

सर्वच पालक मंडळी आपल्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी गुंतवणूक करण्याबाबत सजग असतात. बहुतांश मंडळी पाल्याच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा जन्माच्या वेळी भेट म्हणून त्याच्या नावाने म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक सुरू करतात. ही गुंतवणूक 15 ते 20 वर्षांची राहू शकते.
मुलगा किंवा मुलगी जोपर्यंत सज्ञान म्हणजेच त्यांचे वय 18 होत नाही तोपर्यंत सर्व गुंतवणूक पालकांकडून केली जाते. अर्थात लाभ मुलांनाच मिळतो. मुलगा अथवा मुलगी यांच्या वयाची 18 वर्षं पूर्ण होतात तेव्हा म्युच्युअल फंडच्या गुंतवणूक कागदपत्रात अपडेट करणे गरजेचे आहे.
आपल्या खात्याला अल्पवयीन श्रेणीमधून सज्ञानमध्ये बदलण्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. अन्यथा त्या खात्यातील व्यवहार हे गोठवले जाऊ शकतात. म्हणजेच एसआयपी, एसडब्ल्यूपी, एसटीपीची प्रक्रिया काही काळासाठी रद्द होऊ शकते.
सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंड कंपन्यांकडूनच आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी पालक आणि अल्पवयीन मुलांना एक नोटीस जारी करण्यात येते. पालकांना बँक अधिकार्याची स्वाक्षरी, शिक्का, अल्पवयीन मुलाचे हस्ताक्षर आणि त्यास सज्ञान श्रेणीमध्ये परावर्तीत करण्यासाठी अर्ज करावा लागेल. अर्जाबरोबरच अल्पवयीन मुलाचा बँक खाते नोंदणी अर्ज आणि केवायसीदेखील सादर करावा लागेल.
सज्ञान म्हणून नोंदणी झाल्यानंतर खातेदारालाच करसंबंधीच्या जबाबदार्या पार पाडाव्या लागतील. जोपर्यंत एखादा मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन राहते, तोपर्यंत त्या मुलाच्या खात्याच्या संपूर्ण उत्पन्नाचा लाभ हा पालकांच्या उत्पन्नाशी जोडला जातो आणि पालकच पाल्याच्या नावे केलेल्या गुंतवणुकीवर लागू राहणारा कर भरणा करतात. ज्या वर्षात मुलगा सज्ञान होतो, त्याच वर्षांपासून त्या मुलास वेगळा व्यक्ती म्हणून गृहीत धरले जाते आणि तेवढ्या महिन्यांसाठी कर द्यावा लागेल. तो ज्या महिन्यांत सज्ञान होईल, तेव्हापासून कर भरणा करावा लागेल.
जयदीप नार्वेकर