जाणून घ्या ‘पीपीएफ एक्स्टेंशन’चे नियम | पुढारी

जाणून घ्या ‘पीपीएफ एक्स्टेंशन’चे नियम

गुंतवणूक; अपर्णा देवकर : पब्लिक प्रॉव्हिडंड फंड म्हणजेच पीपीएफमधील गुंतवणूक हा सर्वोत्तम पर्याय मानला गेला आहे. कारण या योजनेत अन्य गुंतवणूक योजनेच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो. तसेच कम्पाऊडिंगचा फायदा देखील मिळतो.

पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी पंधरा वर्षांत पूर्ण होते. मात्र गुंतवणुकीचा एक नियम आहे. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास कम्पाऊडिंगचा फायदा गुंतवणूकदारास तितक्याच प्रमाणात मिळतो. या नियमाचे पालन करणारी अशी काही मंडळी आहेत की, ते पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटीनंतरही म्हणजे पंधरा वर्षांनंतरही गुंतवणूक सुरू ठेवण्याची इच्छा बाळगून असतात. या सवयीमुळे ते चांगली रक्कम उभी करू शकतील.

आपणही पीपीएफ खात्यात गुंतवणूक केली असेल आणि या योजनेला मॅच्युरिटीनंतरही सुरू ठेवू इच्छित असाल, तर निराश होण्याची गरज नाही. पीपीएफ खात्याचा विस्तार आपण पाच-पाच वर्षे असे कितीतरी वर्षे करू शकतो. मात्र यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल. पीपीएफ एक्स्टेेशनसाठी काय करावे लागेल, हे जाणून घेऊ.

पीपीएफ एक्स्टेंशनचे नियम

  • पहिली अट म्हणजे पीपीएफ एक्स्टेंशन केवळ भारतात राहणार्‍या नागरिकांना लागू आहे. अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारलेल्या भारतीय नागरिकांना पीपीएफ खाते सुरू करण्याची किंवा पूर्वीपासून पीपीएफ खाते असेल, तर त्याला एक्स्टेंशन देण्याची परवानगी मिळणार नाही.
  • पीपीएफ एक्स्टेंशनसाठी सर्वात अगोदर आपल्याला बँकेची होम ब—ँच किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज भरावा लागेल. हा अर्ज मॅच्युरिटीच्या तारखेच्या एक वर्ष अगोदर द्यावा लागेल.
  • पाच वर्षांसाठी मुदतवाढ मिळत असेल, तर दरवर्षी किमान पाचशे रुपये वार्षिक जमा करावे लागेल. आपण किमान पैसे भरू शकत नसाल तर आपले खाते बंद होईल. त्यास पुन्हा सुरू करण्यासाठी वार्षिक 50 रुपये याप्रमाणे पेनल्टी भरावी लागेल.
  • पीपीएफ एक्स्टेंशनचा पर्याय निवडल्यानंतर आपण खात्यातून केवळ एकदाच पैसे काढू शकता. मॅच्युरिटीच्या तारखेपर्यंत असणार्‍या एकूण रक्कमेच्या 60 टक्के पैसे काढता येतील.
  • आपण पीपीएफ खात्यात पंधरा वर्षांनंतर कोणत्याही प्रकारची रक्कम जमा करू शकत नसाल आणि खात्याला मुदतवाढ घेऊ इच्छित असाल, तर हा पर्यायदेखील मिळू शकतो. यासाठी आपल्याला बँक किंवा पोस्ट ऑफिसला कळविण्याची गरज नाही. आपण पंधरा वर्षांनंतरही रक्कम काढत नसाल, तर हा पर्याय आपोआपच लागू होतो.
  • याचा फायदा म्हणजे आपल्या पीपीएफ खात्यात जेवढी रक्कम आहे, त्यावर पीपीएफच्या आकडेवारीनुसार व्याज मिळत राहील आणि कर सवलत मिळत राहील. मॅच्युरिटीनंतर आपण खात्यातून कधीही आणि कितीही पैसे काढू शकता. प्रसंगी आपण संपूर्ण पैसे काढू शकता. यात आपल्याला मुदत ठेव आणि बचत खात्याची सुविधा मिळू शकते.

Back to top button