जर तुम्ही शेअर बाजारात (Stock market) ट्रेडिंग करत असाल, तर तुम्हाला आर्थिक घडामोडी आणि त्यावर परिणाम करणार्या घटना-घडामोडी यांच्याविषयीच्या बातम्यांवर चौकसपणानं लक्ष ठेवून राहणं क्रमप्राप्त ठरतं. याचं कारण या घडामोडींचा परिणाम आपल्या शेअर बाजारावरही होत असतो, होणार असतो. तसेच तुम्ही एखादा कॉल किंवा पुट विकत घेतला असेल किंवा कॅरी फॉरवर्ड केला असेल म्हणजेच आधी खरेदी केला असेल, तर तुम्हाला अपडेट असणं अत्यावश्यकच ठरतं.
तसं पाहता हल्ली मोबाईलवर इंटरनेट आल्यामुळं आपली इच्छा असो वा नसो. विविध प्रकारच्या आवश्यक-अनावश्यक, आवडीच्या-नावडीच्या बातम्या आपल्या मोबाईलवर येऊन 'झळकत' असतात. आपण पाहिले नाही, तर पाहेपर्यंत थांबलेल्याही असतात! त्यामुळं हल्लीच्या काळात अपडेट असणं हे फारसं अवघड राहिलेलं नाही.
पण जर तुम्ही शेअर बाजारात (Stock market) ट्रेडिंग करत असाल, तर तुम्हाला आर्थिक घडामोडी आणि त्यावर परिणाम करणार्या घटना-घडामोडी यांच्याविषयीच्या बातम्यांवर चौकसपणानं लक्ष ठेवून राहणं क्रमप्राप्त ठरतं. याचं कारण या घडामोडींचा परिणाम आपल्या शेअर बाजारावरही होत असतो, होणार असतो. तसेच तुम्ही एखादा कॉल किंवा पुट विकत घेतला असेल किंवा कॅरी फॉरवर्ड केला असेल म्हणजेच आधी खरेदी केला असेल, तर तुम्हाला अपडेट असणं अत्यावश्यकच ठरतं. अन्यथा तुमचे लाखाचे 12 हजार व्हायला काही सेकंदही पुरेसे ठरतील!
उदाहरणच पाहायचं झाल्यास, डाऊ फ्युचर्स आणि नॅसडॅक फ्युचर्स या दोन अमेरिकन शेअर बाजाराशी संबंधित निर्देशांकांवर भारतीय शेअर बाजारात ट्रेडिंग करणार्यांची नजर असते. याजोडीला एसजीएक्स निफ्टी हा निर्देशांकही पाहिला जातो. या दोन्हींवरून साधारणतः आपल्याला दररोजचा शेअर बाजार उसळी घेऊन उघडणार आहे, घसरण दर्शवत खुलणार आहे की थोडीशी वाढ-घट नोंदवत आहे तिथेच स्थिरावरणार आहे, याचा अंदाज येत असतो.
काही वेळा याउलट स्थितीही बाजारात पाहायला मिळू शकते. तसेच दिवसभर बाजारातील व्यवहार संपेपर्यंतही या दोन्ही-तिन्ही निर्देशांकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव आपल्या शेअर बाजारावर असतो. त्यामुळे या निर्देशांकांवर परिणाम करणार्या जागतिक, भूराजकीय घडामोडींविषयीची किमान माहिती असणं आपल्याला गरजेचं ठरतं. काही दिवसांपूर्वी डाऊ फ्युचर्समध्ये सुमारे 1000 अंकांची घसरण झालेली दिसून आली होती; पण दुसर्या दिवशी सकाळी तो 150 ने वधारलेला होता. यातून बाजारातील दोलायमानता किती पराकोटीला पोहोचल्याचा अंदाज येतो.
अमेरिकन बाजारातील सर्वच निर्देशांकांमध्ये कमालीचे चढउतार अलीकडील काळात पाहायला मिळत आहे. याचे कारण रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध. अशा काळात युद्धासंदर्भातील बातम्यांवरही लक्ष ठेवून राहणे आवश्यक ठरते. कारण अशांतता, अस्थिरता, असुरक्षिततेच्या काळात बाजारात घसरण दिसून येते, क्रूड ऑईलचे भाव वाढलेले दिसतात, सोन्याची खरेदी वाढते; पर्यायाने बाजारात घसरण दिसून येते. अशा वेळी आपण तेजीच्या दिशेने विचार करून रणनीती ठरवू लागलो, तर नुकसान अटळ आहे. याउलट एखाद्या क्षणी दोन्ही देशांत तोडगा निघाल्याचे वृत्त येते आणि बाजार झपाट्याने वरच्या दिशेने सरकताना दिसतो.
अशाच प्रकारे विदेशी गुंतवणूकदारांकडून होणार्या खरेदी-विक्रीच्या आकड्यांवरही लक्ष ठेवून राहावे. चालू वर्षांत एफआयआयकडून विक्रीचा प्रचंड मारा झाल्याचे दिसून आले आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजेच डीआयआयकडून खरेदी झाल्यामुळे बाजारात फार मोठी घसरण दिसली नाही. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, या आकड्यांवर नजर ठेवून राहणे गरजेचे ठरते. थोडक्यात, 'अपडेट राहा, सुरक्षित राहा…' हा शेअर बाजारातील ट्रेडर्ससाठीचा मूलमंत्र आहे, असं म्हटल्यास वावगं ठरता कामा नये.
सुधीर मोकाशे