एक रुपयाही न भरता खरेदी करण्याची मुभा, काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या अधिक

एक रुपयाही न भरता खरेदी करण्याची मुभा, काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या अधिक
Published on
Updated on

– जयदीप नार्वेकर 

नवरात्रौत्सवाची सुरुवात होताच उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स कंपन्यादेखील उत्सवी वातावरणाचा लाभ घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांनी ऑनलाईन सेल किंवा फेस्टिव्ह सिझन सेलची घोषणा केली आहे.

फ्लिपकार्ड आणि अमेझॉनसारख्या डझनभर कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन सेलचे आयोजन केले असून त्याचवेळी अनेक आकर्षक ऑफरही जाहीर होत आहेत. आकर्षक ऑफरच्या जोडीला ऑनलाईन सेलमुळे डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शॉपिंगचा ट्रेंड वाढला. विविध पेमेंट अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग आणि डेबिड व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शॉपिंग करणार्‍यांना कंपन्यांंकडून अगोदरच ऑफर दिली जात आहे. ऑफरमध्ये एखाद्या खास बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास दहा ते पंधरा टक्के सवलत किंवा एखाद्या कंपनीच्या डेबिट कार्डवर बोनस पॉईंट तसेच इंटरनेट बँकिंगने खरेदी केल्यास सवलत अशा अनेक ऑफर जाहिरातीत पाहावयास मिळतात.

याशिवाय विविध पेमेंट अ‍ॅपच्या माध्यमातून व्यवहार केल्यास आकर्षक सवलतदेखील मिळतात; पण या ऑफरपेक्षा आणखी एक वेगळी ऑफर ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांसाठी आणली असून ती म्हणजे 'बाय नाऊ अँड पे लॅटर'. 'बाय नाऊ अँड पे लॅटर' म्हणजे आता खरेदी करा आणि पैसे नंतर भरा. होय. हीच ती सवलत आहे. एक रुपयाही न भरता खरेदी करण्याची मुभा या ऑफरच्या माध्यमातून ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिली. या सुविधेंतर्गत ग्राहकांना पैसे भरण्यासाठी पंधरा ते 45 दिवसांचा कालावधी मिळतो. पैसे भरण्याच्या तारखेला ती रक्कम डेबिट, क्रेडिट कार्ड, पेमेंट अ‍ॅप किंवा बँक खात्यातून आपोआप काढून घेतली जाईल. या सुविधेत ईएमआयचा पर्यायदेखील आहे. यानुसार तीन, सहा आणि 12 हप्त्यांत देखील पैसे भरू शकतात. निश्चित तारखेला खात्यात पैसे नसतील, तर पेनल्टीबरोबरच होणार्‍या विलंबामुळे सिबिल स्कोअरवरदेखील परिणाम होऊ शकतो.

'केवायसी'ची प्रक्रिया आवश्यक

ऑनलाईन शॉपिंग करणार्‍या सर्व ग्राहकांसाठी 'बाय नाऊ अँड पे लॅटर' ही सुविधा उपलब्ध आहे. यासाठीची एक अट पूर्ण करावी लागेल आणि ती म्हणजे संबंधित संकेतस्थळावर केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. केवायसीसाठी आधार, पॅन आणि व्होटर आयडी डिजिटल कॉपी आवश्यक असते. केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकतो आणि निश्चित तारखेच्या आतही खात्यातून पैसे भरू शकतो. अर्थात, या योजना ठरावीक प्रॉडक्टवर उपलब्ध होतात. यात गॅझेटची खरेदी, फूड प्रॉडक्ट, प्रवासाचे आरक्षण, गॅस बुकिंग, बिलाचा भरणा तसेच ऑनलाईनवर धान्य खरेदी केल्यानंतरही यासारखे ऑफर मिळतात.

योजनेचा काय लाभ?

ही योजना एखादे झटपट कर्ज मिळविण्यासारखी आहे. यात ग्राहकांकडून खरेदी केलेल्या वस्तूंचा बिल भरणा हा आर्थिक सेवा देणार्‍या कंपन्यांकडून तत्काळ केला जातो. यासाठी ई-कॉमर्स कंपन्या आणि विक्रेता यात करार असतो. या करारानुसार ग्राहकाने शॉपिंग केल्यानंतर ई-कॉमर्स कंपनी ही आपल्या प्लॅटफॉर्मवर उत्पादन विक्री करणार्‍या विक्रेत्याला वित्तीय सेवाद्वारे तत्काळ पैसे देते. ग्राहकांकडून ई-कॉमर्सला पैसे मिळतात, तेव्हा ते पैसे आर्थिक सेवा देणार्‍या कंपन्यांना स्थानांतरित केले जातात. अनेक बाबतीत ग्राहक थेटपणे आर्थिक सेवा देणार्‍या कंपन्यांकडे बिल भरणा करतात.

क्रेडिट कार्डसारखी सुविधा

'बाय नाऊ अँड पे लॅटर' ही सुविधा क्रेडिट कार्डप्रमाणेच आहे. कारण, क्रेडिट कार्डवरदेखील ग्राहकाला 45 दिवसांपर्यंत पैसे भरण्यासाठी वेळ मिळतो. दोन्ही सुविधांमध्ये ठरलेल्या तारखेपर्यंत ग्राहकांकडून कोणतेही व्याज आकारले जात नाही. परंतु, निश्चित तारखेला बिल न भरल्यास कंपनीकडून आकारले जाणारे व्याज सरासरीपेक्षा अधिक असते. क्रेडिट कार्डचा वापर हा एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी आणि बिल भरण्यासाठी केला जातो; मात्र ही योजना केवळ ऑनलाईन खरेदीसाठी लागू असते. दुसरीकडे क्रेडिट कार्डवर शॉपिंग केल्यास काही छुपे शुल्क आदीदेखील कंपन्यांकडून वसूल केले जातात; पण 'बाय नाऊ पे लॅटर' या पर्यायानुसार कोणतेही शुल्क लागू होत नाही. एखादा व्यक्ती 'बाय नाऊ'चा पर्याय निवडत असेल, तर त्याला यासाठी केवायसीशिवाय अन्य कोणतीही प्रक्रिया करावी लागत नाही. त्याचवेळी क्रेडिट कार्ड तयार करणे हे कठीण काम आहे. कारण, कंपन्यांकडून बर्‍याच औपचारिकता पार पाडल्या जातात.

पर्सनल लोनपेक्षा चांगला पर्याय

'बाय नाऊ, पे लॅटर'सारखी योजना ही कोणत्याही बँकेच्या पर्सनल लोनपेक्षा चांगली वाटू लागते. पर्सनल लोन घेतल्यानंतर त्यावर तत्काळ व्याज आकारले जाते; मात्र या योजनेत दीड एहिन्यापर्यंत कोणतेही व्याज आकारले जात नाही. अर्थात, पर्सनल लोन घेतल्यानंतर कर्जदार व्यक्ती ती रक्कम कोठेही वापरू शकते. 'बाय नाऊ' सुविधा ही निश्चित प्लॅटफॉर्मवर आणि वस्तूंच्या खरेदीवरच उपलब्ध असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news