फॉरेक्स कार्ड म्हणजे काय? | पुढारी

फॉरेक्स कार्ड म्हणजे काय?

फॉरेक्स कार्ड हे असे कार्ड आहे की, ज्यामध्ये आपण पैसे जमा करून ठेवू शकतो आणि परदेशात जाऊन संबंधित देशातील चलनाचा वापर करू शकतो. फॉरेक्स कार्ड ऑनलाईनही वापरू शकता आणि एटीएममध्येदेखील त्याचा वापर करून पैसे काढता येतात. आपण ज्या देशात जाणार आहात, त्या देशाचे चलन बँकेडून आपल्या फॉरेक्स कार्डमध्ये जमा केले जाते.

कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण एखाद्या देशात जातो तेव्हा खरेदी किंवा अन्य व्यवहारासाठी संबंधित देशाच्या चलनाचा वापर करावा लागतो. अशा वेळी बँकेतून परकीय चलन घेऊन परदेशात जाण्याचा विचार करत असाल तरीही परदेशात किती चलन लागू शकते, हे आपल्याला ठाऊक नसते. एवढेच नाही, तर स्वत:सोबत जादा चलन रोख स्वरूपात घेऊन जाण्याचा विचारदेखील चुकीचा आहे. म्हणून रोखऐवजी प्रीपेड ट्रॅव्हल कार्ड किंवा ट्रॅव्हलर्स चेकचा वापर करू शकता. परंतु अशा वेळी आपल्याला आणखी पैशाची गरज भासू शकते. या स्थितीत फॉरेक्स कार्ड हा एक चांगला पर्याय राहू शकतो. या आधारे आपल्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. फॉरेक्स कार्ड म्हणजे परदेशात वापरण्यात येणारे डेबिट कार्ड म्हटले तरी चालेल.

फॉरेक्स कार्डचे फायदे

फॉरेक्स कार्डच्या माध्यमातून आपण एकापेक्षा अधिक देशांचे चलन सोबत ठेवू शकता. परदेशात प्रवास करताना खिशात पैसे ठेवण्यापेक्षा फॉरेक्स कार्ड हे अधिक सुरक्षित मानले जाते.
जवळपास सर्वच बँका आपल्याला प्रीपेड फॉरेक्स कार्ड सेवा प्रदान करण्याची सुविधा देतात.
या कार्डने थेट दुकानावर खरेदी करू शकता आणि परकी चलनदेखील रोख स्वरूपात काढू शकता.
या कार्डमधील बॅलन्स संपल्यास आपण आपल्या बँकेच्या खात्यातून ऑनलाईन पैसे जमा करू शकता. या कार्डच्या माध्यमातून चलनाला चांगला दर मिळू शकतो. हा दर नेहमीच बदलत राहतो.
आपण परदेशात मॉलमध्ये खरेदी करत असाल, तर या कार्डवर कोणताही जादा कर आकारला जात नाही.
फॉरेक्स कार्डला संपूर्ण जगात मान्यता दिली आहे. या कार्डला कोणत्याही देशात एटीएमप्रमाणे वापरू शकता. आपण फॉरेक्स कार्डच्या मदतीने खर्चाला ट्रॅक करू शकतो.

कार्ड घेण्यापूर्वी काय खबरदारी घ्यावी?

फॉरेक्स कार्ड घेण्यापूर्वी काही गोष्टींचे आकलन करणे गरजेचे आहे. फॉरेक्स कार्डला अ‍ॅक्टिवेशन करण्यासाठी किती वेळ लागतो, हे अगोदर लक्षात घेतले पाहिजे. यानुसार कार्ड बंद होण्याचा कालावधी समजेल.
आपण कार्डचा पिन विसरला असाल, तर पिन रिसेट करण्याची प्रक्रियादेखील जाणून घेतली पाहिजे.

कार्ड हरवले किंवा काही गडबड झाली, तर बँकेला तातडीने कळवणे आवश्यक असते. यासाठी टोल फ्री नंबर किंवा ग्राहक सेवा नंबर मोबाईलमध्ये असावा. याशिवाय दरोज किती रोकड काढू शकतो, याची मर्यादाही जाणून घेतली पाहिजे. रोखीचा गरजेपेक्षा अधिक वापर करत असाल तर त्याचा लाभ मिळणार नाही. याशिवाय कार्डमध्ये 2 हजार डॉलरपेक्षा अधिक बॅलन्स ठेवता येत नाही, हे लक्षात ठेवा.

फॉरेक्स कार्डची कशी निवड करावी?

सर्व बँकांकडून फॉरेक्स कार्डची सेवा दिली जाते आणि त्यावर वेगवेगळे ऑफर आणि शुल्क आकारले जातात. विविध बँकांच्या फॉरेक्स कार्डची तुलना करून त्यापैकी चांगला लाभ देणारे फॉरेक्स कार्ड घ्यायला हवे. फॉरेक्स कार्ड घेताना त्यात किती चलन ठेवू शकतो, हे पाहिले पाहिजे. प्रवासात किती चलन लागू शकते, याचेही आकलन करायला हवे. कार्डची व्हॅलिडीटीदेखील पाहावी. कारण काही कार्डची व्हॅलिडीटी एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी असू शकते, तर काही कार्डचा कालावधी हा 5 वर्षांपर्यंतचा असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्डवर होणारी शुल्क आकारणी. प्रत्येक कार्डचे वार्षिक भाडे वेगळे राहू शकते. शक्यतो सरकारी बँकांच्या फॉरेक्स कार्डला प्राधान्य द्यावे. खासगी बँकांकडूनदेखील बर्‍याच ऑफर दिल्या जातात. त्याचीही पडताळणी करावी.

प्रसाद पाटील

Back to top button