लक्ष्मीची पाऊले : उत्सवाचे दिवस आणि मोटार उद्योगाची तेजी | पुढारी

लक्ष्मीची पाऊले : उत्सवाचे दिवस आणि मोटार उद्योगाची तेजी

वसंत पटवर्धन :  गेल्या आठवड्यात अर्थव्यवस्थेबाबत सगळीकडून सकारात्मक बातम्या येत होत्या. महागाईबरोबर अन्य संकटांशीही सामना करताना आपली अर्थव्यवस्था चारही बाजूंनी बळकट होत आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2022 अखेर) सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर(ॠीेीी ऊेाशीींळल) 13.5 टक्के इतका झाला. त्यापूर्वी तिमाहीत (जानेवारी ते मार्च 2022 अखेर) सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर(स.रा.उ)4.1 टक्के इतका खाली होता. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या अथक प्रयत्नामुळे आणि धोरणामुळे महागाई नियंत्रणात राहिली आहे. अमेरिकेसह सर्व विकसित राष्ट्रे महागाईसह अनेक सकटांचा सामना करीत असताना भारत मात्र ठामपणे उभा आहे. याचे सगळे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन आणि भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांना आहे.

  या प्रश्‍नाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
1) आपल्या ग्राहकांची क्रयशक्‍ती वाढली आहे.
2) कॉन्टॅक्ट इंटेन्सिव्ह क्षेत्रातील प्रगतीमुळे हे शक्य झाले आहे.
3) ‘क्रेडिट रेव्हिंग एजन्सी’ (आयसीआरए) व अन्य पतमूल्यन संस्थांनी हाच आशावाद प्रकट केला आहे.

चालू आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था 7 टक्क्यांनी वाढेल, असे प्रतिपादन टी. व्ही. सोमनाथन यांनी केले होते. कोव्हिडपूर्व काळातील सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा हा दर 4 टक्क्यांनी जास्त आहे. याशिवाय वस्तू व सेवा कर (जीएसटी) 1.42 लाख कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. बुधवारी (31 ऑगस्ट) रोजी निर्देशांक सकारात्मक वातावरणामुळे 1564 अंकांनी उसळला.

दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सतत वाढ होत आहे. तरीही मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती सुधारली असल्यामुळे मोटारींच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे. विविध स्तरांमध्ये महागाई वाढत असताना, मोटारगाड्यांचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांनी मोटारीच्या किमती वाढवूनही मोटारींना जास्त मागणी आहे. येत्या काही दिवसांत दसरा, दिवाळी, नाताळ असे उत्सवाचे दिवस असल्यामुळे लोक वाहनकर्जे घेऊनही मोटारी विकत घेत आहेत. ही तेजी यापुढे कायम राहावी, असा अंदाज आहे.

मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र यासह बहुतांश उत्पादकांना ऑगस्ट महिना लाभदायक ठरला आहे. मारुती सुझुकीच्या कार विक्रीत ऑगस्टमध्ये 26 टक्यांची वाढ दिसली. तर टाटा मोटर्सची विक्री त्याहून अधिक म्हणजे 36 टक्के झाली आहे. मारुती सुझुकीने 1,65,173 मोटारी विकल्या. देशाची अर्थव्यव्स्था सुधारल्याचे हे एक गमक आहे. टाटा मोटर्सची विक्री या काळात 78,843 इतकी झाली. महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीने प्रवासी वासांच्या विक्रीत ऑगस्टमध्ये 87 टक्क्यांची वाढ नोंदवली. या कंपनीने ऑगस्टमध्ये 29,852 वाहनांची विक्री केली. ह्युदाईसारख्या जपानी कंपनीत मात्र सहा टक्क्यांचीच वाढ दिसली. अमेरिका, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, जपान, सिंगापूर, हाँगकाँग अशा प्रगत देशात मोटारमालक दर तीन ते चार वर्षांनी नवी गाडी घेातात. तसे खूळ अजून आपल्याकडे आलेले नाही.

व्यावसायिक गॅसच्या सिलिंडरच्या किमतीत 91 रुपयांची घट झाली आहे. डिझेलच्या निर्यात करात वाढ झाली आहे. डिझेलच्या निर्यातीवरील ‘विंडफॉल प्रॉफिट’ कर प्रतिलिटर 13.5/- रुपये इतका असणार आहे. हा कर आधी 7 रुपये होता. ‘एव्हीएवान टर्बाईन फ्युअल’च्या (एटीएफ) निर्यातीवरील कर 2 रुपयांवरून 9 रुपये करण्यात आला आहे. देशात मसाल्यांच्या किमतींत गेल्या दोन वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ सुमारे 30 टक्क्यांनी झाल्याचे वृत्त आहे. हिंगाचे उत्पादन आपल्याकडे फार होत नाही. त्यामुळे अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, इराण, कझाकिस्तान या देशांतून हिंगाची आयात मोठ्या प्रमाणावर होते.

2025 सालापर्यंतच्या देशातील माहिती केंद्र (डेटा सेंटर) उद्योग जवळजवळ 5.6 अब्ज अमेरिकी डॉलरचा असून, त्यात आणखी वाढ होणार आहे. देशात आणखी 45 नवीन माहिती व विज्ञापन केंद्रे उभारली जातील. इंटरनेटचा वेग जोराने होत असल्यामुळे हे शक्य होणार आहे. देशभरात आज 138 डेंटा सेंटर आहेत.

राज्य कामगार विमा योजनेचे (ईएसआयसी) जून 2022 महिन्यात 15.47 लाख सदस्य झाले आहेत. फाईव्ह-जीची सेवा पुढील महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. फाईव्ह-जीसाठी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. त्यामुळे अती वेगवान नेटवर्क उपलब्ध होईल. ही सेवा पुढील महिन्यात मुंबई, दिल्‍ली, चेन्‍नई, कोलकाता या चार महानगरांत प्रथम सुरू होईल. ही सेवा पुढील 12 महिन्यांत देशात सर्वत्र उपलब्ध असेल. व्यवसायांसाठी फाईव्ह-जी सेवा देण्यासाठी जिओ अमेरिकेच्या कॉल कॉम कंपनीबरोबर करार करणार आहे.

Back to top button