प्राप्तिकर वाचवण्यासाठी सेकंड होम खरेदी करताय? तर 'या' गोष्टींचा विचार करा... | पुढारी

प्राप्तिकर वाचवण्यासाठी सेकंड होम खरेदी करताय? तर 'या' गोष्टींचा विचार करा...

राधिका बिवलकर

प्राप्‍तिकर वाचवण्यासाठी सीबीडीटीने नागरिकांना बरेच पर्याय दिले आहेत. या पर्यांयाचा वापर करून आपण मेहनतीच्या पैशाचा मोठा भाग प्राप्‍तिकरातून वाचवू शकतो. नोकरी लागताच बहुतांश मंडळी होम लोन घेऊन घर खरेदी करतात. होम लोनच्या मुद्दलावर प्राप्‍तिकर खात्याच्या कलम 80-सीनुसार सवलत मिळते, तर त्याच्या व्याजापोटी दोन लाखांपर्यंत वेगळी सवलत मिळते. या आधारे करसवलतीचा मोठा लाभ घेता येतो.

प्राप्‍तिकर वाचवण्यासाठी बहुतांश मंडळी सेकंड होम खरेदी करतात. पण केवळ कर वाचवण्यासाठी दुसरे घर खरेदी करत असाल तर काही गोष्टींचा विचार करायला हवा.

घर खरेदीवर करबचत

गृहकर्जाच्या आधारे घर खरेदी करणे हे आता नवीन राहिले नाही. नोकरी लागताच बरीच युवा मंडळी तातडीने घर खरेदी करतात. एकीकडे भाड्याची बचत होते, तर दीर्घकाळासाठी मोठी मालमत्ता तयार करण्याचाही फायदा होतो. त्याचबरोबर कर वाचवण्यासाठीदेखील होम लोन मदत करते. गृहकर्जाचा मासिक हप्‍ता भरताना मूळ रकमेपोटी जे पैसे भरले जातात, त्यावर प्राप्‍तिकर कायद्याच्या कलम 80-सीनुसार दीड लाखांपर्यंतची करसवलत मिळते.

प्राप्‍तिकर आणि गृहकर्ज

प्राप्‍तिकर वाचवण्यासाठी सेकंड होम खरेदी करण्याची कल्पना नवीन नाही. बरीच मंडळी असा प्रयत्न करतात आणि कर वाचवतात. परंतु कर वाचवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्‍कम गुंतवणूक करून घर खरेदी करणे हा निर्णय कितपत संयुक्‍तिक ठरेल, याचा विचार करायला हवा. आपणही याच दिशेने विचार करत असाल आणि केवळ कर वाचवण्यासाठी दुसरे घर खरेदी करत असाल, तर पुढील मुद्द्यावर मंथन व्हायला हवे.

प्रश्‍नांच्या माध्यमातून समजून घ्या

यासाठी इथे एक उदाहरण देऊन प्रश्‍न समजून घेता येईल. 40 वर्षांचा व्यक्‍ती आपल्या प्लॅटमध्ये पत्नी आणि दोन मुलांसमवेत राहतो. त्याचे उत्पन्न महिन्याकाठी 1 लाख रुपये आहे आणि त्यांच्याकडे दहा लाखांची रोकड आहे. ते कर वाचवण्यासाठी दुसरे घर खरेदी करण्यास उत्सुक आहेत. त्याचवेळी ते 20 हजार रुपये दरमहा म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करत आहेत.

गृहकर्जापोटी ते मासिक हप्‍ता 25 हजार रुपयांपर्यंत देऊ शकतात. त्याचवेळी दुसरी मालमत्ता खरेदीविना प्राप्‍तिकर संपूर्णपणे वाचवू शकतो का, हेदेखील त्यांना जाणून घ्यायचे आहे. त्यांनी कलम 80-सीनुसार मिळणार्‍या सवलतीचा संपूर्ण लाभ घेतला आहे.

गुंतवणुकीतून परताव्याचे आकलन

तज्ञांच्या मते, केवळ कर वाचवण्यासाठी दुसरी मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय योग्य नाही. गुंतवणुकीचा निर्णय काळानुरूप घेतला पाहिजे. त्याचबरोबर आर्थिक लक्ष्य, गुंतवणुकीवरचा परतावा आणि जोखीम उचलण्याची क्षमता यानुसार गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला हवा. मुलांच्या शिक्षणासाठी 7-8 वर्षांनंतर गुंतवणूक काढण्याची गरज पडू शकते. अशा वेळी सात ते आठ वर्षांच्या कालावधीत म्युच्युअल फंड आणि मालमत्तेतून मिळणार्‍या परताव्याची पडताळणी करायला हवी.

कर बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध

दुसरी मालमत्ता खरेदी करण्याच्या प्रकरणात लाँग टर्म कॅपिटल गेन्सचे आकलनदेखील करायला हवे. त्याचबरोबर मध्यम कालावधीसाठी गरज पडणार्‍या रकमेचाही विचार करणे आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्‍तीने कलम 80-सीनुसार होणार्‍या गुंतवणुकीची मर्यादा ओलांडली असेल, तर कलम 24 नुसार केवळ 2 लाखांपर्यंतच्या व्याजावरच फायदा मिळू शकतो. अशा वेळी दुसरे घर खरेदी करण्याच्या निर्णयाचा आढावा घेतला पाहिजे. कर बचतीसाठी एनपीएस किंवा 80-जी, 80-डी सारख्या प्राप्‍तिकर कायद्याच्या अन्य सेक्शनची मदत घ्यायला हवी.

Back to top button