गुंतवणूक : हीच वेळ आहे… मंदीत संधी साधण्याची! | पुढारी

गुंतवणूक : हीच वेळ आहे... मंदीत संधी साधण्याची!

सध्या आपल्या देशात शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड दिसून येत आहे. चांगल्या कंपन्यांचे शेअर्स 20 ते 50 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. अशा वेळी अनेकजण अजून मार्केट पडेल, या भीतीने पैसे काढून घेतात; पण ‘डर के आगेही जीत होती है’ याप्रमाणे मार्केटमध्ये सध्या आलेली मंदी हीच खरी गुंतवणुकीची संधी आहे.

मागील सात-आठ महिन्यांपासून परकीय गुंतवणूकदार खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेत आहेत. आजपर्यंत जवळपास तीन लाख कोटींपेक्षा अधिक पैसा परकीय गुंतवणूकदारांनी काढून घेतला आहे. परिणामी सेन्सेक्स 62,245 वरून सध्या 53,500 वर म्हणजे सुमारे नऊ हजारांनी खाली आला आहे. म्हणजेच 15 टक्क्यांपर्यंत सेन्सेक्समध्ये पडझड झालेली पाहायला मिळत आहे. खर्‍या अर्थाने भारतीय गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी ही मोठी संधी मिळाली आहे.

मार्केट खाली का आले? मार्केट खाली येण्याची पुढील कारणे आहेत.
1) युक्रेन-रशिया यांच्यात सुरू असलेले युद्ध अजून संपले नाही. अजून किती दिवस चालेल हेही निश्चित नाही. युद्धाचे सावट गडद होत गेल्याने आपल्या देशातून परकीय गुंतवणूकदार गुंतवणूक काढत गेले. ज्या-ज्यावेळी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली जाते, त्या-त्यावेळेला आपला शेअर बाजार कोसळत असतो.

2) सध्या क्रूड ऑईलचे दर खूप वाढले आहेत. परिणामतः महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. युद्धामुळे खाद्यतेल, खते यांची आयात कमी झाली आहे. क्रूड ऑईलचे दर वाढल्याने वाहतूक आणि उत्पादनाचा खर्च वाढला आहे. सर्वच वस्तूंच्या किमती वाढलेल्या दिसतात; परंतु इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील महागाई खूपच कमी प्रमाणात वाढलेली आहे, हे वास्तव आहे.

3) महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने व्याजदर वाढविले आहेत, त्यामुळे बाजारातील तरलता कमी होते, परिणामी मार्केट कोसळते. महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी अजून काही प्रमाणात व्याजदर वाढविण्याची शक्यता आहे.

मागील काही वर्षांतील मंदी अन् तेजी

जगातील अविकसनशील देशात परकीय गुंतवणूकदार येतात अन् जातात. आपल्या देशातही अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत. परकीय गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतली की मार्केट पडते आणि परत काही दिवसांनंतर तेच गुंतवणूकदार परत आले की मार्केट नव्या उच्च पातळीवर जाते. उदा. मे 2006 ते जून 2006 मध्ये परकीय गुंतवणूकदारांनी 6829 लाख कोटी गुंतवणूक काढून घेतली. भारतीय म्युच्युअल फंडांनी 5917 लाख कोटी गुंतवणूक केली होती. तरीही सेन्सेक्स 30 टक्के कोसळला होता. 12,100 वरून 9080 पर्यंत खाली आला होता.

नंतरच्या दोन वर्षांत 9 जानेवारी 2008 ला 20,870 वर सेन्सेक्स गेला होता. दोन वर्षांत 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. जानेवारी 2008 ते ऑक्टोबर 2008 मध्ये परकीय गुंतवणूकदारांनी 51,754 लाख कोटी गुंतवणूक काढून घेतली. त्यावेळी म्युच्युअल फंडांनी फक्त 14,144 लाख कोटी गुंतवणूक केली होती. त्यावेळी सेन्सेक्स 20,870 वरून 9 मार्च 2009 रोजी 8170 पर्यंत खाली आला होता. तेव्हा मार्केट 61 टक्के कोसळले होते. नंतरच्या वर्षात 5 नोव्हेंबर 2010 साली परत तो 21,005 नवीन उच्च पातळीवर आला होता. मार्च 2015 मध्ये सेन्सेक्स 29,499 वरून फेब्रुवारी 2016 मध्ये 22,952 पर्यंत 22 टक्के खाली आला. परत जानेवारी 2018 मध्ये 36,283 या नव्या पातळीवर सेन्सेक्स गेला.

कोसळत्या मार्केटचा अभ्यास केला असता परकीय गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेतात; पण काही कालावधीत परत आपल्या देशात गुंतवणूक करतात. त्यावेळी मार्केट नव्या उच्च पातळीवर गेलेले पाहावयास मिळते. दीर्घकाळासाठी मार्केटमध्ये गुंतवणूक करावयाची असते. मागील सात वर्षांत म्हणजे 2014 साली 22,000 सेन्सेक्स होता. तो 62,000 पार केला होता. उच्च पातळीवरून सध्या 53,500 पर्यंत आला आहे. निफ्टी 18,400 वरून 16,024 इतका खाली आला आहे. बँक निफ्टी 41,200 वरून 34,276 वर आला आहे.

मार्केटमधील या मंदीची संधी भारतीय लोकांनी घेतली पाहिजे, त्यासाठी दिग्गज कंपन्यांचे चांगले शेअर्स थोडे थोडे करून घ्यायला हवेत. कोणते शेअर्स घ्यावे अन् किती घ्यावेत ही संभ्रमावस्था असेल तर म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करावी; जेणेकरून तुमची बाजारातील जोखीम विभागली जाऊ शकते आणि चांगला परतावाही मिळू शकतो. 2014 सालापासून चांगल्या म्युच्युअल फंड योजनांनी 12 ते 18 टक्क्यांपर्यंत वार्षिक चक्रवाढ परतावा दिलेला आहे. जो पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा फारच चांगला आहे.

एसआयपीमधील गुंतवणूक वाढवा

आपल्या देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या एसआयपी (नियमित गुंतवणूक पद्धती) माध्यमातून गुंतवणूक करतो आहे. सध्या 5.39 कोटी खातेदारांकडून दरमहा जवळपास 12,000 कोटी गुंतवणूक होत आहे. देशातील गुंतवणूकदारांकडून मार्केटमध्ये दरमहा होणारी गुंतवणूक खर्‍या अर्थाने शेअर बाजाराला बळकटी देत आहे. जर तुमची एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक होत असेल तर सध्या ती गुंतवणूक वाढविणे गरजेचे आहे.

मंदीच्या काळात युनिटचे दर खाली येतात व परिणामी तुम्हाला जादा युनिट्स मिळतात (र्ठीशिश र्ईंशीरसळपस लेीीं) रुपयाची सरासरी मूल्य किमत नियमामुळे बाजार खाली असेल तर युनिटच्या किमती खाली येतात. गुंतवणुकीमध्ये जास्तीचे युनिट मिळतात. ज्यामुळे आपल्याला भविष्यात चांगला परतावा मिळण्याची खात्री मिळते. म्हणून ज्या-ज्यावेळी मार्केटमध्ये मंदी असते, तेव्हा गुंतवणूक वाढविण्याची गरज भासते. कमी दराने जास्त युनिट मिळून जास्त फायदा मिळू शकतो.

भारताची सक्षमतेच्या दिशेने वाटचाल

प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेला देश हे मोठे मार्केट आहे. आज जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात विश्वास संपादन केला आहे. कारण, चीनने सार्‍या जगाला कोरोना रोग दिला. भारताने त्यावर उपाय म्हणून सर्वांना उपचारासाठी औषधे दिली. अमेरिका सर्वांना शस्त्रास्त्र विकतो, तर आपला देश तालिबान, श्रीलंकासारख्या अनेक देशांना तांदूळ आणि गहू देतो आहे.

आपला देश जगातील अनेक देशांना संकटकाळी मदतीचा हात देत आहे. त्यामुळे भारतावरचा विश्वास वाढताना दिसत आहे, हे खालील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आज परदेशातील मोठमोठ्या कंपन्यांवर भारतीय लोक पाहावयास मिळत आहेत. एक सक्षम भारत, उभरता भारत आपण पाहतो आहोत. आपला देश भांडवली बाजार 2014 साली 10 व्या क्रमांकावरून सध्या 6 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. जागतिक सकल उत्पन्न सहभाग 2014 साली 2.6 टक्के होता, तो 2022 साली वाढून 3.2 टक्के इतकी वाढ झालेली दिसते.
जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सेवामधील सहभाग पाहिला तर 2014 साली आपल्या देशाचा सहभाग 2 टक्क्यांवर होता, तो आता 2022 मध्ये 2.20 टक्के म्हणजे मागील सहा वर्षांत दहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

2014 साली देशातील परकीय गुंतवणूकदारांचा सहभाग 2.1 टक्के होता. तो सध्या तिपटीने वाढून 6.7 टक्के वाढ झालेली पाहावयास मिळते. याचा अर्थ परकीय गुंतवणूकदार भारत देशावर मोठा विश्वास दर्शवित आहेत. आयटी सेक्टरने मागील 10 वर्षांत जागतिक स्तरावर प्रचंड प्रगती केली असून, सध्या 230 बिलियन डॉलर उत्पन्न मिळवत असून, जगाच्या सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये 5वा क्रमांक लागतो. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये 2014 साली 7 व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आलेला आहे. या क्षेत्राची वाढ उल्लेखनीय झालेली आहे. त्याचबरोबर स्टील उत्पादनांमध्ये 2014 साली जगात चौथा क्रमांक असलेला आपला देश जगातील दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. मोबाईल उत्पादनामध्ये आपला देश 2014 साली 12 व्या क्रमांकावर होता, तो आता दुसर्‍या क्रमांकावर आलेला आहे. ब्रिक्स देशातील भांडवलामध्ये आपला सहभाग 2013 साली 13.5 टक्के होता, तो वाढून 21 टक्के इतका वाढला आहे.

2014 सालानंतर प्रत्येक क्षेत्रात खूप मोठे बदल झालेले पाहावयास मिळत आहेत. जानेवारी 22 मध्ये 1.40 लाख कोटी जीएसटी जमा झाला होता, तो एप्रिल 22 मध्ये 1.68 लाख कोटी रक्कम जमा झाली आहे. आयएमएफच्या सर्वेक्षणानुसार 2026-27 साली देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनपर्यंत पोहोचेल; जो जगात सर्वात जास्त वाढीचा दर असेल. अशा पद्धतीने चाललेली देशाची प्रगती आता कोणीही रोखू शकत नाही. भविष्यात भांडवली बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे.

अशा महासत्ता होऊ पाहणार्‍या सक्षम भारतातील सर्वसामान्य लोक आर्थिक सक्षम होण्यासाठी भांडवली बाजारात प्रवाहात आले पाहिजेत. जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूक म्हणून पारंपरिक योजनेत राहिलात तर महागाई तुमचा पैसा खाऊन तुम्ही भविष्यात गरीबच राहाल. तर हीच वेळ आहे या गुंतवणूक प्रवाहात आपण सहभागी होण्याची. ऑक्टोबर 2018 मध्ये ‘मार्केटमधील मंदी गुंतवणुकीसाठी संधी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी सेन्सेक्स 34,300 ला होता. तो 14 महिन्यांत जानेवारी 2020 मध्ये 41,216 या नवीन पातळीवर गेला. ज्यांनी त्यावेळी गुंतवणूक केली होती, त्यांना फार चांगला परतावा मिळाला आहे.

-अनिल पाटील
प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर

Back to top button