बँका, पोलाद आणि तंत्रज्ञान क्षेत्राची भविष्यात चलती | पुढारी

बँका, पोलाद आणि तंत्रज्ञान क्षेत्राची भविष्यात चलती

डॉ. वसंत पटवर्धन

गेल्या आठवड्यात गुरुवारी तारीख 13 ला शेअरबाजार बंद होताना निर्देशांक 61,235 वर बंद झाला तर निफ्टी 18,257 वर स्थिरावला. काही प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती खालीलप्रमाणे होत्या.

हेग 1901 रुपये, जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) 386 रुपये, मन्‍नापूरम फायनान्स 169 रुपये, बजाज फायनान्स 7808 रुपये, फिलिप्स कार्बन 246 रुपये, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन 121 रुपये, जे कुमार इन्फ्रा 171 रुपये, रेप्को होम 265 रुपये, जिंदाल स्टील 413 रुपये, मुथुट फायनान्स 1500 रुपये, केइआय इंडस्ट्रीज 1142 रुपये, लार्सेन अँड ट्रुबो 2018 रुपये, हार्सेन अँड ट्रबो इन्फोटेक 7132 रुपये, भारत पेट्रोलियम 394 रुपये, ग्राफाईट 554 रुपये, हिंदुस्थान पेट्रोलियम 321 रुपये, स्टेट बँक ऑफ इंडिया 511 रुपये, स्टील स्ट्रीप्स 816 रुपये, पीएनबी हाफसिंग 508 रुपये, बजाज फिनसर्व्ह 18,225 रुपये.

जगभरातील अर्थव्यवस्था डगमगत असताना भारतीय अर्थव्यवस्थेने मात्र बाळसे धरले आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार तिच्याकडे जास्त आकर्षित होत आहेत. चालू आर्थिक वर्षांत (2021-22) आतापर्यंत देशात 27.37 अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक (एफडीआय – फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट) झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 16.92 अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली होती.

व्होडाफोन-आयडिया ही दूरसंचार क्षेत्रातील कंपनी आहे. तिच्यात आता केंद्र सरकारची सर्वाधिक भागीदारी असणार आहे. कंपनीवरील कर्जाचे रूपांतर समभागात करण्याचा निर्णय मंगळवारी 11 जानेवारी रोजी संचालक मंडळाने घेतला. त्यामुळे आता स्पेक्ट्रमच्या लिलावाची थकीत रक्‍कम समभागात रूपांतरित करण्यात येणार आहे. ही रक्‍कम कंपनीच्या 35.8 टक्के भागीदारी इतकी आहे. त्यामुळे व्होडाफोन-आयडियामध्ये केंद्र सरकारची एक तृतीयांश भगीदारी असेल.

सर्व बँकांनी नवीन वर्षात आपल्या विविध सेवांसाठी सेवा शुल्कात वाढ करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक इ. 2022-23 चा नफा वाढत्या प्रमाणावर दिसेल. या बँकांच्या शेअर्समध्ये फारशी जोखीम असणार नाही. त्यामुळे इथे थोड्या प्रमाणात तरी गुंतवणूक अवश्य करावी. क्रेडिट कार्डाचा वापर केल्यास 2.5 टक्के शुल्क लागेल. अन्य बँकाही असेच सेवाशुल्क लावतील. अशा तर्‍हेने नफा वाढल्यास अनार्जित कर्जासाठी जास्त तरतूद करू शकतील. बँकांचा नक्‍त नफा सुधारेल.

भारतीय आयुर्विमा महामंडळाची प्राथमिक समभाग विक्री पुढील 3, 4 महिन्यांत येऊ शकते. त्यामुळे 1 फेब्रुवारीला मांडल्या जाणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पात काहीतरी निर्देश असेल. हे समभाग जाहीर होण्याच्या वेळी विदेशी गुंतवणूकदार तिकडे आकर्षित होतील.
अर्थव्यवस्थेत बळकटी आणण्याच्या द‍ृष्टीने 1 फेब्रुवारीला मांडल्या जाणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पात बर्‍याच गोष्टींचा निर्देश असेल. सध्या प्राप्‍तिकरापासून मुक्‍त असलेल्या रकमेची मर्यादा वाढवली जाईल. त्यामुळे कित्येक करदात्यांना दिलासा मिळेल.

काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमी उत्पन्‍न असलेल्या लोकांनीही आपली बँक खाती उघडावीत यासाठी जनधन योजना सुरू केली होती. आता या योजनेतील ठेवी (रक्‍कम) 1॥ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. बँकांना त्याचा खूप फायदा झाला आहे. आता लहान लहान खेड्यांतूनही त्यामुळे बँक खाती उघडली गेली आहेत.

देशात पोलाद आणि स्टेनलेस स्टीलचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. टाटा स्टील, स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (डअखङ), जिंदाल स्टील या कंपन्यांनी आपले उत्पादन सतत वाढते ठेवले आहे. देशात मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या बांधकाम उद्योगांना आणि वाहन उद्योगांना पोलाद, स्टील मोठ्या प्रमाणावर लागते. नागरीकरणामुळे ही दोन्ही क्षेत्रे सतत विस्तारित होत आहेत. हाच ओघ पुढेही चालू राहील.

देशातील महत्त्वाच्या तीन माहिती तंत्रज्ञान व विज्ञापन क्षेत्रातील कंपन्या इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि विप्रो या तिन्ही कंपन्यांचा एकत्रित निव्वळ नफा डिसेंबर 2021 अखेर संपलेल्या तिमाहीसाठी जवळपास 18 हजार कोटी रुपयांचा झाला आहे. या शेअर्सचे भाव शुक्रवारी शेअरबाजार बंद होताना अनुक्रमे 1928 रुपये, 3970 रुपये, 640 रुपये होता. 3, 4 वर्षांपूर्वी कमी भाव असताना या शेअर्सची ज्यांनी खरेदी केली असेल त्यांचे उखळ पांढरे झालेले आहे.

Back to top button