मृत व्यक्तीचे आयटीआर कसे भरावे? जाणून घ्या प्रक्रिया | पुढारी

मृत व्यक्तीचे आयटीआर कसे भरावे? जाणून घ्या प्रक्रिया

लेखाचा मथळा वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. परंतु जिवंतच नाही, तर मृत व्यक्तीचेही प्राप्तिकर विवरणपत्र भरता येऊ शकते. कायदेशीर वारसाला मृत व्यक्ती हा जिवंत असेपर्यंतच्या काळातील आयटीआर भरणे बंधनकारक आहे. प्राप्तिकर विवरण भरण्यासाठी संपूर्ण वर्षाऐवजी जोपर्यंत ती व्यक्ती हयात असते, तोपर्यंत उत्पन्नाचे आकलन केले जाते.

रिफंडवरदेखील दावा करता येतो

मृत व्यक्जीचे प्राप्तिकर विवरण भरण्यापूर्वी कायदेशीर वारस म्हणून स्वत:ची नोंद करावी लागेल. घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. कायदेशीर वारसाला मृत व्यक्ती हा जिवंत असेपर्यंतच्या काळातील आयटीआर भरणे बंधनकारक आहे. त्याला करही भरावा लागेल, त्याचबरोबर रिफंडसाठीदेखील दावा करता येईल. कायदेशीर वारसदार हा डिम्ड असेसी असतो. यासाठी तो रिटर्न दाखल न करण्याचा पर्याय निवडत असेल, तर प्राप्तिकर खाते पुढील कारवाई करू शकते.

कायदेशीर वारसदार म्हणून कशी नोंद करावी? 

https://www. incometaxindiaefiling. gov.in/home वर प्राप्तिकर ई-फायलिंगच्या संकेतस्थळावर जावे.
क्रेडेंशियलचा उपयोग करून लॉग-इन करावे आणि माय अकाऊंटला क्लिक करावे.
स्वत:ला प्रतिनधी म्हणून नोंदवावे.
मृत व्यक्तीचा आयटीआर भरताना न्यू रिक्वेस्टवर क्लिक करावे.
मृताचा पॅन नंबर, संपूर्ण नाव, बँक खात्याचे विवरण भरावे.
आपली रिक्वेस्ट पूर्ण झाल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेज येईल.

नोंदणीनंतर मृताचे आयटीआर कसे भरावे?

स्वत:ला कायदेशीर वारस म्हणून सिद्ध केल्यानंतर आयटीआर फॉर्म संकेतस्थळावरून डाऊनलोड करावा.
लक्षात ठेवा, संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर फॉर्मची एक्सएमएल फाईल जनरेट होईल. कारण केवळ एक्सएफएल फॉर्मेटमध्येच फॉर्म अपलोड होतो. पॅनकार्डच्या डिटेल्स असलेल्या पर्यायात कायदेशीर उत्तराधिकारी असलेल्या वारसदारास आपले विवरण द्यावे लागेल. आयटीआर फॉर्मवर नाव आणि असेसमेंट ईअरचा पर्याय निवडावा. एक्सएमएल फाईल अपलोड करणे आणि डिजिटल रूपातून सही केल्यानंतर फॉर्म दाखल होईल.

मृत व्यक्तीचे उत्पन्न कसे आकारले जाते? 

तज्ज्ञांच्या मते, मृत व्यक्तीच्या उत्पन्नाची पडताळणी करण्याची प्रक्रिया ही सामान्यच आहे. सर्व कपात आणि सवलतीनंतर शिल्लक राहिलेल्या उत्पन्नावर त्याची आकारणी केली जाते. फरक एवढाच की, संपूर्ण वर्षाऐवजी जोपर्यंत जी व्यक्ती हयात असते तोपर्यंत उत्पन्नाचे आकलन केले जाते.

सुचित्रा दिवाकर

Back to top button