

कोरोना महासाथीनंतर आरोग्य विम्याबाबत लोकांत जागरूकता वाढली आहे. यानुसार मोठ्या संख्येने नागरिक आरोग्य विमा घेत आहेत. आपणही पॉलिसी खरेदी करत असाल, पालकांंचा पॉलिसीत समावेश करत असाल तर जादा जोखमीपोटी अधिक हप्ता तर भरत नाहीत ना? याची खातरजमा करायला हवी. जादा हप्त्याचा आरोग्य विमा ठेवण्याबाबत पुनर्विचार करायला हवा, असे विमातज्ज्ञ सांगतात.
अडचणी कधीही सांगून येत नाहीत. अशा स्थितीत एखादा व्यक्ती मानसिकद़ृष्ट्या तयार असतो, ना आर्थिकद़ृष्ट्या. एखादा व्यक्ती अचानक आजारी पडत असेल किंवा अपघातात जायबंदी होत असेल, तर अशा वेळी त्याच्या उपचारापोटी मोठी रक्कम खर्च होते. परंतु या पैशाची जुळजाजुळव करताना अनेकांच्या नाकीनऊ येते. अशा वेळी आरोग्य विमा उपयुक्त ठरते. सध्या उपचाराचा खर्च वाढल्याने अनेक नागरिक जादा विमा कवच असलेली योजना खरेदीचा विचार करतात. आरोग्य विम्यात पालकांचा समावेश केल्यास हप्त्याची रक्कम आपोआप वाढते. कारण त्यांच्या वयानुसार हप्त्याची रक्कम निश्चित केलेली असते. काही विमाधारक जादा जोखीम घेण्यासाठी जादा हप्ता भरण्यास तयार होतात. परंतु, हा सौदा हा परवडणारा नाही. अशा वेळी पॉलिसी बंद करणे किंवा त्याचा पुनर्विचार करणे ही बाब सयुक्तिक ठरेल, असे विमातज्ज्ञ म्हणतात.
हप्ता आणि जोखमीचे आकलन
आरोग्य विम्याच्या जोखमीला दोन भागात विभागले आहे. पहिल्या जोखमीत विमा धारकाला पूर्वीपासून असणार्या आजारांचा समावेश असतो. मधुमेह, स्लिप डिस्क, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, हृदय आणि किडनीविकार यांसारख्या आजारांचा यात समावेश करावा लागेल. दुसर्या भागात अपघात किंवा अचानक उद्भवलेला आजार. विमा धारकाच्या माहितीच्या आधारे विमा कंपनी हप्ता निश्चित करते आणि यासाठी पॉलिसी बाँड जारी केला जातो. आरोग्य विम्यासाठी रक्कम निश्चित केली जाते आणि त्यास विमा रक्कम म्हटले जाते. आरोग्य विमा पॉलिसीचा हप्ता हा विमा रकमेच्या किंवा जोखीम कवचाच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर ती पॉलिसी अतिउत्तम श्रेणीत ठेवण्यात येईल. पॉलिसीचा हप्ता वीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तर पॉलिसीचा पुनर्विचार करायला हवा. अशी पॉलिसी सुरू ठेवण्याऐवजी बंद केलेली बरी. उदा. ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत त्यांना पाच लाख रुपयांचे कवच देणारी आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल आणि तिचा वार्षिक हप्ता 80 हजार रुपये असेल, तर ती पॉलिसी बंद केलेलीच बरी.
नियम आणि अटी जाणून घ्या
आरोग्य विम्याच्या करारांचे सर्व नियम आणि अटी जाणून आणि समजून घेणे गरजेचे आहे. रुग्णालयातील खर्च, भरती होण्यापूर्वी अणि भरती झाल्यानंतर औषधांवर होणारा खर्च, रुग्णवाहिकेचा खर्च, ऑर्गन डोनरवरचा खर्च, खोलीचे भाडे, आयसीयूवरील खर्च आदींचा उल्लेख स्पष्टपणे बाँडवर असतो. या सर्व गोष्टींची पडताळणी करायला हवी. नॉमिनीलादेखील आरोग्य विमा करारांतील तरतुदी आणि कवच याची माहिती असणे आवश्यक आहे.
नेटवर्कमधील रुग्णालयात उपचार करा
आरोग्य विमा कंपन्या या त्यांच्या नेटवर्कमध्ये सामील असलेल्या रुग्णालयांत विमाधारकांवर उपचारापोटी आलेल्या खर्चाचे पूर्ण वहन करते. परंतु, नेटवर्कबाहेर असलेल्या रुग्णालयांत उपचार केल्यास त्या खर्चातील काही टक्के रक्कम विमाधारकाला भरावी लागते. साधारणपणे हा खर्च वीस टक्के असतो. विमा योजना आणि कंपनीचे धोरण यानुसार खर्चाची रक्कम वेगवेगळी राहू शकते. याचाच अर्थ, उपचारात पाच लाख रुपये खर्च झाला असेल आणि तर ग्राहकाला एक लाख रुपये भरावे लागतील. हप्ता 80 हजार रुपये असेल, तर आपला खर्च 1 लाख 80 हजार रुपये राहू शकतो. परंतु, विम्यात 3 लाखांपर्यंतच्या खर्चाची तरतूद असेल आणि 1 लाख 80 हजारांची रक्कम खर्च होत असेल, तर हा खर्च पॉलिसीमधील तरतुदीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक होईल. अशा वेळी पॉलिसी बंद केलेली बरी.
खर्चाचे आकलन
विमा कंपनीकडून उपचारापोटी देण्यात येणारी रक्कम ही विमा कवचच्या रकमेवर आधारित असते. अर्थात, विमा योजनेचा प्रकार अणि कंपनीनुसार वेगवेगळी राहू शकते. उदा. विमा रक्कम तीन लाख रुपये असेल, तर आयसीयूचा दररोजचा पाच हजारांपर्यंतच खर्च हा कंपनीकडून दिला जाईल. परंतु, विमा पाच लाखांपेक्षा अधिक असेल, तर पाच हजारांपेक्षा अधिक खोलीत राहून उपचार करता येऊ शकतो. यासाठी कंपनीचे नियम आणि अटी जाणून घेतल्या पाहिजेत. सध्याच्या काळात हप्ता जास्त आहे म्हणून अचानक आरोग्य विमा नाकारता येणार नाही. परंतु, त्याचे आकलन निश्चितपणे करायला हवे.
हप्त्यावर कर सवलत
प्राप्तिकर अधिनियम 1961 च्या कलम 80 डीनुसार, प्राप्तिकरात सवलत देण्यात आली आहे. हा एक चांगला लाभ आहे. सध्याच्या काळातील अस्थिरता आणि दगदग पाहता, आरोग्य विमा असणे काळाची गरज बनली आहे.
विमा कवच आणि हप्ता यात ताळमेळ बसवा
गेल्या काही वर्षांत महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. यास उपचारही अपवाद नाही. त्यामुळे विमा पॉलिसी उतरवताना जोखीम कवच निश्चित करताना महागाईकडे दुर्लक्ष करू नये. अनेक उपचारांत भलीमोठी रक्कम खर्च होते. नी-ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, अँजिओग्राफी, कर्करोग, कोरोना, काविळ यांसारख्या आजारांवर होणारा खर्च हा काहीवेळा आटोक्याबाहेरचा ठरतो. म्हणून उपचार मध्यमवर्गींच्या हाताबाहेर जात आहेत. एकुणातच, विम्याची रक्कम निश्चित करताना वय, खर्च, आवश्यकता या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. हप्त्याची रक्कमदेखील अधिक होणार नाही, हे देखील पाहावे. कारण जादा हप्त्याच्या पॉलिसीमुळे लाभ अपेक्षेप्रमाणे मिळत नाही.
प्रसाद पाटील