‘वर्क फ्रॉम होम’मुळे ‘ड’ जीवनसत्त्व ची कमतरता?

‘वर्क फ्रॉम होम’मुळे ‘ड’ जीवनसत्त्व ची कमतरता?
Published on
Updated on

कोरोना विषाणूची लागण होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक जण घरात बसून काम करतोय. लॉकडाऊन दरम्यान तासन्तास घरातच राहिल्याने बहुतांश लोक सूर्यप्रकाशापासून दूर राहिले आहेत. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने सध्या अनेक लोकांमध्ये 'ड' जीवनसत्त्व ची कमतरता असल्याचे दिसून येत आहे.

प्रयोगशाळेत नियमित वैद्यकीय चाचणीसाठी येणार्‍या 10 पैकी 7 तरुणांमध्ये 'ड' जीवनसत्त्वाचा अभाव असल्याचे आढळून येत आहे. म्हणूनच 'ड' जीवनसत्त्व तयार होण्यासाठी आवश्यक सूर्यप्रकाश शरीराला मिळणे गरजेचे आहे. यासाठी पहाटेच्या वेळी अर्धा तास तरी सूर्यप्रकाशात राहणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत.

शरीरातील हाडांचा विकास आणि कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी 'ड' जीवनसत्त्व फार महत्त्वाचे असते. आपल्या आहारात कॅल्शियम शोषण्यासाठी शरीराला 'ड' जीवनसत्त्वाची गरज असते.

परंतु, 'ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे आहारातून कॅल्शियमचे अपुरे शोषण होते. या परिस्थितीत शरीराला हाडांमध्ये साठलेले कॅल्शियम वापरावे लागते. त्यामुळे हाडे कमकुवत होत जातात. याशिवाय शरीरात 'व्हिटॅमीन डी'चा मोठ्या प्रमाणात अभाव असल्यास थोडी देखील दुखापत झाली तरी हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात.

विशेषत: मांडी आणि नितंबांना किरकोळ दुखापत झाल्यास हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात. शरीरात 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता असल्यास तणाव आणि नैराश्य वाढते. यामुळे केसांच्या वाढीवर आणि आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होतो.

जीवनसत्त्व 'ड' शरीराला आवश्यकतेनुसार प्राप्त झाल्यास मेंदूशी संबंधित विकार, हृदयरोग, टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, ऑस्टियोपोरोसिस, हाडांचे फ्रॅक्चर, लठ्ठपणा व कर्करोग यांसारख्या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. 2019 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात, 70 ते 80 टक्के भारतीयांमध्ये जीवनसत्त्व 'ड'ची कमतरता असल्याचं दिसून आले आहे. तर 84 टक्के गर्भवती महिलांमध्ये जीवनसत्त्व 'ड' ची कमी असून याचा परिणाम नवजात बाळांवरही होत असल्याचे समोर आले आहे.

बहुतांश लोकांमध्ये जीवनसत्त्व 'ड' ची कमतरतेची समस्या दिसून येत आहे. त्यातच आता लॉकडाऊनमध्ये लोक घरातच असल्याने त्यांना पुरेशा सूर्यप्रकाश मिळत नाही. अपुर्‍या सूर्यप्रकाशामुळे अनेक लोकांमध्ये जीवनसत्त्व 'ड'ची कमी पाहायला मिळत आहे.

म्हणूनच या कालावधीत घरात राहून शरीराला जीवनसत्त्व 'ड' मिळावा, यासाठी जीवनशैलीत योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहाराचे सेवन करावेत, आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा आणि वजन नियंत्रणात ठेवा.

सूर्यकिरणांद्वारे शरीराला पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व 'ड' मिळते. परंतु, कोव्हिड काळात घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आल्याने अनेक जण सूर्यप्रकाशापासून वंचित राहिले. याचा परिणाम सध्या अनेकांमध्ये जीवनसत्त्व 'ड'ची कमतरता भासू लागली आहे.

या जीवनसत्त्व 'ड'च्या कमतरतेमुळे बर्‍याच लोकांना पाठदुखी, स्नायू आणि हाडांचे दुखणे, थकवा, जळजळ, केस गळणे, दातांची समस्या, नैराश्य आणि त्वचेशी संबंधित तक्रारी जाणवत आहेत. सध्या वैद्यकीय चाचण्यांसाठी येणार्‍या दररोज 10 पैकी 7 लोकांमध्ये जीवनसत्त्व 'ड'ची कमतरता दिसून येत आहे.

शरीरात जीवनसत्त्व 'ड' ची कमतरता तपासून पाहण्यासाठी '25 – हायड्रोक्झिव्हिटामिन डी' ही वैद्यकीय चाचणी केली होती. ही एक साधी रक्ताची चाचणी असून सर्व प्रयोगशाळेत ही चाचणी केली जाते. जीवनसत्त्व 'ड'ची कमी असल्याने स्नायू कमजोर होणे, सांधेदुखी, थकवा जाणवणे आणि नैराश्य येणे ही लक्षणे दिसून येतात.

शरीरातील जीवनसत्त्व 'ड'ची गरज भागविण्यासाठी रोज सकाळच्या कोवळ्या उन्हात दहा ते तीन मिनिटे चालावे, नियमित आहारात जीवनसत्त्व 'ड'युक्त पदार्थांचा समावेश करा. जसे की, मासे, कॉड लिव्हर ऑईल, ताजे लोणी, चीज, मशरूम, अंड्यातील पिवळा भाग, सोयाबीन व दुधजन्य पदार्थ इ. याव्यतिरिक्त शरीरात जीवनसत्त्व 'ड'ची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टर काही सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला देतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news