निफ्टी व सेन्सेक्स मध्ये अनुक्रमे 3.01 व 3.22 टक्क्यांची वाढ | पुढारी

निफ्टी व सेन्सेक्स मध्ये अनुक्रमे 3.01 व 3.22 टक्क्यांची वाढ

प्रीतम मांडके

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्सने नवीन विक्रम प्रस्थापित केला. निफ्टीने 16 हजार आणि सेन्सेक्सने 54 हजारांची पातळी ओलांडून आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर बंदभाव दिला. निफ्टी एकूण 475.15 अंक तसेच सेन्सेक्स 1690.88 अंक वधारून अनुक्रमे 16238.2 अंक व 54277.72 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीने 16349.45 अंक व सेन्सेक्सने 54717.24 अंकांच्या अधिकतम पातळीला स्पर्श केला. निफ्टी व सेन्सेक्स मध्ये अनुक्रमे 3.01 व 3.22 टक्क्यांची वाढ झाली. निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट मिळाल्याने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याच्या अपेक्षेने दोन्ही निर्देशाकांमध्ये वाढ झाली.

* 2012 पासून वादग्रस्त ठरलेला पूर्वलक्षी कर (रेट्रोस्प्रेक्टिव्ह टॅक्स) अखेर रद्द. 2012 मध्ये व्होडाफोन कंपनीवर या कराची आकारणी करण्यात आली होती. 11 अब्ज डॉलर्सला त्यावेळेची ‘हच’ टेलिकॉम कंपनी (2007) खरेदी केल्याबद्दल थेट 2012 मध्ये पूर्वलक्षी प्रभावाने कराची मागणी करण्यात आली होती. केर्न एनर्जी कंपनीकडेदेखील याचप्रकारे कर भरण्याची मागणी करण्यात आली होती. या विरोधात केर्न या आंतरराष्ट्रीय कंपनीने भारत सरकारला फ्रान्सच्या कोर्टात खेचले आणि फ्रेंच कोर्टाने भारत सरकारविरोधात निकाल दिला. विवाद न मिटवल्यास भारताच्या फ्रान्समधील मालमत्तांवर टाच आणण्याचा आदेश दिला. या सर्वांची परिणिती अखेर कर रद्द करण्यात झाली. या निर्णयामुळे सुमारे 1.1 लाख कोटींचा अपेक्षित पूर्वलक्षी कर सरकारला मिळणार नाही. सुमारे 8100 कोटी रुपये संबंधित कंपन्यांना परत करावे लागणार.

* अ‍ॅमेझॉन कंपनीला अखेर दिलासा. फ्युचर रिटेल आणि रिलायन्स रिटेल यांच्यातील 24713 कोटींच्या एकात्मिकरण व्यवहारास (मर्जर प्लॅन्स) सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. अ‍ॅमेझॉन हा फ्यूचर रिटेल कंपनीमधील एक प्रबळ गुंतवणूकदार आहे. परस्पर व्यवहार केल्याचा अ‍ॅमेझॉनचा आक्षेप. यापूर्वी सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयानेदेखील अ‍ॅमेझॉनच्या बाजूने निर्णय दिला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने या व्यवहाराला अखेर स्थिगिती मिळाली.

* रिझर्व्ह बँकेने देशातील व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यासोबतच आर्थिक वर्ष 2022 मध्ये महागाईचा दर अंदाज 60 बेसिस पॉईंटने वाढवून 5.7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला. अर्थव्यवस्था वृद्धीदर अंदाज 9.5 टक्के करण्यात आला. 10 वर्षे रोखे व्याज दर (10 ईयर बाँड यील्ड) 6.207 टक्क्यांवरून 6.237 टक्क्यांपर्यंत वाढले.

* देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक ‘एसबीआय’चा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा नफा 55 टक्क्यांनी वाढला. या तिमाहीत नफा मागील वर्षी असणार्‍या 4189 कोटींच्या तुलनेत 6504 कोटी झाला. निव्वळ व्याज उत्पन्न 3.74 टक्क्यांनी वाढून 27638 कोटी झाले. परंतु, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अनुत्पादित कर्जांचे प्रमाण मागील तिमाहीच्या तुलनेत काही प्रमाणात वाढले एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) मागील तिमाहीत असणार्‍या 4.98 टक्क्यांच्या तुलनेत 5.32 टक्के झाले. अनुत्पादित कर्जे तसेच इतर आकस्मित खर्चासाठी करण्यात येणार्‍या तरतूद रकमेचे (प्रोव्हीजन्स) प्रमाण मागील तिमाहीत असणार्‍या 11150 कोटींच्या तुलनेत 10,052 कोटी झाले.

* भारतीय स्पर्धात्मक आयोग (सीसीआय) या संस्थेने कार्लाईन आणि पीएनबी हौसिंग फायनान्स यांच्यामधील करारास मान्यता दिली. यापूर्वी कार्लाईल व इतर गुंतवणूकदार उद्योग समूहांनी पीएनबी हौसिंग फायनान्समध्ये 4 हजार कोटींची गुंतवणूक करण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. परंतु, ‘सेबी’ने या व्यवहारास आक्षेप नोंदवला होता. अतिशय कमी किमतीत समभागांचे (शेअर्सचे) हस्तांतरण होत असल्याचा सेबीचा आक्षेप होता.

* व्होडाफोन आयडिया या देशातील तिसर्‍या क्रमांकाच्या दूरसंचार कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदावरून कुमार मंगलम बिर्ला पायउतार.

* पंतप्रधान मोदींकडून ‘ई-रूपी’ या डिजिटल चलनाचे अनावरण. कोणत्याही अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग अथवा कार्डशिवाय उपयोग करता येणार इतकेच नव्हे, तर ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही अथवा इंटरनेट नाही त्यांनासुद्धा ई-रूपी वापरता येणार.

* बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या तिमाहीचा नफा 14.7 टक्के घटून 844 कोटींवरून 720 कोटींवर आला. निव्वळ व्याज उत्पन्न 9.65 टक्के घसरून 3145 कोटी झाले. तरतूद रक्कम (प्रोव्हिजन्स) 13 टक्के वाढून 1709 कोटी झाल्या, तसेच एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 13.91 टक्क्यांवरून 13.51 टक्क्यांवर आले.

* देशातील सर्वांत मोठी गृहकर्ज वितरण कंपनी एचडीएफसी लिमिटेडचा नफा पहिल्या तिमाहीत मागील वर्षीच्या तुलनेत 2 टक्के घटून 3000.67 कोटी झाला. निव्वळ व्याज उत्पन्न 22 टक्के वाढून 4147 कोटी झाले. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण (मागील तिमाहीच्या तुलनेत) 26 बेसिस पॉईंटस् वाढून 2.24 टक्के झाले.

* पॉलिसी बझार लवकरच 6 हजार कोटींच्या आयपीओद्वारे भांडवल बाजारात प्रवेश करणार.

* 30 जुलै रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी तब्बल 9.42 अब्ज डॉलर्सनी वधारून विक्रमी अशा 620.57 अब्ज डॉलर्स पातळीवर पोहोचली.

Back to top button