Investment trend : गुंतवणुकीचा कल बदलतोय... | पुढारी

Investment trend : गुंतवणुकीचा कल बदलतोय...

देशात सध्या सोने, जमीन, स्थावर मालमत्ता यातील गुंतवणुकीऐवजी म्युच्युअल फंड, शेअर, विमा यासारख्या आर्थिक साधनांत गुंतवणूक करण्याचा ट्रेंड (Investment trend) वाढला आहे. हा कल असाच राहिला तर यातील गुंतवणूक ही येत्या पाच वर्षांत जीडीपीच्या तीन चर्तुथांश म्हणजे 74 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

एका अहवालानुसार 2021-22 या आर्थिक वर्षात पहिल्यांदा एकूण घरगुती बचतीचा निम्म्यापेक्षा अधिक भाग (52.5 टक्के) हा विविध आर्थिक साधनांत वळविण्यात आल्याचे दिसून आले आहे.

भारतात गुंतवणुकीचा नवीन ट्रेंड (Investment trend) विकसित होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा (2021-22) प्रथमच देशातील नागरिकांच्या एकूण बचतीतील निम्मी रक्कम विविध आर्थिक उत्पादनांत गुंतवल्याचे आढळून आले आहे. क्रिसीलच्या अहवालात यासंदर्भातील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अहवालानुसार, देशातील एकूण बचतीच्या दोन तृतीयांश बचतीने आपला मार्ग बदलला आहे. एवढेच नाही, तर कोरोनासारख्या बिकट काळातही म्हणजे 2020-21 या आर्थिक वर्षात देशातील 78.5 टक्के गुंतवणूक ही आर्थिक साधनांतच झाल्याचे निदर्शनास आले आहे.

भारतातील गुंतवणूकदार (Investment trend) हे पै न पै जमवून बचत केलेला पैसा सुरक्षित राहावा यासाठी रिअल इस्टेट, सोने आणि बँकेतील मुदत ठेवीला प्राधान्य देतात, अशी आजवरची धारणा होती. मात्र बदलत्या काळानुसार गुंतवणुकीचा ट्रेंडही बदलला आहे. गेल्या काही वर्षांत बचतीच्या द़ृष्टिकोनातून भौतिक साधनांच्या खरेदीत घट झाल्याचे दिसत असून, त्याऐवजी आर्थिक साधनांत गुंतवणुकीचा कल वाढला आहे.

2021-22 या आर्थिक वर्षात नागरिकांनी आपल्या एकूण बचतीचा निम्मा पैसा (52.5 टक्के) विविध आर्थिक उत्पादनात वळविला. अनेक वर्षांपासून भारतीयांनी बचतीसाठी भौतिक साधनांचाच हातभार घेतला आहे. 1950-51 या काळात एकूण घरगुती बचतीपैकी केवळ नऊ टक्के बचत ही आर्थिक साधनांत होत असते. उर्वरित रक्कम ही भौतिक स्वरूपात व्हायची. कांचन यांच्या मते, डिजिटलच्या काळात आर्थिक गुंतवणुकीत व्यापक बदल (Investment trend) पाहावयास मिळत आहे. यात नवीन खेळाडू अगदी सहजपणे आर्थिक साधनांत गुंतणूक करताना दिसून येत आहेत. मध्यम वर्गीयांत वाढते उत्पनन्न आणि खर्चाची क्षमता, डिजिटायजेशन सुविधा, आर्थिक साधनांत गुंतवणूक वाढविण्यासाठी सरकारचा पुढाकार पाहता गुंतवणुकीतील बदल पाहावयास मिळत आहे.

बदलत्या ट्रेंडमुळे (Investment trend) शेअर, म्युच्युअल फंड, विमा यात विक्रमी गुंतवणूक होताना दिसून येत आहे. म्युच्युअल फंड उद्योगाने नोव्हेंबर 2022 मध्ये 40 लाख कोटींचा टप्पा पार केला. वीस ते चाळीस लाख कोटींचा प्रवास हा केवळ पाच वषार्र्ंचा आहे. विशेष म्हणजे म्युच्युअल फंड उद्योगाला वीस लाख कोटींचा टप्पा गाठण्यासाठी तीन दशकं लागली. म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीवर सामान्यांची नेहमीच नजर राहिली. प्रत्यक्षात बहुतांश नागरिकांनी जीवन विम्यातील गुंतवणुकीलाच महत्त्व दिले. आजघडीला जीवन विमा उद्योगाची मालमत्ता सुमारे 52 लाख कोटी रुपये आहे. हे प्रमाण एकूण आर्थिक साधनाच्या 39 टक्के आहे.

म्युच्युअल फंडच्या उद्योगातील गुंतवणुकीचे प्रमाण 28.4 टक्के आहे. दुसरीकडे नॅशनल पेन्शन स्किम योजनेकडे देखील लोकांचा कल वाढला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी सरकारने सुरू केलेल्या योजनेतून आकर्षक परतावा मिळत असल्याने आणि कर सवलत दिली जात असल्याने गुंतवणूक वाढत आहे. एनपीएसची मालमत्ता सुमारे 7.36 लाख कोटी आहे. तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात आर्थिक साधनात गुंतवणुकीचा (Investment trend) ओघ असाच राहील. भौतिक गुंतवणुकीच्या माध्यमातून महागाईवर मात करता येत नाही, हे गुंतवणूकदारांना कळून चुकले आहे, असे कांचन म्हणतात.

भारतीय कुटुंबीयांना बँकेच्या मुदत ठेवीपेक्षा चांगला परतावा हवा आहे. अशा प्रकारचा परतावा हा विविध आर्थिक साधनांच्या बळावरच मिळवता येणे शक्य आहे. त्याचवेळी आर्थिक साधनांतील पारदर्शकता, तरलता आणि कर सवलत यामुळेही लोकांचे याकडे आकर्षण वाढत चालले आहे. तसेच इथे कर्मचार्‍यांच्या प्रॉव्हिडंड फंडचादेखील (Investment trend) उल्लेख करता येईल. यातील मालमत्ता 12 लाख कोटींवरून 25 लाख कोटींवर पोहोचली आहे. हा पल्ला पाच वर्षांतच गाठला आहे. संघटनात्मक क्षेत्रांचा अर्थव्यवस्थेत वाटा वाढत चालल्याने एनपीएस आणि पीएफच्या खात्यात सातत्याने वाढ होत आहे.

जयदीप नार्वेकर

Back to top button