लक्ष्मीची पाऊले : बँकिंग, इलेक्ट्रिक व वाहन उद्योगात चलती | पुढारी

लक्ष्मीची पाऊले : बँकिंग, इलेक्ट्रिक व वाहन उद्योगात चलती

डॉ. वसंत पटवर्धन : गेल्या आठवड्यात जगात, भारतात आणि महाराष्ट्रात उल्लेख करावा अशा बर्‍याच घटना घडल्या. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी पुढच्या वर्षीचे जी-20(परिषद) चे यजमानपद नरेंद्र मोदी यांच्याकडे दिले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी बोलताना, ‘भारताकडील अध्यक्षपदाचा येता कालावधी सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक व कृतिप्रवण व गतिप्रवण असेल!’ असे सांगितले. 1 डिसेंबर 2022 पासून औपचारिकपणे अध्यक्षपदाचा कालावधी सुरू होत आहे.

भारत सध्या जगाच्या आकांक्षाचे केंद्र बनला आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत. पी. एम. गतिशक्तीसारख्या उपक्रमांमुळे परकी गुंतवणूक आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर येत आहे. विविध विकास प्रकल्प उभे राहत आहेत. ते नुसतेच गतिमान झाले नाहीत, तर त्यामुळे प्रकल्प खर्चही कमी होत आहे. विशाखापट्टणम रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्याचा प्रारंभही यावेळी नरेंद्र मोदी यांनी केला.

पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पातील 90 टक्के गळती कमी करण्यात यश आल्याने देशातील धरणात होणारही गळती कमी करण्यासाठी हाच ‘टेमघर पॅटर्न’ राबवण्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणातर्फे तशी शिफारस केली जाणार आहे.

‘टेमघर पॅटर्न’मध्ये मोठ्या प्रमाणात ग्राऊटिंग व शॉटक्रीटचे काम केले गेले. तसे काम यापूर्वी कोणत्याही धरणात केले गेले नव्हते. तंत्रज्ञानाची कार्यपद्धती विकसित करून हे धरण सलग चार वर्षे लवकर रिकामे करून टप्प्याटप्प्याने ही दुरुस्ती करण्यात आली. गळती कमी करण्यासाठी 2017 सालापासून कामे हाती घेतली गेली होती.

घाऊक दरातील चलनवाढ ऑक्टोबर 2022 मध्ये खाली येत 8.39 टक्क्यांवर आली आहे. मागील 19 महिन्यांनंतर प्रथमच घाऊक चलनवाढ इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्याचवेळी किरकोळ चलनवाढही ऑक्टोबर 2022 मध्ये कमी होऊन 6.77 टक्के नोंदवली गेली.

देशातील खाद्यतेलाची आयात नोव्हेंबर 2021 ते ऑक्टोबर 2022 या वर्षभरात वाढली असून या आयातीसाठी 1.57 लाख कोटी रुपये द्यावे लागले. आधीच्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ 34 टक्के आहे. यंदा 140 लाख टन तेल आयात केले गेले. ही वाढ गेल्या वर्षापेक्षा सुमारे 7 टक्के जास्त आहे.

शेअर बाजारातील निर्देशांक

( sensex) व निफ्टी सातत्याने वाढत आहे. निर्देशांक सुमारे 62 हजारांच्या आसपास आहे, तर निफ्टी सुमारे 18,400 च्या जवळपास आहे.

बँकांच्या कर्जासाठी पूर्वी ऑफसिझन व ऑनसिझन असे वर्षांचे दोन विभाग केले जायचे. आता असे उल्लेख नाहीसे झाले आहेत. मोठ्या कंपन्यांनी आता व्यवसाय विस्तार करण्याचे धोरण अवलंबिले असल्यामुळे त्यासाठी बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्जे घेण्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे मार्च 2023 ला संपणार्‍या आर्थिक वर्षासाठी बँकांचे नफे मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येईल म्हणून या कालावधीत बँकांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे इष्ट ठरेल.

सुधारलेले रस्ते, वाहनकर्जांची उपलब्धता यामुळे यंदा वाहन विक्रीमध्ये मोठी वाढ झालेली दिसते. ही वाढ पुढील वर्षीही अशीच असेल, असे संकेत सध्या दिसतात. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (सप्टेंबर 2022 अखेर) सुमारे 19 लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली. यापुढील सहामाहीत (मार्च 2023 अखेर) एकूण 38 लाखांहून अधिक वाहनांची विक्री होईल. 2018-19 मध्ये 33,77,500 प्रवासी वाहनांची विक्री झाली.

भविष्यात इलेक्ट्रिक कारला जास्त मागणी असण्याची संभाव्यता असली तरी डिझेल आणि पेट्रोलवर चालणार्‍या कारना मात्र चांगली मागणी आहे. या पार्श्वभूमीवर वाहन उद्योगातील प्रमुख कंपन्यांनी उत्पादनात वाढ करण्यासाठी 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण इलेक्ट्रिक कारबरोबरच पेट्रोल व डिझेलवरील कारसाठी वेटिंग वाढले आहे.

Back to top button