आरोग्य विमा महागणार? जाणून घ्या किती वाढेल हप्ता?

आरोग्य विमा महागणार? जाणून घ्या किती वाढेल हप्ता?
Published on
Updated on

येत्या दोन महिन्यांत आरोग्य विम्याचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे. कारण, यापुढे आरोग्य विमा खरेदी करताना केवायसीची प्रकिया बंधनकारक करण्यात आली असून, या प्रक्रियेपोटी काही शुल्क आकारले जाणार आहे.

केवायसीच्या प्रक्रियेमुळे कंपन्यांवर अतिरिक्त भार पडणार आहे. परिणामी नोव्हेंबरपासून आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणे महागाचे ठरू शकते.

कोरोनाच्या काळात आणि त्यानंतर आरोग्य विमा खरेदी करणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आपणही आरोग्य विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक नोव्हेंबरच्या अगोदर पॉलिसी खरेदीचा विचार करा. कारण, एक नोव्हेंबरपासून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा हप्ता वाढणार आहे. केवायसीचे बंधन केल्याने त्याचे शुल्क आपल्याला मोजावे लागणार आहे. सध्या सामान्य जीवन विमा पॉलिसीला केवायसी गरजेची आहे; परंतु आता हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणार्‍यांची वाढती संख्या पाहून त्यासाठी देखील केवायसीची अट लागू केली. एकंदरीत आरोग्य विम्याचा हप्ता काही प्रमाणात वाढू शकतो.

किती वाढेल हप्ता?

नोव्हेंबरमध्ये आरोग्य विमा खरेदी केल्यानंतर विमा कंपन्यांकडून केवायसीची प्रक्रिया संथपणे केली जाईल, असे समजू नका. उलट आरोग्य विमा पॉलिसीचा बाँड हा केवायसीची प्रक्रिया केल्यानंतरच मिळणार आहे. विमा कंपन्या केवायसीसाठी काही शुल्क आकारू शकतात किंवा हप्त्यातून त्याची वसुली करू शकतात. यापूर्वी 2020 मध्ये हप्ता वाढविण्यात आला. हा हप्ता 40 ते 70 टक्क्यांपर्यंत वाढविला. त्यामुळे पॉलिसी महागली.

कशामुळे केवायसीची गरज

कोरोना काळानंतर विमा खरेदी करणार्‍यांची संख्या अचानक वाढल्याने त्यातील फसवणुकीची शक्यतादेखील बळावली. परिस्थितीचा वेळोवेळी गैरफायदा घेणार्‍या हॅकर मंडळींकडून अशा प्रकारचा धोका होऊ शकतो. म्हणून केवायसीचे बंधन घालण्यात आले आहे. विमाधारकांचे संपूर्ण विवरण आपल्याकडे असावे, असे इर्डा संस्थेला वाटते; जेणेकरून गरज भासल्यास ग्राहकाला तत्काळ संपर्क साधून अडचणीचे निराकरण करता येऊ शकेल.

ऐच्छिक केवायसी

सध्याच्या काळात जीवन विम्याशिवाय अन्य सर्व प्रकारच्या विम्यांसाठी केवायसीची प्रक्रिया ऐच्छिक ठेवली आहे. ज्या मंडळींनी अगोदरच केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असेल, त्यांना एक नोव्हेंबर रोजी पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही. अर्थात, आपल्या ओळखीसंबंधी कागदपत्रांच्या सत्यप्रती पुन्हा एकदा सादर कराव्या लागतील.

व्हिडीओ आधारित केवायसी

2020 मध्ये लॉकडाऊन लागू केल्यानंतर जीवन विमा कंपनीसाठी विमा खरेदी करणार्‍या व्यक्तीची केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सोपे नव्हते. शेवटी विमा नियामक संस्था इर्डाने 'ईज ऑफ डुईंग बिझनेस' मोहिमेंतर्गत व्हिडीओ आधारित केवायसीची प्रकिया सुरू केली आणि त्यानुसार ग्राहकांना घरबसल्या केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता आली. कोरोना ओसरल्यानंतर आरेाग्य विम्याला मागणी वाढली तेव्हा विमा नियामकने पुन्हा व्हिडीओ आधारित केवायसी करण्याची मुभा दिली आहे. विमा कंपन्यांकडून व्हिडीओ आधारित ओळख सिद्ध करण्याची प्रक्रिया सेंट्रल डिझॉझिटरी सर्व्हिस इंडिया लिमिटेड (सीडीएसआयएल) च्या सहकार्याने पार पाडली जात आहे. एखाद्या व्यक्तीने म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असेल तर त्याची माहिती विमा कंपनीला द्यावी. त्यामुळे विमा कंपनीला पुन्हा एकदा केवायसीची प्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही.

केवायसी कागदपत्रांना सुरक्षा द्या

विमा खरेदी करणार्‍या प्रत्येक व्यक्तीने केवायसीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सुरक्षित कशी राहतील, याची खबरदारी घ्यायला हवी. पुरेशी काळजी घेतल्यास त्याचा दुरुपयोग टाळता येईल. यासाठी आपण आपल्या कागदपत्रांच्या झेरॉक्सवर दोन रेषा मारून तेथे लिहू शकता की, 'संबंधित कागदपत्रे ही एखाद्या कंपनीच्या केवायसी प्रकियेसाठी उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा वापर अन्य ठिकाणी केल्यास तो बेकायदा असेल,' असा उल्लेख केल्याने झेरॉक्सचा दुरुपयोग टाळला जाईल. याशिवाय आधार, पॅन, सिबिल, सीडीएसआयएलसारख्या संकेतस्थळांच्या माध्यमातून आपल्या कागदपत्रांची तपासणी करत राहा. नाव, पत्त्यातील बदल तत्काळ अपडेट करत राहा.

विनिता शाह

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news