. ठरावीक दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली किंवा बाजाराने उसळी घेतल्यास लोअर किंवा अप्पर सर्किट लावले जाते. शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्यास लोअर सर्किट लावले जाते. कमी कालावधीमध्ये सर्वच शेअर्सचे भाव गडगडल्यास लोअर सर्किट लावले जाते. लोअर सर्किट म्हणजे एका ठरावीक किमतीपेक्षा कमी दराला शेअर्स विकण्यावर बंदी घालण्यात येते. त्यामुळे शेअर बाजारामध्ये आणखी पडझड होत नाही.
बाजार कधी सुरू होतो?
निर्देशांकाला सर्किट लागल्यास बाजाराचे व्यवहार थांबवले जातात. बाजार पुन्हा सुरू करताना पंधरा मिनिटाचा प्री-ओपन सत्र आखण्यात येते. शेवटी सामान्य स्तरावर बाजार सुरू होतो आणि हा बाजार पुढील सर्किट लागेपर्यंत किंवा सत्राच्या शेवटपर्यंत लागूू राहतो.
सर्किट कशामुळे वापरतात?
बाजाराचा मोठा झटका गुंतवणूकदारांना बसू नये, यासाठी सर्किटची पातळी शेअर बाजाराकडून निश्चित केली आहे. गुंतवणूकदार आणि ब्रोकरचे हित पाहूनच सर्किटचे नियोजन करण्यात आले आहे. बाजाराच्या चढ-उताराच्या काळात व्यावसायिकांना आर्थिक फटके बसतात. अशावेळी बाजारावर दबाव वाढत जातो.
केव्हापासून अंमल?
भारतीय शेअर बाजारात अप्पर आणि लोअर सर्किटचे नियोजन 28 जून 2001 नंतर सुरू झालेे. त्यादिवशी सेबीने सर्किट ब्रेकरची व्यवस्था केली होती. ही व्यवस्था लागू केल्यानंतर त्याचा पहिला वापर 17 मे 2004 रोजी केला होता.
लोअर सर्किट म्हणजे काय?
एखाद्या शेअरचे मूल्य काही कारणांमुळे कमी होत असेल, तर गुंतवणूकदार ते शेअर विकण्याचा विचार करतो. आपल्यासारखे अन्य गुंतवणूकदार देखील असाच विचार करत विक्रीचा सपाटा लावतात. त्यामुळे शेअरचे मूल्य तळाला पोहोचू शकते. म्हणूनच शेअरच्या मूल्यांची एका मर्यादेपर्यंतच घसरण व्हावी, यासाठी एनएसई आणि बीएसईने काही नियम केले आहेत. यानुसार एखाद्या कंपनीच्या शेअर विक्रीचा मारा सुरू झाल्यानंतर त्याचे मूल्य एखाद्या मर्यादेपर्यंतच घसरेल आणि त्यानंतर त्याची ट्रेडिंग बंद होईल. मूल्य घसरण्याची जी मर्यादा आखून दिली आहे. त्याला लोअर सर्किट असे म्हणतात.
सर्किट नियम कोणते?
शेअरप्रमाणेच सेन्सेक्स किंवा निफ्टीसारख्या निर्देशांकांनादेखील सर्किट लिमिट असते. निर्देशांकात दुपारी एकच्या आत 15 टक्के घसरण होत असेल, तर बाजार दोन तासांसाठी थांबवला जातो. यात सुरुवातीला 1 तास 45 मिनिटे बाजार संपूर्णपणे रोखण्यात येतो. त्यातील पंधरा मिनिटांचे प्री-ओपन सेशन असते. 15 टक्के सर्किट दुपारी 1 नंतर लागले, तर एक तासासाठी कारभार थांबवला जातो. यात सुरुवातीचे 45 मिनिटे हा संपूर्णपणे थांबवला जातो आणि पंधरा मिनिटे प्री-ओपन सेशन असते. दुपारी अडीचनंतर पंधरा टक्क्यांचे लोअर सर्किट लागले, तर बाजार बंद होईपर्यंत ते कायम ठेवण्यात येते.
अप्पर सर्किट म्हणजे काय?
अप्पर सर्किट समजून घेण्यासाठी एक उदाहरण सांगता येईल. आपल्याकडे असलेल्या एखाद्या शेअरचा नफा खूप वाढत असेल किंवा अन्य कोणत्या कारणांमुळे संबंधित कंपनीत गुंतवणूक करण्याचा ओढा वाढू लागला, तर अशावेळी कंपनीच्या शेअरमध्ये विक्रमी वाढ होऊ लागते. अशावेळी एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत कल्पेनेपेक्षा अधिक होते. या स्थितीचा सामना करण्यासाठी शेअर बाजारात अप्पर सर्किटचे नियोजन करण्यात आले आहे. या आधारावर निश्चित मूल्यांपर्यंत शेअरची किंमत पोहोचल्यास अप्पर सर्किट लागते आणि त्याचे ट्रेडिंग बंद होते.
संदीप पाटील