अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये एकूण अनुक्रमे 87.70 अंक व 318.87 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 17944.2 अंक व 61002.57 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.49 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 0.53 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. केवळ सप्ताहाअखेर शुक्रवारच्या सत्राचा विचार करता निफ्टीमध्ये 91.65 अंक (0.51 टक्के) तसेच सेन्सेक्समध्ये 316.94 अंक (0.52 टक्के) घट नोंदवण्यात आली. या सप्ताहात जानेवारी महिन्यातील भारतातील घाऊक तसेच किरकोळ महागाई दराचे आकडे जाहीर झाले. घाऊक महागाई दर मागील 24 महिन्यांच्या नीचतम स्तरावर म्हणजे 4.73 टक्क्यांपर्यंत खाली आला. घाऊक महागाई दर खाली आला तरी किरकोळ महागाई दर (रिटेल इन्फ्लेशन) रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या नियंत्रण रेषेपलीकडे म्हणजेच 6.52 टक्क्यांवर पोहोचला.

सध्या किरकोळ महागाई दर 4 ते 6 टक्क्यांदरम्यान नियंत्रणात ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे लक्ष्य आहे. या सप्ताहात सर्वाधिक वाढ दर्शविणार्‍या समभागामध्ये टेक महिंद्रा (11.14 टक्के), यूपीएल (7.40 टक्के), ओएनजीसी (7.11 टक्के), या कंपन्यांच्या समभागांचा समावेश झाला. तसेच सर्वाधिक घटणार्‍या समभागांमध्ये येसबँक (4.45 टक्के), इंडियाबुल्स हाऊसिंग (4.44 टक्के), इंडसिंड बँक (4.22 टक्के) या कंपन्यांच्या समभागांचा समावेश झाला. नुकताच केंद्र सरकारने 33 हजार कोटींचा निधी (फंड) स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. रोखेबाजारात मंदीच्या काळात अचानक तरलता (पॅनिक सेलिंग) काही मोठ्या संस्थेचे रोखे डिफॉल्ट झाल्यास घबराट आणखी वाढते. यावर उपाय म्हणून या निधीची स्थापना करण्यात येणार असून, 33 हजार कोटींमधील 90 टक्के निधी केेंद्र सरकार पुरवणार आहे. रोखे बाजाराच्या द़ृष्टीने ही दिलासादायक बाब आहे.

भारताची व्यापार तूट जानेवारी महिन्यात 12 महिन्यांच्या नीचतम पातळीवर म्हणजेच 17.75 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. जानेवारी महिन्यात आयात 3.36 टक्के घटून 52.57 अब्ज डॉलर्सवरून 50.66 अब्ज डॉलर्सवर आली, तर निर्यात 6.58 टक्के घटून 35.23 अब्ज डॉलर्सवरून 32.91 अब्ज डॉलर्सवर खाली आली. व्यापार तूट आयात व निर्यात दोन्ही घटणे हे जगातील मंदीचे निदर्शक असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत.

टाटा समूहाकडून ‘एअर इंडिया’ या भारतीय विमान प्रवासी वाहतुकीच्या कंपनीची उत्तुंग भरारी. विमान बनवणार्‍या एअरबस कंपनीकडून 250 विमाने, तर बोईंग कंपनीकडून 220 विमानांची मागणी (ऑर्डर) नोंदवण्याचा जागतिक विक्रम. एअरबस कंपनीकडून 35 अब्ज डॉलर्स, तर बोईंगकडून 34 अब्ज डॉलर्सची एकूण 470 विमाने खरेदी केली जाणार. सर्वाधिक विमाने खरेदी करण्याचा विक्रम यापूर्वी ‘अमेरिकन एअरलाईन्स’ कंपनीकडे होता. दशकभरापूर्वी या कंपनीने एकाच वेळी 460 विमाने खरेदी केली होती. जागतिक पातळीवर महासत्ता म्हणून उदयास येणार्‍या भारताचे हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी टाटा समूहाचे महत्त्वाचे पाऊल. अमेरिकास्थित बोईंग कंपनी आणि फ्रान्सची एअरबस कंपनी या दोन्ही कंपन्यांचे प्रमुख तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ‘इमॅन्युअल मॅक्रॉन’ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘जो बायडन’ यांनी या ऐतिहासिक व्यवहाराचे (डील) स्वागत केले.

डिसेेंबर तिमाहीमध्ये देशातील तिसर्‍या क्रमांकाची दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडियाला 7990 कोटींचा तोटा. कंपनीवर असलेल्या कर्जाचा भार 2.3 लाख कोटींवर पोहोचला. कंपनीच्या महसूलात किरकोळ वाढ होऊन महसूल 10620.6 कोटी झाला. प्रतिग्राहक सरासरी महसूल केवळ 3.1 टक्के वधारून 133 रुपयांवर पोहोचला. एअरटेलसाठी हा महसूल तब्बल 193 रुपये, तर जिओसाठी1782 रुपये आहे. यापूर्वी सरकारी कर थकवल्याने एकूण 16100 कोटी रुपयांचा हिस्सा कंपनीतर्फे सरकारला इक्विटी स्वरूपात विकण्यात आला. 2025 पर्यंत एकूण 43 हजार कोटी कर स्वरूपात सरकारला देणे अपेक्षित आहे. परंतु सद्य:स्थिती पाहता, कंपनी पुन्हा एकदा सरकारला हिस्सा विक्री (इक्विटी डायल्यूशन) करण्याची शक्यता आहे.

डीबी पॉवर कंपनीला खरेदी करण्याचा अदानी पॉवरचा करार रद्द मागील वर्षी डीबी पॉवर खरेदी करण्यासाठी एकूण 7017 कोटींचा अदानी पॉवरने केला होता. हा करार अंमलात आणण्याची अंतिम तारीख ऑगस्ट 2022 पासून चार वेळा पुढे ढकलण्यात आली. तसेच अमेरिकेची महत्त्वाची पतमानांकन संस्था ‘एस अ‍ॅड पी’ने अदानी ट्रान्समिशन कंपनीचे ‘ईएसजी’ पतमानांकन ‘पुनरावलोकन’ यादीमध्ये समाविष्ट केले. पतमानांकन खाली घसरल्यास संबंधित कंपनीला बाजारातून कर्ज पैसे उभा करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. तसेच अधिक व्याजदराने पैसा उभा करावा लागतो.

‘एचडीएफसी लिमिटेड’ रोख्यांमार्फत (कॉर्थोरेट बाँड) 25 हजार कोटींचा निधी उभा केला. एखाद्या खासगी कंपनीमार्फत बाँडद्वारे (प्रायव्हेट कॉर्पोरेट बाँड इश्यू) हा उभा केलेला सर्वाधिक मोठा रोखेनिधी आहे. 25 हजार कोटींच्या निधीसाठी एकूण 92 बोली लागल्या (बिडस् रिसिव्ह). एकूण बोलींची किंमत 27863 कोटी होती. यामध्ये एलआयसीसह इतर इन्श्युरन्स कंपनी, बँका, म्युच्युअल फंड, पेन्शन फंड यांनी भाग घेतला.

देशातील महत्त्वाची एफएमसीजी कंपनी ‘नेस्ले इंडिया’चा डिसेेंबर तिमाहीतील नफा मागील वर्षीच्या तुलनेत 66 टक्के वधारून 628 कोटी झाला. विक्रीत 13.6 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 4257 कोटींवर पोहोचला.

टाटा स्टील कंपनी धातू उत्पादन क्षेत्रातील संबंधित 7 उपकंपन्यांचे टाटा स्टीलमध्ये विलीनीकरण 2024 पर्यर्ंत करणार. यामध्ये टाटा मेटालिक्स, टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया, टीआरएफसारख्या 7 कंपन्यांचा समावेश आहे.

आदित्य बिर्ला समूहाची महत्त्वाची कंपनी ग्रासीमचा डिसेंबर तिमाहीचा नफा 44 टक्के वधारून 2516 कोटी झाला. तसेच कंपनीच्या महसूलात 17 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 24.402 कोटींवरून 28,638 कोटींवर पोहोचला.

10 फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी (फॉरेक्स रिझर्व्ह) 8.3 अब्ज डॉलर्सनी घटून 566 अब्ज डॉलर्सपर्यर्ंत खाली आली. यापूर्वी 1 एप्रिल 2022 रोजी सर्वाधिक मोठी 11.2 अब्ज डॉलर्सची घट नोेंदवली गेली होती.

Back to top button