

विम्याची कागदपत्रे हाती पडल्यानंतरच्या पंधरा दिवसात त्याला त्याचा उतरवलेला चुकीचा विमा रद्द करता येतो. हाती असलेल्या पंधरा दिवसांच्या मुदतीला फ्री लूक पीरियड असे म्हटले जाते. याच मुदतीत फेरविचार करून त्याची पॉलिसी रद्द करता येत असते.
विमा व्यवसाय हा एक वैशिष्ट्यपूर्ण व्यवसाय आहे. विमा उतरवणार्या व्यक्तीला काही वेळा विम्याच्या अटी आणि नियम माहीत नसतानाच त्याचा विमा उतरवला जातो. घाई गडबडीत त्याच्या सह्या घेतल्या जातात आणि एकदा सह्या झाल्या की तो त्या विमा योजनेत अडकतो.
काही वेळा विमा उतरवल्यानंतर त्याला कोणीतरी चांगला सल्ला देतो आणि आपण उतरवलेला विमा चुकीचा आहे किंवा आपल्या परिस्थितीशी तो अनुरूप नाही हे त्याच्या लक्षात यायला लागते.
पण दरम्यान सह्या झालेल्या असतात. पहिला हप्ता भरून झालेला असतो. या सगळ्या गोष्टी एजंटाने घाईगडबडीने केलेल्या असतात. त्यामुळे या अवस्थेत तरी विम्याचा फेरविचार करण्याची सोय नसते. एजंटला आपले उद्दिष्ट साध्य करायचे असते. त्यामुळे तो विमेदाराच्या मागे घाई करत असतो. असे असले तरीही एक हप्ता भरल्यानंतरही विमेदाराला आपल्या विम्याचा फेरविचार करून विमा परत करता येते.
एखाद्या विमेदाराला आपण उतरवलेला विमा आणि त्याच्या अटी आपल्याला पाळता येण्यासारख्या नाहीत असे नंतर लक्षात येते आणि आता वेळ निघून गेलेली आहे, अशी त्याची कल्पना झालेली असते. त्यामुळे तो आता नाइलाजाने हा विमा आपल्याला पूर्ण करावाच लागेल, असे समजून बसतो. असे समजण्याची गरज नाही. विम्याची कागदपत्रे हाती पडल्यानंतरच्या पंधरा दिवसात त्याला विमा रद्द करता येतो. तेव्हा विमा उतरवणार्या कोणाही व्यक्तीने आपल्या हातात विम्याची कागदपत्रे पडल्यानंतर काळजीपूर्वक अटी वाचाव्यात.
या अटी योग्य नाहीत असे वाटले तर तो विमा कंपनीला आपल्याला हा विमा मान्य नाही, असे कळवू शकतो. अशा स्थितीत तो विमा रद्द होऊ शकतो. त्याबद्दल पॉलिसी रद्द करणार्या विमेदाराला कसलाही दंड होत नाही. त्याने जर एखादा हप्ता भरला असेल तर तो हप्तासुद्धा त्याला परत केला जातो.
मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये विम्याच्या पॉलिसीची कागदपत्रे हाती पडल्यापासून पंधरा दिवस ही अट फार महत्त्वाची आहे. म्हणून विमा उतरवताना विम्याची पॉलिसी आपल्या हातात लवकरात लवकर पडेल, असा विचार केला पाहिजे. यासाठी हाती असलेल्या पंधरा दिवसांच्या मुदतीला फ्री लूक पीरियड असे म्हटले जाते. याच मुदतीत फेरविचार करून पॉलिसी रद्द करता येत असते.
आपल्या क्लायंटने असा काही विचार करू नये म्हणून काही विमा एजंट विम्याची पॉलिसी ग्राहकाला लवकर देत नाहीत. तेव्हा विमेदार ग्राहकाने पॉलिसी लवकर मिळण्याचा आग्रह धरला पाहिजे.
अमोल जोशी