तीन महिन्यांत एक कोटी नवे गुंतवणूकदार | पुढारी

तीन महिन्यांत एक कोटी नवे गुंतवणूकदार

गेल्या आठवड्यात गुरुवारी 17 मार्चला शेअरबाजार बंद होताना निर्देशांक 57,863 वर बंद झाला; तर निफ्टी 17,287 वर स्थिरावला. जे निवेशक पूर्वी सावधगिरीने पावले टाकत होते. त्यांनी आता मोठ्या शेअर्समध्ये जोखीम वाढवायला हरकत नाही.

कोरोनाची तिसरी लाट आता जवळजवळ ओसरली आहे. रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. डॉक्टर्स व परिचारिका यांच्यावरील ताण कमी होत आहे. मागील दोन वर्षांत पर्यटन हॉटेल, रेस्टॉरंटस्, ढाबे या क्षेत्रांबरोबरच अन्य सेवा क्षेत्रांनाही फटका बसला होता. पण आता लॉकडाऊन पूर्णपणे बंद झाल्यामुळे या सर्व क्षेत्रांतील व्यवहार वाढू लागले आहेत. याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेच्या विकासदरावर होत आहे/होणार आहे.

आरोग्य क्षेत्रातली उलाढाल 2025 सालापर्यंत म्हणजेच पुढील 3 वर्षांत 372 अब्ज डॉलरपर्यंत (1 डॉलरची किंमत सध्या 76 रुपये आहे) जाण्याची शक्यता आहे.

डिजिटल बँकिंग आणि अन्य व्यवहारांची व्याप्ती 2025 सालापर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत जाणार आहे.
2023 अखेरपर्यंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची उलाढालही 8 टक्के वाढून ती 14.3 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 40 वर्षांपूर्वी असे विज्ञापन तंत्रज्ञान अस्तित्वात येईल हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते.

कोरोनाच्या साथीच्या काळात सेवा क्षेत्रातील सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्राला बसला. ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा शब्द याच काळात रूढ झाला. ‘वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टूरिझम’ कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षात सुमारे 4.5 ट्रिलियन डॉलरचे (1 ट्रिलियन म्हणजे 1 या आकड्यावर 12 शून्ये) नुकसान झाले. 6 कोटी लोक बेरोजगार झाले. ही बेरोजगारी कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शर्थीचे प्रयत्न केले. जानेवारी 2021 पासून पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला. देशातील 600 जिल्ह्यांमध्ये 300 पेक्षा जास्त विविध अभ्यासक्रम कौशल्य विकास मंत्रालयातर्फे सुरू करण्यात आले. यातून, पुढील काही वर्षांत आणखी रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल. इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या महत्त्वाच्या क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा पुढील 5 वर्षांत 20 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

भारत सरकारने सेवा क्षेत्राचे महत्त्व ओळखून आरोग्य सेवा, पर्यटन, शिक्षण, अभियांत्रिकी, दळणवळण, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, वित्त आणि व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांत उत्तेजनपर योजना जाहीर केल्या आहेत. दूरसंचार आणि नेटवर्किंग क्षेत्राला मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2021 मध्ये 3345 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.

अर्थ क्षेत्राव्यतिरिक्त राजकीय व सामाजिक क्षेत्रातही गेल्या आठवड्यात मोठ्या बातम्या आल्या. युक्रेन व रशिया युद्धामुळे अडकलेल्या 21 हजार भारतीयांना, ‘ऑपरेशन गंगा’ ही योजना राबवून यशस्वी रितीने बाहेर काढले गेले.
राष्ट्रीयीकृत बँकांना ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र असून, 2021-2022 एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत या सर्व बँकांच्या एकत्रित नफा 48 हजार 874 कोटी रुपये झाला आहे.

मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत 1 कोटी नव्या गुंतवणूकदारांची भर पडली आहे. मुंबई शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य 254 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. मुंबई शेअर बाजारात जवळपास 5000 नोंदणीकृत कंपन्या आहेत. भारत आता केवळ उभरता देश राहिलेला नसून, तो आता पूर्णपणे प्रगत देश झाला आहे. गेल्या वर्षभरात आसाममधील गुंतवणूकदारांच्या संख्येत 286 टक्के, तर देशभरातील एकूण गुंतवणूकदारांच्या संख्येत 58 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत पूर्वेकडील आसाम एक लहानसेच राज्य आहे. एकूण गुंतवणूकदारांपैकी सर्वाधिक गुंतवणूकदार (2.06 कोटी) महाराष्ट्रात आहेत.

विज्ञापन तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणार्‍या ‘केपजेमिनी’ या कंपनीने 60 हजार नव्या कर्मचार्‍यांची भरती करण्याचे ठरवले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही नोकरभरती मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. ‘फाईव्ह-जी’ तंत्रज्ञानावर कंपनी यापुढे जास्त भर देईल. भविष्यात केपजेमिनीच्या कामगिरीत भारताचा मोठा वाटा असेल.

– डॉ. वसंत पटवर्धन

Back to top button