एचडीएफसी, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, पीएनबी, यूनियन बँक ऑफ इंडिया यांनी व्याजदरात वाढ केली आहे. साहजिकच आगामी काळात आपल्या गृहकर्जाच्या हप्त्यात वाढ होईल. जसे की, एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात 30 बेसिस पॉईंटची वाढ झाली आहे. या आधारावर 1 कोटीचे कर्ज असेल, तर वीस वर्षांसाठी हप्त्याच्या रकमेत 1791 रुपये वाढ होईल.
अशा वेळी काही जणांकडून चूक होऊ शकते. नवीन कर्ज घेणारे कर्जदार हे आपला हप्ता कमी ठेवण्यासाठी गृहकर्जाचा कालावधी वाढवू शकतात. म्हणजेच वीस वर्षांच्या ठिकाणी 25 वर्षे करता येऊ शकते. यानुसार हप्त्याची रक्कम कमी राहू शकतो. परंतु अशा प्रकारची कृती करणे ही मोठी चूक ठरू शकते. हप्त्यात किरकोळ कपात करण्याच्या नादात आपण लाखो रुपयांचा जादा दबाव गृहकर्जावर लादतो. याउलट कर्जाचा कालावधी वाढविण्यापेक्षा वेगवेगळ्या बँकांचा व्याजदर तपासून पाहा आणि चांगली डील पदरात पाडून घ्या. कालावधी वाढविल्याने व्याज किती जादा भरतो हे पुढील आकडेमोडवरून लक्षात येईल.
प्रकरण पहिले :
वीस वर्षांसाठी 50 लाखांचे कर्ज
एकूण कर्ज : 50 लाख
कालावधी : 20 वर्षे
व्याजदर : 7 टक्के (एसबीआय सरासरी)
हप्त्याची रक्कम : 38,765 रुपये
एकूण व्याज : 4,303,587 रुपये
एकूण रक्कम : 9,303,587 रुपये
प्रकरण दुसरे :
25 वर्षांसाठी 50 लाखांचे कर्ज
एकूण कर्ज : 50 लाख
कालावधी : 25 वर्षे
व्याजदर : 7 टक्के (एसबीआय सरासरी)
हप्त्याची रक्कम : 35,339 रुपये
एकूण व्याज : 5,601,688 रुपये
एकूण भरलेली रक्कम : 10,601,688 रुपये.
प्रकरण तिसरे :
तीस वर्षांसाठी 50 लाखांचे कर्ज
एकूण कर्ज : 50 लाख
कालावधी : 30 वर्षे
व्याज : 7 टक्के (एसबीआय सरासरी)
हप्त्याची रक्कम : 33,265 रुपये
एकूण व्याज : 6,975,445 रुपये
कर्जापोटी एकूण भरलेली रक्कम : 11,975,445 रुपये.
कालावधी वाढविल्याने किती नुकसान – ही आकडेमोड पाहता, 50 लाखांच्या कर्जाचा हप्ता हा 20 वरून 25 वर्षे केल्यानंतर मासिक हप्ता हा 38,765 वरून 35,339 रुपये होतो. परंतु कर्जापोटी देण्यात येणारे एकूण व्याज 43,03,587 रुपयांऐवजी 56,01,688 रुपये भरावे लागतात. त्याचवेळी दहा वर्षांचा कालावधी वाढविल्यास एकूण व्याजापोटी 69,75,445 रुपये भरावे लागतात. म्हणजेच दहा वर्षांत आपण 26.50 लाख जादा व्याज मोजतो.
-प्रसाद पाटील