अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये एकूण अनुक्रमे 423.30 अंक व 1290.87 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 17604.35 व 59330.9 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 2.23 टक्के, तर सेन्सेेक्समध्ये 2.13 टक्क्यांची घट नोंदवली गेली. या सप्ताहात अमेरिकेच्या ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या संस्थेने अदानी समूहातील कंपन्यांच्या ताळेबंदासंबंधी काही प्रश्न उपस्थित केले. याची परिणिती समूहाच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण होण्यात झाली. अदानी समूहातील कंपन्यांचे एकूण भांडवल बाजारमूल्य सप्ताहाच्या अखेरच्या दोन सत्रात तब्बल 4.17 लाख कोटींनी कमी झाले. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक असणार्‍या एलआयसीला याचा जबर फटका बसला.

गत सप्ताहात मंगळवारी ‘एलआयसी’चा अदानी समूहातील असलेल्या हिश्श्याची किंमत 72,193 कोटींवरून दोनच दिवसात 22 टक्के म्हणजेच 16,627 कोटींनी घटून शुक्रवारी 55,565 कोटींर्पंत खाली आली. यामुळे ‘एलआयसी’ कंपनीचा समभागदेखील सुमारे 5 टक्क्यांनी खाली आला. अदानी एंटरप्राईझ सध्या अदानी समूहावर 1.9 लाख कोटींचे एकूण कर्ज असून, यामध्ये एलआयसीसोबत सरकारी बँकांनीदेखील कर्ज दिले आहे. यामुळे शुक्रवारच्या सत्रात यामुळे ‘बँक निफ्टी’ निर्देशांक सुमारे 3.13 टक्के गडगडला. जगभरात आयटी क्षेत्रात मंदीचे संकेत मिळाल्याने यापूर्वीच बाजारात नकारात्मक वातावरण होेते. यामध्ये अदानी समूहावरील प्रतिकूल अहवालाने भर घातली. परिणामी शुक्रवारच्या सत्रात भारतीय भांडवल बाजारमूल्य तब्बल 10.73 लाख कोटींनी घटले.

हिंडेनबर्ग ही एक विक्री करून नफा कमावणारी शॉर्ट सेलर संशोधक संस्था असून कंपन्यांची अफरातफरीची प्रकरणे उजेडात आणण्याचे काम करते. सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असणारी कागदपत्रे आणि कंपन्यांची अंतर्गत माहिती यावर अवलंबून मग आर्थिक क्षेत्रातील गैरव्यवहार उघडकीस आणते. या कंपनीचे एकूण 10 गुंतवणूकदार असून, एक अहवाल प्रकाशित करण्यासाठी सुमारे 6 महिन्यांचा कालावधी घेते. दखल घेण्याजोग्या प्रकरणांमध्ये सप्टेंबर 2020 मध्ये ‘निकोला कॉर्पोरेशन’ची फसवणूक तसेच 2021 मध्ये प्रसिद्ध झालेला क्लोव्हर हेल्थ कंपनीसंबंधी अहवाल तसेच ऑनलाईन सट्ट्यासंबंधी ड्राफ्टिंग कंपनीचा फसवणूक अहवाल या प्रकरणांचा समावेश होतो. 2017 साली स्थापन झालेल्या या कंपनीचे नथन अँडरसन हे संस्थापक असून कंपनीचे प्रमुख कार्यालय न्यूयॉर्क अमेरिका येथे आहे. नकारात्मक अहवाल प्रकाशित करण्यापूर्वी हिंडेनबर्ग कंपनी स्वतः त्यासंबंधित कंपनीच्या समभागांमध्ये विक्रीची पोझिशन (शॉर्टसेलिंग) घेते तसेच अहवाल सार्वजनिक करण्यापूर्वी हा अहवाल हिंडेनबर्गच्या गुंतवणूकदारांनादेखील पाठवते. त्यामुळे नकारात्मक अहवाल प्रसिद्ध झाल्यावर हिंडेनबर्ग कंपनी तसेच तिच्या गुंतवणूकदारांना नफा होतो. हिंडेनबर्ग रिसर्चने नुकताच अदानी उद्योग समूहासंदर्भात 106 पानांचा एक अहवाल प्रसिद्ध केला.

या अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात आला. यामध्ये ताळेबंदात असलेल्या अनेक त्रुटींवर बोट ठेवण्यात आले. समभागांची किंमत वाढत राहावी यासाठी अनेक नियमबाह्य मार्गांचा अवलंब करणे तसेच कंपनीअंतर्गत प्रशासकीय बाबींमधील गैरव्यवस्थापनावर भाष्य करण्यात आले आहे. अदानी उद्योग समूहाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. परंतु या सर्वांचा नकारात्मक परिणाम अदानी उद्योग समूहाच्या कंपन्यांच्या समभागांवर झाला. सर्व कंपन्यांचे समभाग शुक्रवारच्या सत्रात 5 ते तब्बल 20 टक्क्यांपर्यंत खाली आले.

केवळ दोनच दिवसात अदानींची संपत्ती थेट 29 अब्ज डॉलर्सनी कमी झाली. तसेच अदानी समूहाचे एकूण भांडवल बाजारमूल्य 48 अब्ज डॉलर्स (4.17 लाख) कोटींनी कमी झाले. परंतु हिंडेनबर्ग ही एक समभाग विक्री करून नफा कमवणारी (शॉर्ट सेलर) कंपनी असून अदानींचे समभाग खाली आणून नफा कमावण्याच्या उद्देशाने हा अहवाल प्रसिद्ध केल्याचा आरोपदेखील या संशोधन कंपनीवर करण्यात येत आहे. नेट अँडरसन (हिंडेनबर्गचे प्रमुख) यांनी सध्या अदानी समूहाचे समभाग विक्री (शॉर्ट सेलिंग) करत असल्याचे जाहीर केले आहे. या अहवालामुळे अदानी समूहाचा 20 हजार कोटींचा एफपीओदेखील अडचणीत सापडला आहे. एफपीओच्या पहिल्या दिवशी केवळ 1 टक्का नोंदणी (सब्स्क्रीप्शन) झाली.

गत सप्ताहात नकारात्मक वातावरणात काहीसा दिलासा देणारी घटना म्हणजे ‘टाटा मोटर्स’ कंपनी तब्बल सात तिमाहीनंतर नफ्यात परतली. डिसेंबर तिमाहीत टाटा मोटर्सचा नफा 3043 कोटींवर पोहोचला. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 1451 कोटींचा तोटा झाला होता. कंपनीचा एकूण महसूल मागील वर्षीच्या तुलनेत 23 टक्क्यांनी वधारून 87,783 कोटी झाला.

‘आयडीबीआय बँक’चा तिसर्‍या तिमाहीतील नफा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 60 टक्के वधारून 927 कोटी झाला. एकूण कर्ज वितरणात (ग्रॉस अ‍ॅडव्हान्सेस) 18 टक्के वाढ होऊन कर्जवितरण 1.47 लाख कोटींवर पोहोचले. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 23 टक्के वधारून 2925 कोटी झाले. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 21.68 टक्क्यांवरून 13.82 टक्के झाले. निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 1.81 टक्क्यांवरून 1.07 टक्के झाले.

टाटांच्या आधिपत्त्याखाली येऊन ‘एअर इंडिया’ला 1 वर्ष पूर्ण. एअर इंडिया आजपर्यंतची जगातील सर्वात मोठी विमानांची ऑर्डर देण्यास सज्ज. एकूण सुमारे 70 अब्ज डॉलर्सची सुमारे 500 विमानांची मागणी ‘एअरबस’ आणि ‘बोईंग’ या विमान उत्पादक कंपन्यांकडे नोंदवणार.

‘भारतीय स्पर्धा आयोग’ (सीसीआय) या सरकारी संस्थेने गुगलवर आकारलेल्या दंडाबाबत दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दर्शवल्यावर गुगलने अँड्रॉईड पॉलिसीमध्ये ‘सीसीआय’शी संलग्न नियमांना अनुसरून बदल करण्याचे ठरवले. काही सशुल्क अ‍ॅप्सना गुगल प्ले-स्टोरमध्ये प्राधान्य दिल्याचा गुगलवर ठपका ठेवण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यापुढे मोबाईल निर्मिती करणार्‍या कंपन्यांना त्यांचे गुगल अ‍ॅप प्री-इन्स्टॉल करण्याचे व त्यासंबंधी परवाना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले.

मोबाईल कंपन्यांना ‘टॉवर्स’ची सुविधा पुरवणारी ‘इंडस टॉवर्स’ कंपनीला चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत 708 कोटींचा तोटा. व्होडाफोन-आयडिया कंपनीकडून इंडस टॉवर्सला 7000 कोटींचे येणे बाकी. या तिमाहीत कंपनीने सुमारे 2298.1 कोटींचे कर्ज बुडीत जाण्याचा अंदाज व्यक्त करून यासाठी तरतूद केली आहे. काही प्रमुख ग्राहकांकडून पैसे न आल्याने ही तरतूद करण्याची वेळ इंडस टॉवर्सवर आली.

देशातील महत्त्वाची दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटोचा डिसेंबर तिमाहीचा नफा 23 टक्के वधारून 1491 कोटींवर पोहोचला. कंपनीचे मार्जिन्स आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे 19.1 टक्क्यांपर्यंत पोहोचले. एकूण महसूल 3 टक्के वधारून 9315 कोटी झाले.

‘अ‍ॅपल’ या आंतरराष्ट्रीय फोन उत्पादक कंपनीच्या एकूण उत्पादनापैकी 25 टक्के उत्पादन भारतात करण्याचा कंपनीचा मानस. फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगास्ट्रॉन या मोबाईल उत्पादन करणार्‍या कंपन्या भारतात आपली उत्पादन क्षमता वाढवणार. अ‍ॅपल फोन उत्पादनासाठी चीनवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी कंपनीचा निर्णय, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची माहिती.
को-लोकेशन सर्व्हरप्रकरणी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला (एनएसई) ‘द सिक्युरिटीज अ‍ॅपेलेट ट्रिब्युनल’ या न्यायाधिकरणाकडून दिलासा.

काही ब्रोकर्सना स्टॉक एक्स्चेंजच्या सर्व्हर्सद्वारे अधिक वेगाने विदा (डाटा) उपलब्ध करून दिल्याचा ठपका एनएसईवर ठेवण्यात आला. या प्रकरणी 624 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला. परंतु सेबीच्या या आदेशास स्थगिती देऊन 100 कोटी ‘इन्व्हेस्टर प्रोटेक्शन अँड एज्युकेशन’ फंडकडे जमा करण्याचे आदेश ‘एनएसई’ला न्यायाधिकरणाने दिले.

भारताची परकीय गंगाजळी 20 जानेवारी रोजी संपलेल्या सप्ताहात 1.7 अब्ज डॉलर्सनी वधारून 573.7 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली.

Back to top button