अर्थवार्ता

अर्थवार्ता

* गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशंकांमध्ये एकूण अनुक्रमे 171.40 अंक व 721.06 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 16049.2 अंक व 53760.78 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये एकूण 1.06 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 1.32 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

* रिझर्व्ह बँकेने रुपया चलनाद्वारे आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहार करण्यास मान्यता दिली. सध्या आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारांवर अमेरिकेच्या डॉलरचे वर्चस्व आहे. नुकतेच अमेरिकेने रशियावर निर्बंध घातल्यावर भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांवर व्यापार करण्यास अडथळे आले. यामुळे भारत स्वतःची स्वतंत्र व्यवस्था उभी करत आहे. याअंतर्गत भारतीय बँका इतर देशात 'रूपी व्हेस्ट्रो' खाते, असे विशेष खाते उघडतील. या चलन खात्याद्वारे भारतीय बँका आयात-निर्यातदारांना रुपया चलनामध्ये व्यवहार करता येण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतील. यामुळे व्यवहार करताना आता डॉलरमध्ये रूपांतरण (कन्व्हर्जन) करण्याची गरज भासणार नाही. सध्या अमेरिकन डॉलर व्यतिरिक्त युरो, पाऊंड, स्विस फ्रँक, येन यासारखी चलन आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी बाजारात उपलब्ध आहेत. यात रुपया चलन आंतरराष्ट्रीय बाजारात आल्याने अमेरिकेच्या एकाधिकारशाहीला नक्कीच आव्हान मिळेल.

* येस बँकेकडे असलेल्या थकीत कर्जांच्या (बँडलोन्स) विक्रीसाठी जेसी फ्लॉवर अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची निवड. एकूण 48 हजार कोटींची थकीत कर्जे लिलावासाठी जेसी फ्लॉवर कंपनीकडे सोपवली जाणार.

* जून महिन्यात भारतात किरकोळ महागाईदर मागील महिन्यात असणार्‍या 7.04 टक्क्यांवरून 7.01 टक्क्यांवर आला. रिझर्व्ह बँकेने मध्यमावधीत किरकोळ महागाईदर 2 ते 6 टक्क्यांदरम्यान आटोक्यात ठेवण्यात उद्दिष्ट समोर ठेवले आहे. परंतु मागील 6 महिन्यांपासून हा महागाईदर 6 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ऊर्जा आणि इंधन क्षेत्राचा महागाई दर सर्वाधिक 10.39 टक्के राहिला असून, पर्यायाने त्यामुळे अन्नधान्य महागाईदरदेखील 7.75 टक्के राहिला.

* अमेरिकेत महागाईचा भडका. अमेरिकेत महागाई दर मागील 40 वर्षांच्या उच्चांकी स्तरावर. जून महिन्यात महागाई दर 9.1 टक्क्यांवर पोहोचला. मे महिन्यात महागाई दर 8.6 टक्के होता.

* मे महिन्यात भारताचा औद्योगिक उत्पादन वृद्धीदर (आयआयपी) मागील 12 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर म्हणजे 19.3 टक्क्यांवर पोहोचला. दैनंदिन वापराच्या वस्तूंशी निगडित उत्पादन घेणार्‍या उद्योगांमध्ये जसे की, कॅपिटल गुड्स (54 टक्के) आणि कन्स्युमर ड्युरेबल्स (58.5 टक्के) सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. याचप्रमाणे पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रामध्ये 18.1 टक्क्यांची वृद्धी झाली. या क्षेत्रामधील वाढ हे भारतीय अर्थव्यवस्था कोरोना काळानंतर पूर्वपदावर येत असल्याने द्योतक असल्याचे मानले जात आहे.

* चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 'एचसीएल टेक' या आयटी कंपनीचा एकूण नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 8.6 टक्के घटून, 3283 टक्के वधारून 23464 कोटी झाला. मागील वर्षाचा विचार करता महसुलात 16.9 टक्क्यांची वाढ झाली.

* महसूल गुप्तचर संचालनायाने (डीआरआय) 'ओप्पो इंडिया' कंपनीकडे 4389 कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याबद्दल नोटीस पाठवली. सीमा शुल्क (कस्टम ड्युटी)मधील सवलतींच्या गैरवापराबद्दल 2981 कोटी तसेच आयात मालाची किंमत बाजारभावापेक्षा कमी दाखवल्यामुळे 1408 कोटी रुपये 'ओप्पो इंडिया'कडे थकीत असल्याचे अर्थमंत्रालयाचे प्रतिपादन.

* एप्रिल-मे महिन्यात रशियाकडून भारतात होणार्‍या आयातीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 272 टक्क्यांची वाढ होऊन आयात 5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. परंतु भारताकडून रशियाला होणार्‍या निर्यातीमध्ये 46 टक्क्यांची घट होऊन निर्यात 245 दशलक्ष डॉलर्स झाली. यामुळे रशियाबरोबरची व्यापारतूट 4.8 डॉलर्स झाली.

* गुगल या आंतरराष्ट्रीय कंपनीने भारतीय दूरसंचार कंपनी 'भारती एअरटेल'मध्ये 1.2 टक्के हिस्सा 700 दशलक्ष डॉलर्सला खरेदी केला. गुगलने 71 दशलक्ष समभाग 734 रुपये प्रतिसमभाग दरावर खरेदी केले. यापूर्वी गुगलने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 4.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून 7.73 टक्के हिस्सा खरेदी केला होता.

* खासगी क्षेत्रातील बँक 'फेडरल बँक'चा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत 63 टक्के वधारून 600.6 कोटी झाला. थकीत कर्जांसाठी कराव्या लागणार्‍या तरतुदींमध्ये तब्बल 74 टक्क्यांची घट होऊन, तरतुदी 640 कोटींवरून थेट 166.7 कोटींवर आल्या. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण मागील तिमाहीच्या तुलनेत 2.8 टक्क्यांवरून 2.69 टक्क्यांवर आले, तर निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 0.96 टक्क्यांवरून 0.94 टक्क्यांवर आले.

* भारताची परकीय गंगाजळी 8 जुलै रोजी संपलेल्या सप्ताहात 8.1 अब्ज डॉलर्सनी घटून 580.25 अब्ज डॉलर्स झाली. हा मागील 15 महिन्यांचा नीचांक आहे. परकीय चलनामध्ये तब्बल 6.7 अब्ज डॉलर्सची घट या सप्ताहात नोंदवली गेली. तसेच सोने धातूच्या साठ्यात 1.236 अब्ज डॉलर्सची घट नोंदवली गेली. बहुतांश परकीय चलन गंगाजळी ही रुपया चलनाला डॉलरच्या तुलनेत स्थिर ठेवण्यासाठी वापरण्यात आली. शुक्रवारच्या सत्रात रुपयादेखील डॉलरच्या तुलनेत 17 पैसे मजबूत होऊन 79.82 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंद झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news