ब्लडबाथ! रशियाच्या युद्धाच्या घोषणेने शेअर बाजारात हाहाकार, काही मिनिटांत ७.५ लाख कोटींचा चुराडा | पुढारी

ब्लडबाथ! रशियाच्या युद्धाच्या घोषणेने शेअर बाजारात हाहाकार, काही मिनिटांत ७.५ लाख कोटींचा चुराडा

पुढारी ऑनलाईन डेस्क

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज गुरुवारी सकाळी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली. याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारात उमटले. शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) तब्बल २ हजार अंकांनी कोसळला. तर निफ्टी (Nifty) ६०० अंकांनी खाली आला. दरम्यान, ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती २०१४ नंतर प्रथमच प्रतिबॅरल १०० डॉलरवर पोहोचल्या आहेत. बिटकॉईन, इथेरियम. डोगेकॉईन या क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रत्येक ५ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

पुतीन यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात हाहाकार उडाला. सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांना काही मिनिटांत ७.५ लाख कोटींचा (Investors lost) फटका बसला. यामुळे शेअर बाजारातील मागील सत्रातील २५५.६८ लाख कोटींच्या तुलनेत गुंतवणूकदारांची संपत्ती २४८.०९ लाख कोटींवर घसरल्याने बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे (BSE listed) भांडवली मुल्य ७.५९ लाख कोटींनी कमी झाले आहे. टाटा स्टील, भारती एअरटेल, इंडसइंड बँक आणि टेक महिंद्राचे शेअर्स सेन्सेक्सवर सर्वाधिक ३.९६ टक्क्यांपर्यंत घसरले.

रशिया युक्रेनवर लष्करी कारवाई करणार असल्याची घोषणा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी केली आहे. रशियाने डोन्बास प्रांतात लष्करी कारवाई सुरू केल्यामुळे अखेर युद्ध सुरू झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे. पुतीन यांनी इतर देशांना इशारा देताना म्हणाले की, “रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही”. युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत. त्यामुळे ७ वर्षांत पहिल्यांदाच तेलाचे भाव १०० डॉलरवर पोहोचले असल्याचे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.

Back to top button