स्कीन : बाळाच्या त्वचेच्या समस्या

स्कीन : बाळाच्या त्वचेच्या समस्या

पुढारी ऑनलाईन : बाळांना त्वचेचे विविध त्रास होत असतात. नाजूक त्वचेवर मोसमी बदलांचाही लगेचच परिणाम होतो. कसे हाताळाव्या या समस्या? नवजात बालके आणि थोडी मोठी बाळे यांच्या त्वचेवर अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो. हे सर्व त्वचाविकार कसे हाताळावे याचा विचार आपण करत असतोच.

क्रेडल कॅप : बाळाच्या टाळूवर काही खरबरीत किंवा ओलसर पॅचेस दिसतात. जन्मानंतर लगेचही ते असू शकतात. अशी त्वचा डोक्याच्या वर, टाळू, डोक्याचा मागचा भाग, कानाच्या पाठीमागे आणि काही वेळा भुवईच्या इथे दिसतो. काही वेळा अगदी छोट्या प्रमाणात असतो, पण त्याचा त्रास होत नाही. ह्या भागाला खाज येत नाही किंवा वेदनाही होत नाहीत त्यामुळे काळजीचे काही कारण नसते. बाळाच्या जन्मानंतरही आईची काही संप्रेरके बाळाच्या रक्‍तात वाहत असू शकतात, ज्यामुळे अशा प्रकारे त्वचेचा त्रास होऊ शकतो.

काय उपाय करावा?

बाळाच्या डोक्याची त्वचा जिथे कडक झाली असेल तिथे हात लावून उचलू नका, कारण काही वेळा त्यातून रक्‍त येऊ शकते, खाज येऊ शकते आणि त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्वचेवर जिथे असा पॅच निर्माण झाला आहे तिथे ऑलिव्ह तेल किंवा इतर कोणतेही बेबी क्रीम लावून ती त्वचा मऊ कशी होईल त्याकडे लक्ष द्या. अंघोळ करताना ही त्वचा मऊ पडेल तर मऊ बेबी ब्रशने ती स्वच्छ करू शकता.
इसब ः बाळांनाही इसबचा त्रास होऊ शकतो. अगदी हलकी खाज येते किंवा अगदी त्वचा विरुप होणे, अस्वस्थता आणि वेदना होणे इतपत त्याचे गांभीर्य असते. इसबचे विविध प्रकार असले तरीही त्यातील अटोपिक हा प्रकार सर्वसाधारणपणे पहायला मिळतो. हा त्रास अनुवांशिकही असू शकतो. ज्यांना अटोपिक प्रकारातील इसब असतो त्यांना इतर संसर्गाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.
उदा. अस्थमा, अ‍ॅलर्जिक र्‍हानायटिस आणि पीत्तज्वर सारखे संसर्ग होऊ शकतात.

कसे टाळावे? : इसब हा त्वचारोग सहजपणे टाळता येतो. विविध संसर्ग, त्वचाक्षोभ कारक इतर काही गोष्टी टाळल्यास इसब घालवता येतो. इसब झालेल्या जागी मॉश्‍चरायझर लावणे आणि काही स्टिरॉईड बेस क्रीम, औषधांच्या मदतीने त्यावर मात करता येते. बाळाच्या त्वचेवर काही पुरळ किंवा तत्सम काही गोष्टी दिसत असतील तर डॉक्टरांची मदत घ्यावी.
जन्मखुणा : जन्माच्या वेळी काही खुणा त्वचेवर असतील तर त्याला 'जन्मखुण' असे म्हटले जाते. ह्या खुणा सर्वसाधारणपणे मोठ्या, काही त्रास न देणार्‍या तसेच काही बाळाच्या वाढीनंतर जाणार्‍या असतात. बर्‍याचदा त्वचेवरील या खुणा न समजणार्‍या असतात. काही वेळा या अनुवांशिक ही असू शकतात.

जन्मखुणांमधील सर्वसाधारण प्रकार

स्टॉर्क बाईट मार्क्स : ह्या खुणा चपट्या गुलाबी रंगाच्या असतात. त्या त्वचेसारख्याच असल्याने त्यात फारसा फरक दिसून येत नाही. या खुणांची त्वचा जाड नसते, त्यांना खाज येणे किंवा वेदना होत नाहीत. या खुणा सर्वसाधारणपणे मान, कपाळ, पापण्या, नाक किंवा ओठांच्यावर दिसून येतात.
स्ट्रॉबेरी मार्क्स : या खुणा गुलाबी रंगाच्या असतात, पण रंग गडद असतो तसेच त्याला गाठी असतात. एक ते चार आठवडे झालेल्या बाळाच्या अंगावर दिसून येतात तसेच जसे बाळ मोठे होते तशा त्या वाढतात. बाळ जेव्हा सहा ते बारा महिन्यांचे होते तेव्हापासून ह्या खुणा वाढत नाहीत तर त्या कमी होऊ लागतात. काही वेळा खुणा मागे राहतात. काही वेळा पूर्णपणे जातात. शक्यतो या खुणांना हात लावून किंवा सतत स्पर्श करणे टाळावेच. जन्मापासून असणार्‍या स्ट्रॉबेरी मार्क्सवर खाजवले तर त्यातून रक्‍त येऊ शकते किंवा पुढे जाऊन त्या खुणांमधून अल्सर होऊ शकतो. अशा वेळी औषधोपचार घेण्याशिवाय पर्याय नसतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news