सिझेरियन आणि किगल एक्सरसाईझ

सिझेरियन आणि किगल एक्सरसाईझ

काही कारणास्तव नैसर्गिक प्रसूतीमध्ये आई वा बाळाला धोका आढळल्यास सिझेरियन द्वारे प्रसूती करावी लागते. प्रसूती कोणत्याही पद्धतीने झाली असली तरी गरोदरपणात वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रसूती पश्चात व्यायाम करावाच लागतो.

नैसर्गिक प्रसूतीनंतर स्त्रियांना पूर्ववत हालचाल करण्यास फार वेळ लागत नाही. परंतु, सिझेरियन नंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी चाळीस ते बेचाळीस दिवसांचा म्हणजेच सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. परंतु, लवकर वजन कमी करण्याची धडपड करू नये. सिझेरियन नंतर कोणताही व्यायाम करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

घ्यावयाची काळजी

सुरुवातीला हळूहळू चालण्याचा व्यायाम करावा. काही दिवस सकाळी, संध्याकाळी पंधरा मिनिटे चालावे. काही दिवसांनी वेळ वाढवावा. चालण्याचा व्यायाम नित्यनियमाने करावा.
प्रसूतीनंतर करावयाची योगासने करावीत. यामुळे पाठीच्या कण्याचे आरोग्य पूर्ववत होते. शिवाय चरबी कमी होण्यास मदत होते. यामध्ये भुजंगासन, सूर्यनमस्कार अशी आसने हळूहळू सुरू करावीत.
प्राणायाम, अनुलोम विलोम करावे.
भरपूर पाणी प्यावे. यामुळे व्यायामाने झालेले डिहाड्रेशन भरून निघते. थकवा दूर होतो.
वजन कमी करण्यासाठी डाएट करू नका. कारण बाळ अंगावर पीत असते. डाएटमुळे दुधावर परिणाम होऊ शकतो. म्हणून आहारात आवश्यक तेवढा बदल करून समतोल आहार घ्यावा.

हे टाळा

डिलिव्हरीनंतर व्यायामाची घाई करू नका.
व्यायामादरम्यान जर पोटात दुखणे वा इतर त्रास होऊ लागल्यास व्यायाम थांबवून डॉक्टरांना दाखवून घ्या.
सिझेरियननंतर लगेचच पोटाचे व्यायाम करणे टाळा. किमान सहा ते बारा आठवडे पोटाचा व्यायाम करू नका.
वजन उचलू नका.
धावण्याचा व्यायाम करू नका.
शरीरावर ताण येईल, असा कोणताच व्यायाम सुरुवातीला करू नये.
सिझेरियननंतर वा स्त्रियांच्या पुढील समस्यांवर उपाय म्हणून किगल एक्सरसाईझचा फायदा होतो.

किगल एक्सरसाईझ

वय वाढले की आरोग्याच्या समस्याही डोके वर काढू लागतात. त्यातील एक समस्या म्हणजे लघवी रोखून ठेवता न येणे. म्हणजे लघवीला लागली असं वाटले की पटकन जाऊन यावे लागते. किंचितही उशीर झाला की लघवी आपोआप सुटते. किंवा स्त्रियांमध्ये अंग बाहेर येणे. स्त्री वा पुरुषांच्या वाढत्या वयानुसार अशा क्रिया अनियंत्रित होऊ लागतात.
शरीरातील नियंत्रित करता येणार्‍या क्रियांवरील नियंत्रण सुटण्याची काही कारणे आहेत.

कारणे

महिलांमध्ये डिलिव्हरी, पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल, शिवाय पोटाची चरबी जास्त असणे.
स्त्रियांमध्ये पेल्वीक फ्लोअरच्या पेशी कमजोर होणे.
वाढते वय.
पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होणे.
मानसिक आजार.
या समस्यांवर किगल एक्सरसाईझचा फायदा होतो. डॉ. अरनॉल्ड किगल या प्रसिद्ध अमेरिकन स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी किगल एक्सरसाईझचा शोध लावला. या शोधामुळे वरील समस्यांसाठी केली जाणारी शस्त्रक्रिया टाळता येणे काही अंशी शक्य झाले. या व्यायामाच्या नित्य अभ्यासाने चांगला फायदा होतो हे आढळून आले आहे.

किगल एक्सरसाईझ कृती

या एक्सरसाईझमध्ये पेल्वीक फ्लोअरच्या पेशींना ताणून धरायचे असते.
जेव्हा लघवी लागते तेव्हा मूत्राशय, योनी, गुद भागांना आत खेचून ठेवणे किंवा टाईट करणे.
जेव्हा हे अवयव टाईट केले असतील तेव्हा स्तन, पोट आणि मांड्या हे अवयव सैल असावेत.
ही एक्सरसाईझ कधीही, कुठेही करता येते.
उभे राहून, बसून, झोपूनदेखील करता येते.

एक्सरसाईझसाठी योग्य वेळ

दिवसाच्या कोणत्याही वेळी करता येते.
लघवी लागली असता करावी.
मांस पेशींत योग्य ताण निर्माण झाल्यावर 5 ते 10 सेकंद व्यायाम करावा. नंतर 5 सेकंद आराम करून पुन्हा कृती करावी.
दिवसभरात 10 ते 15 वेळा ही कृती करावी.

फायदे

पेल्वीक फ्लोअरच्या मांस पेशी मजबूत होतात.
वरील समस्यावर नियंत्रण ठेवता येते.
समस्या नसणार्‍या लोकांनाही याचा फायदा होतो.
आयुर्वेदामध्ये किगल एक्सरसाईझसारखा मूलबंध नावाचा बंध आहे. यामध्येही गुद, योनी आणि मूत्राशयाचे स्नायू ताणून धरले जातात. मूलबंधाच्या नियमित अभ्यासाने पोटाचे आजार बरे होण्यास मदत होते.
शिवाय शरीर हलके होऊन चिरकाल तारुण्य टिकविता येते.
योनी रोग बरे होतात.
पुरुषांच्या धातूंरोगावर उपाय म्हणून मूलबंध करता येतो. मात्र, मूलबंधाचा अभ्यास योगचिकित्सकाच्या सल्ल्याने करावा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news