गुंतवणूक करा, पण सावधपणे सल्ला घेऊन

गुंतवणूक करा, पण सावधपणे सल्ला घेऊन
Published on
Updated on

गेल्या आठवड्यात गुरुवारी 17 फेब्रुवारीला शेअर बाजार बंद होताना निर्देशांक 57,892 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 17,304 अंकांवर स्थिरावला.

भारतीय आयुर्विमा महामंडळाची प्राथमिक समभाग विक्री मार्च 2022 महिना संपण्यापूर्वी अपेक्षित आहे. या शेअरच्या विक्रीचा दर वरच्या स्तरावर असणार आहे. तरीही ही विक्री प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे पॉलिसीची विमाधारकांकडून मुदत संपल्यानंतरही मागितली न गेलेली रक्कम 21 हजार 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

विमाधारकांनी स्थलांतर केल्यानंतर जर महामंडळाला विस्मरणाने नवीन पत्ता कळवला नसेल तर किंवा विमाधारक मयत झाला असेल, तर त्याच्या नातेवाईकांनी ही रक्कम क्लेम न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असेल. ही रक्कम गेल्या 10 वर्षांतील आहे. विमा कंपनी ही रक्कम 10 वर्षांपर्यंत स्वत:कडे ठेवते. या 10 वर्षांतील रक्कमा रोख्यात गुंतवल्यास त्यावर एलआयसीला व्याजही मिळते. 10 वर्षांनंतर मात्र ती रक्कम ज्येष्ठ नागरिक निधीत वर्ग केली जाते.

पॉलिसीधारकांनी आपल्या पॉलिसीची रक्कम एक जागरूक गुंतवणूकदार म्हणून आपली पत्नी, मुले किंवा लग्न झाले नसल्यास आई, वडील वा अन्य जवळचे नातेवाईक यांना त्याविषयीची माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे ती रक्कम विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या जवळच्या नातेवाईकांनाच मिळेल व विम्याचा उद्देश सफल होईल.

एप्रिल 2022 – मार्च 2023 या आर्थिक वर्षात आणि त्याच्या पुढच्या काळातही अर्थव्यवस्था सक्षम राहणार आहे. त्यामुळे भारत हा आता विकसनशील देश न राहता विकसित देश म्हणून ओळखला जाईल. 1) कोरोनाचा प्रभाव कमी होत चालल्यामुळे, 2) अर्थसंकल्पात उचललेल्या पावलांमुळे आणि वाढत्या लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी येणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढते उत्पादन आणि बांधकाम क्षेत्राचा अर्थव्यवस्थेला गती मिळण्यात महत्त्वाचा वाटा असेल.

माहिती आणि विज्ञापन तंत्रज्ञान यामुळे तसेच अर्थवय्वस्था 'डिजिटल' होऊ लागल्यामुळे रोजगार वाढणार आहे व कर्मचार्‍यांची संख्या वाढणार असून, 50 लाखांवर जाणार आहे. आघाडीच्या कंपन्यांची नवीन नोकरभरती खालीलप्रमाणे अपेक्षित आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) 2021 साली 40000 होती. ती 2022 साली दुप्पट होईल (80000), इन्फोसिसची नोकरभरती 2021 ला 29000 होती, ती 2022 ला 55000 होईल. विप्रोची नोकरभरती 2021 ला 9000 होती, ती 2022 ला 18000 होईल. तर एचसीएल टेकची नोकरभरती 2021 ला 12000 होती, ती 2022 ला 22000 होण्याची शक्यता आहे. सर्व माहिती आणि विज्ञापन कंपन्यांचा महसूल 200 अब्ज डॉलर्सवर म्हणजे 15 लाख कोटी रुपयांवर होईल. भारतीय आयटी उद्योगाचा महसूल पुढील वर्षी 30 अब्ज डॉलरनी म्हणजेच 2.25 लाख कोटी रुपयांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

पुढील आर्थिक वर्षात आयटी कंपन्यांची निर्यात 17 टक्क्यांनी वाढून 178 अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. अर्थव्यवस्था जरी सक्षम होत असली तरी त्याचबरोबर महागाईचा चटकाही सहन करावा लागणार आहे. पेट्रोल, डिझेल व वीज महागल्याचा हा परिणाम आहे.

सक्षम अर्थव्यवस्थेमुळे शेअर बाजारही सतत सुधारला जाणार आहे. योग्य सल्ला घेऊन गुंतवणूकदारांनी सध्या भरपूर गुंतवणूक करण्याची संधी आहे. मुंबई शेअर बाजारा (बीएसई)मध्ये नोंदणीकृत (listed) कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य (Market Value) गेल्या मंगळवारी 15 फेब्रुवारीला 261.87 लाख कोटी रुपयांवर गेले. सेन्सेक्समध्ये ज्या 30 कंपन्यांचे समभाग आहेत, त्या सर्वांमध्ये लक्षणीय वाढ झाली. त्यात बजाज फायनान्सचे समभाग व बजाज फिनसर्व्हचे समभाग 5 टक्क्यांनी वाढले. हे शेअर्स पुढील भाववाढ लक्षात घेता अजूनही घेण्यासारखे आहेत. त्याच्या खालोखाल 'स्टेट बँक','हार्सन अँड टूब्रो', 'टायटन' इत्यादी कंपन्यांचे समभाग प्रत्येकी 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले.

जानेवारी 2022 महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांना मोठी मागणी होती. चालू महिन्यात (फेबु्रवारी 22) इक्विटी फंडांमध्ये 14 हजार 888 कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. ही माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अ‍ॅम्फी)ने दिली आहे.

सोन्यामध्ये गुंतवणूक करणार्‍यांना ती गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे. आता 10 ग्रॅमला 50,300 च्या आसपास पैसे मोजावे लागतात. सोन्याचे भारतीयांना प्रचंड आकर्षण असल्यामुळे हा कांचनमृग त्यांना सतत मोहात पाडत असतो.

डॉ. वसंत पटवर्धन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news