भारतातून स्मार्टफोनच्या निर्यातीत वाढ | पुढारी

भारतातून स्मार्टफोनच्या निर्यातीत वाढ

गेल्या आठवड्यात बर्‍याच राजकीय घडामोडींना रंग भरला होता. काही वर्षांपूर्वी कोकणातील ‘नाणार’ येथे हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मदतीने तेलशुद्धीकरण प्रकल्प (पेट्रोल) सुरू करण्याचा ठराव होता. तो काही ना काही कारणाने बारगळला होता. पण आता हा प्रकल्प पर्यायी जागेवर सुरू करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून पुढे आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात हा प्रकल्प हलवण्याची तयारी दाखवल्यानंतर शिवसेनेने पर्यायी जागेचा विचार करण्याची तयारी दाखवली आहे.

कोकणात नुकताच एक तीन दिवसांचा दौरा करताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजापूर तालुक्यातील ‘बारसू’ या गावी हा प्रकल्प असावा, असे ध्वनित केले आहे. तसेच एका नवीन बंदरासाठी नाटे येथील जमीन उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारने तयारी दर्शवली आहे. त्यासाठी ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी घ्याव्या लागतील/जातील, याचाही विचार करण्याबाबत सूतोवाच केले आहे.

काही महिन्यांपूर्वी आधार क्रमांक व पॅन क्रमांक एकमेकांशी संलग्न करण्यासाठी दिलेली मुदत मागील आठवड्यात गुरुवारी 31 मार्च रोजी संपली आहे. आता यापुढे असे संलग्नीकरण करण्यासाठी 1000 रुपयांचे विलंबशुल्क भरावे लागणार आहे.

गेल्या महिन्यात केंद्रातील सरकारी कर्मचार्‍यांना अतिरिक्त महागाईभत्ता वाढवण्यात आला होता. त्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्य सरकारनेही कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केली आहे. या वाढीमुळे केंद्रीय तिजोरीवर वर्षाला 9,544 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या वाढीचा लाभ सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना होईल. राज्यातील सुमारे 18 लाख सरकारी कर्मचारी आणि सहा लाखांहून अधिक सेवानिवृत्तधारकांना तीन टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारमधील वित्त व नियोजनमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. हा वाढीव महागाई भत्ता जुलै 2021 पासून मिळणार आहे.

राज्य सरकारी कर्मचारी-अधिकार्‍यांचा महागाई भत्ता आता 28 वरून 31 टक्के झाला आहे. आता नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2022 पासून सुरू झाले आहे. त्यामध्ये 1 एप्रिल 2022 पासून अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. त्यानुसार जीएसटी, प्रॉव्हिडंड फंड, म्युच्युअल फंड, गुंतवणुकीतील नियमांचा समावेश आहे. या बदलणार्‍या नियमांमुळे नागरिकांना यापुढे दरमहा पोस्टात/बँकेत जावे लागणार नाही. 1 एप्रिल 2022 पासून नवीन होणार्‍या बदलांची माहिती चार्टर्ड अकौंटंट किंवा वित्त सल्लागार यांच्याकडून घ्यावी.

चालू आर्थिक वर्षात 2021-2022 भारतातून होणारी स्मार्टफोनची निर्यात 83 टक्क्यांनी वाढून 5.6 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. रुपयामध्ये हा आकडा 42000 कोटी रुपये इतका होतो. गेल्यावर्षी भारतातून स्मार्टफोनची निर्यात 23000 कोटी रुपये होती. भारतातून आता ठरावीक औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीत अनेक नवीन वस्तूंची भर पडत चालली आहे.

स्मार्टफोन हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. अ‍ॅपल व सॅमसंग यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतातही कारखाने उघडून तिथून मोठ्या प्रमाणावर निर्यात करीत आहेत. यंदा अ‍ॅपलची निर्यात भारतातून 12000 कोटी रुपयांपर्यंत जावी. या निर्यातीमुळे आपल्याला डॉलर्स मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. डॉलर व रुपयाचा विनिमय दर सध्या 1 डॉलरसाठी 76 रुपये असा आहे. सॅमसंग कंपनीची निर्यात भारतातून 20000 कोटी रुपयांपर्यंत व्हावी.

पूर्वी ज्या अनेक वस्तू बाहेरून भारतात आयात कराव्या लागत होत्या, त्यांचे उत्पादन आता भारतातच सुरू झाले आहे. आयफोनची निर्यात चीनमधील अ‍ॅपलच्या कारखान्यातून व्हायची. त्याला आता चांगलाच पायबंद बसला आहे. शुक्रवारी 1 एप्रिल 2022 ला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 58,568 अंकावर होता, तर निफ्टी 17464 अंकांवर स्थिरावला.

डॉ. वसंत पटवर्धन

Back to top button