निफ्टी व सेन्सेक्स : अर्थवार्ता

Stock Market
Stock Market
Published on
Updated on

* गत सप्ताहात रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धाच्या पार्श्वभमीवर संपूर्ण जगातील तसेच भारतीय भांडवल बाजाराने मोठ्या प्रमाणात चढउतार अनुभवले. गुरुवारच्या सत्रात सुरुवातीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याची बातमी येताच निफ्टी व सेन्सेक्स पत्त्याप्रमाणे सुमारे 5 टक्क्यांपर्यंत कोसळले. परंतु गुरुवारी मध्यरात्री आमेरिकन तसेच नाटो (युरोपियन देशांची संघटना) यांनी प्रत्यक्ष युद्धात सहभाग न घेता आर्थिक निर्बंधाद्वारे रशियाला उत्तर दिले जाणार असल्याची घोषणा करताच शुक्रवारच्या दिवशी बाजाराने उसळी घेतली. शुक्रवारच्या सत्रात निफ्टी व सेन्सेक्स मध्ये 410.45 अंक व 1328.61 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 16658.4 अंक व 55858.52 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीने एकूण 2.53 टक्के, तर सेन्सेक्सने 2.44 टक्क्यांची वाढ दर्शवली. एकूण सप्ताहाचा विचार करता निफ्टीमध्ये 3.58 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 3.41 टक्क्यांची घट नोंदवली गेली.

* अमेरिका आणि युरोपियन देश यांच्याकडून पुतीन, त्यांचे सहकारी आणि रशियातील वित्त संस्थांवर कडक आर्थिक निर्बंध जारी. सायबर बँक आणि व्हीटीबी बँकेसारख्या रशियामधील सर्वात मोठ्या बँकाशी व्यवहार करण्यावर निर्बंध लादण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली. यासोबत सेमीकंडक्टर, सैन्यदलसंबंधी उत्पादने करणारे उद्योग यांच्याशीदेखील संबंध तोडण्याची घोषणा करण्यात आली. रशियातील धनाढ्य व्यक्तींवर अमेरिकेत आर्थिक व्यवहार करण्यास निर्बंध घालण्यात आले. तसेच त्यापुढे रशियाला रोख्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारात निधी उभा करण्यास मज्जाव केला. इतकेच नव्हे, तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची तसेच रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हरोव्ह यांची युरोपमधील मालमत्तांवर टाच आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

* रशिया आणि युक्रेन यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर खनिज तेलामध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळाले. युद्ध चालू होताच आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रुडने 105 डॉलर्स प्रती बॅरलचा मागील सात वर्षांचा उच्चांकी भावाचा विक्रम मोडला. परंतु अमेरिकेने थेट सैन्यकारवाई टाळल्याचा निर्णय घेताच पुन्हा पूर्वीच्या 96 ते 97 डॉलर्स प्रती बॅरल किमतीपर्यंत खाली आले. अमेरिकेचे डब्ल्यूटीआय क्रुडनेदेखील 91 डॉलर्स प्रती बॅरल किमतीवर बंदभाव दिला.

* राष्ट्रीय शेअरबाजार (एनएसई)चे माजी कामकाज अधिकारी आनंद सुब्रमण्यम यांना सीबीआयद्वारे अटक. 6 मार्चपर्यंत सीबीआय कस्टडी. एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण या पदाचा गैरवापर करत एक्स्चेंजची गोपनीय माहिती एका 'योग्या'ला देत होत्या. तसेच दिल्ली स्थित काही शेअरबाजार दलाल पेढ्यांना (स्टॉक ब्रोकर्सना) ऑनलाईन सर्व्हरद्वारे बाजाराचा डाटा इतरांपेक्षा काही मायक्रो सेकंद आधी मिळवून देऊन पक्षपातीपणा केला गेल्याचा आरोपदेखील त्यांच्यावर करण्यात आला आहे. यासंबंधी एनएसईचे चित्रा रामकृष्ण, रवी नारायण, आनंद सुब्रमण्यम यांच्या विरोधात देश सोडून पळून जाऊ नये म्हणून 'सीबीआय'ने लूकआऊट नोटीस जारी केली होती.

* दूरसंचार क्षेत्रात मोबाईल टॉवरसंबंधी सेवा पुरवणारी इंडस टॉवर या कंपनीमधील 4.7 टक्क्यांचा हिस्सा व्होडाफोन आयडिया कंपनी आपली प्रतिस्पर्धी भारती एअरटेलला विकणार. एकूण 127.1 दशलक्ष समभागांची विक्री केली जाणार. यापूर्वी व्होडाफोनने 63.3 दशलक्ष समभागांची 226.84 रु. किमतीवर विक्री केली आहे. याद्वारे व्होडाफोन-आयडिया कंपनीने 1443 कोटींचा निधी उभा केला. हा उभा केलेला सर्व निधी एजीआर ड्युज (सरकारी करांची थकबाकी) भागवण्यासाठी वापरला जाणार.

* फ्युचर अँड ऑपशन्समध्ये व्यवहार करण्यासाठी लागणारे मार्जिन एकूण किमतीच्या 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय अंमलात आणण्याची तारीख/मुदत बाजारनियामक 'सेबी'ने 2 मे पर्यंत वाढवली. या नव्या नियमांमुळे छोट्या ट्रेडर्सना काही प्रमाणात संरक्षण मिळेल. शेअरबाजारात फ्युचर ऑपशन्समध्ये ट्रेडिंग करताना सर्वसामान्य (रिटेल) ट्रेडर्स 'मार्जिन मनी' कमी भरावा लागत असल्याने मोठी जोखीम घेण्यास प्रवृत्त होतात. यामुळे कधीकधी त्यांचे मोठे नुकसान होते, ते टाळण्यासाठी सेबी नवे नियम लागू करणार.

* 'भारतपे'चे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांची पत्नी माधुरी जैन यांची पदावरून बडतर्फी. कंपनीच्या निधीचा वैयक्तिक कामासाठी गैरवापर केल्याचा आरोप. अश्नीर ग्रोव्हर आणि माधुरी जैन यांनी आरोप फेटाळत कंपनीचे चेअरमन रजनीश कुमार तसेच सहसंस्थापक भाविक कोलाडिया व सीईओ सुहेल समीर यांनी षड्यंत्र रचल्याचा आरोप करत पलटवार केला.

* फरारी विजय मल्ल्या, निरव मोदी आणि मेहुल चोक्सी प्रकरणी एकूण 18 हजार कोटी रुपये बँकांकडे परत आले. केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन 'प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट'अंतर्गत 67 हजार कोटींचे दावे प्रलंबित.

* औषध क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी 'फार्म इझी'च्या 6250 कोटींच्या 'आयपीओ'ला सेबीची मान्यता. 31 मार्च 2022 नुसार कंपनीची विक्री सुमारे 2335.26 कोटी असून, ऑक्टोबर महिन्यानुसार बाजारमूल्य सुमारे 5.6 अब्ज डॉलर्स इतके आहे. स्विगीदेखील पुढील आर्थिक वर्षात 800 दशलक्ष डॉलर्सचा आयपीओ बाजारात आणणार.

* अदानी पॉवरने राजस्थानमधील तीन सरकारी ऊर्जा विपणन पॉवर डिस्ट्रीब्युटस् कंपन्यांविरोधातील केस सर्वोच्च न्यायालयात जिंकली. या कंपन्यांनी कवाई येथील ऊर्जा प्रकल्पाला योग्य तो इंधन पुरवठा केला नाही. त्यामुळे 2013 सालापासूनचे 3048 कोटी तसेच व्याज आणि इतर महागाई लक्षात घेऊ एकूण 4312 कोटी रुपये पुढील चार आठवड्यांत अदानी पॉवरला देण्यात यावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

* गत सप्ताहात युद्धजन्य परिस्थितीमुळे रुपया चलनामध्ये चढउतार पाहावयास मिळाले. युद्धाची घोषणा झालेल्या दिवशी रुपया डॉलरच्या तुलनेत सुमारे 99 पैसे कमजोर होऊन 75.60 रुपये प्रतिडॉलरच्या स्तरावर बंद झाला. परंतु शुक्रवारच्या सत्रात मात्र पुन्हा 34 पैसे मजबूत होऊन अखेर 75.26 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंद झाला.

* 18 फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी 2.762 अब्ज डॉलर्सनी वधारून 632.952 अब्ज डॉलर्स झाली.

* 25 फेब्रुवारीपासून भारतीय भांडवल बाजारात (स्टॉक एक्स्चेंजमध्ये) (ढ+1) मध्ये व्यवहार पूर्ण करणे (सेटलमेंट) शक्य होणार. सध्याच्या नियमानुसार एखाद्या सामान्य गुंतवणूकदाराने आज समभाग (शेअर्स) घेतले, तर पुढील कामकाज चालू असलेल्या दोन दिवसात (वर्किंग डेज)मध्ये त्या गुंतवणूकदाराच्या डिमॅट अकौंटमध्ये ते शेअर्स जमा करणे स्टॉक एक्स्चेंजला बंधनकारक असते. परंतु आता हा कालावधी कमी करून एक दिवसावर आणण्यात आला आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर 100 कंपन्यांच्या समभागासाठी हा नियम लागू झाला आहे. परंतु यापुढे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी 500 कंपन्यांच्या समभागांची भर टाकून या नियमाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. अमेरिकन आणि युरोप यांच्याशी असलेल्या आपल्या वेळेच्या फरकामुळे (टाईम झोन डिफरन्स)मुळे गोंधळ होऊ नये म्हणून या नव्या नियमांची अंमलबजावणी धिम्या गतीने करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news