लक्ष्मीची पाऊले : सात कंपन्यांचे टाटा स्टीलमध्ये विलीनीकरण | पुढारी

लक्ष्मीची पाऊले : सात कंपन्यांचे टाटा स्टीलमध्ये विलीनीकरण

वसंत पटवर्धन : गेल्या आठवड्यात गुरुवारी 29 सप्टेंबर 2022 ला शेअर बाजार बंद होताना निर्देशांक 56409 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 16,818 वर स्थिरावला.

काही प्रमुख शेअर्सचे भाव खालीलप्रमाणे होते. जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) 238 रुपये, मकापूरम फायनान्स 94 रुपये, बजाज फायनान्स 7104 रुपये, जे कुमार इन्फ्रा 295 रुपये, रेप्को होम्स 229 रुपये, जिंदाल स्टील 418 रुपये, मुथुट फायनान्स 1033 रुपये, के ई आय इंडस्ट्रीज 1430 रुपये, लासेन अ‍ॅटट्रबो 1440 रुपये, ग्राफाईट 357 रुपये, हेग 1038 रुपये, स्टेट बँक ऑफ इंडिया 521 रुपये.
रुपया व डॉलरचा विनिमय दर डॉलच्या बाजूने झुकला आहे. आजमितीस तो 82 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जगभरातील अनेक देशांतील मंदीच्या स्थितीचे भारतीय मुद्रा व शेअर बाजारातही तीव्र पडसाद उमटले आहेत. या सर्व अस्थिर परिस्थितीमुळे जागतिक व भारतीय गुंतवणूकदार सध्या शेअरबाजारापासून दोन हात दूरच आहेत. आपणही तेच धोरण अवलंबणे योग्य ठरेल. रुपयाच्या सतत अवमूल्यनामुळे रिझर्व्ह बँकेच्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या जाहीर होणार्‍या पतधोरणाच्या द्वैमासिक धोरणानुसार वाढ होण्याची शक्यता होती. तो अर्धा टक्क्यांनी वधारून 5.9 टक्के झाला. आधी तो रेपो दर 5.4 टक्के होता. रेपो दर वाढवला गेल्याने बँकांनाही नाईलाजाने कर्जावरील आपल्या व्याजदरात अर्धा टक्क्याने वाढ करावी लागेल.

जगाचे सध्याचे आर्थिक चित्र संमिश्र आहे. रशिया-युक्रेनमधील युद्धजन्य स्थिती, वाढती महागाई, लहरी हवामानामुळे काही देशांतील ओला किंवा कोरडा दुष्काळ, काही देशांच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्था अशी स्थिती आहे; मात्र भारताला यातून नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा फायदा निवासी व अनिवासी भारतीयांना व्हावा. अनिवासी भारतीय विदेशी चलन मोठ्या प्रमाणावर पाठवत असल्याने त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. त्यामुळे रिझर्व्ह बँकेची विदेश मुद्रा गंगाजळी वाढणार आहे.

बड्या कर्जदारांसाठी बँक ऑफ बडोदाने करोडो रुपयांची कर्जे निर्लेखित (राईट ऑफ) केली आहेत. याउलट 1 कोटी रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या कर्जदारांना मात्र काहीच फायदा दिलेला नाही. ‘फाडी तिला साडी अन् जगवी तिला भगुवी’ अशा प्रकारचे हे धोरण आहे. कदाचित अन्य बँकाही बँक ऑफ बडोदाच्या धोरणाचा अवलंब करतील. कारण, कार्पोरेट कर त्यांना कमी द्यावा लागतो.
औद्योगिक क्षेत्रातील सगळ्यात मोठी व महत्त्वाची बातमी म्हणजे ‘टाटा स्टील’ने आपल्या अन्य सात कंपन्यांचे विलीनीकरण स्वतःत करून घेतले. ‘टाटा स्टील’ आता जगातील मोठ्या कंपन्यांतील एक अशी गणली जाईल.

‘टाटा स्टील लाँग प्रॉडक्टस’, ‘टाटा मेटॅलिक्स’, ‘दि टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया’, ‘ईआरएफ लिमिटेड’, ‘इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्टस’, ‘टाटा स्टील मायनिंग’, ‘एस अँड टी मायनिंग’ या सात कंपन्यांचे एकत्रीकरण केले गेले. त्यामुळे सध्याच्या 600 रुपयांच्या भावाला हा शेअर घेणे इष्ट ठरेल. पुढच्या वर्ष-दीड वर्षात त्यात 40 टक्क्यांनी वाढ व्हावी.

दसरा, दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचे ठरवले आहे. सध्या मूळ वेतनाच्या 34 टक्के महागाई भत्ता मिळतो तो आता 38 टक्के होईल. या महागाई भत्त्याच्या वाढीपोटी दरवर्षी 6600 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. ही वाढ पूर्वलक्षी असल्यामुळे जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 या आठ महिन्यांच्या काळात 4175 कोटी रुपयांचे वित्तीय ओझे वाढणार आहे. ग्राहक किंमत निर्देशांकांच्या 12 महिन्यांच्या सरासरी वाढीच्या आधारे हा महागाई भत्ता ठरवला गेला आहे.
राज्य कर्मचारीदेखील आता अशी मागणी करण्याचा रेटा लावतील आणि बँक कर्मचारीही त्यांच्या खांद्याला खांदा लावतील.

केंद्र सरकारला देशात होणार्‍या चलनवाढीची जाणीव आहे. ही चलनवाढ 4 टक्क्यांपेक्षा अधिक होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ही चलनवाढ अंतर्गत कारणांनी होत नसून त्याला जागतिक वातावरण जबाबदार आहे.

कार्यालयीन कामकाजात राजभाषेच्या वापरासाठी केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे बँक ऑफ महाराष्ट्रला सर्वोच्च ‘कीर्ती पुरस्कार’ देण्यात आला. असा पुरस्कार प्रथम माझ्या बँकेच्या अध्यक्षीय पदाच्या कारकीर्दीत 45 वर्षांपूर्वी मिळाला होता. टॉरंट फार्माने त्वचेच्या रोगावरील औषधे निर्माण करणार्‍या (र्उीीरींळेप कशरश्रींहलरीश) कंपनीचे आधिग्रहण करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी 1885 कोटी रुपये मोजावे लागतील.

Back to top button