बद्धकोष्ठता आणि आयुर्वेद

बद्धकोष्ठता आणि आयुर्वेद
Published on
Updated on

बदलणारे धावते जग, कामाचा अनियमितपणा, संपूर्ण आहार-विहारात आलेला अनियमितपणा यामुळे ज्या व्याधींचे प्रमाण कालानुसार वाढत चाललेले आढळत आहे, त्यापैकी एक सार्वत्रिक स्वरूपात आढळणारा म्हणजे 'मलावष्टंभ' यालाच बद्धकोष्ठता, कब्जियत, कॉन्स्टिपेशन ही पर्यायी नावे आहेत.

'माझा कोठा खूप जड आहे. माझी मलप्रवृत्तीची तक्रार फार जुनी आहे. यासारख्या वाक्यांमधून हा लाक्षणिक स्वरूपात दिसणारा व्याधी वर्णन केला जात असतो, तर कधी-कधी डॉक्टर, अमुक एक चूर्ण घेतले की बरे असते ! मी रोज एरंडेल घेतो! हे करूनही डॉक्टर मला सिगारेट, बिडी, मावा, तंबाखू, एनिमा इत्यादींपैकी काहीतरी घ्यावेच लागते, तरच पोट साफ होते. अशाही स्वरूपातले अपायकारक उपाय करणाराही एक वर्ग आहे. अनेकांना ही चूर्ण, एरंडेल, एनिमा, व्यसने यांची एवढी सवय होऊन जाते की नंतर नंतर त्यांचे प्रमाण वाढवावे लागते व एक वेळ हे सर्व करूनही उपयोग होत नाही, अशी अवस्था येते.

कारणे : बद्धकोष्ठता या व्याधीची आहारात्मक आणि विहारात्मक अशी विविध स्वरूपातील कारणे पाहावयास मिळतात. भूक लागलेली नसतानाही केवळ वेळ आली आहे म्हणून जेवणे, भूक लागलेल्या वेळी न जेवणे, सतत भुकेपेक्षा जास्त जेवण करणे, भूक लागलेली असताना वरचे पदार्थ सेवन करणे, जेवणामध्ये श्रीखंड, बासुंदी, स्वीट डिशेस, अंडी, मटण, मासे यांसारखे पचावयास जड असणारे पदार्थ सतत सेवन करणे, आंबवून केलेले पदार्थ, दही, उडपी डिशेस, ब्रेड इत्यादी जास्त सेवन करणे, कडधान्यांच्या उसळी, हिरवी मिरची, फरसाणा मिसळ यांसारखे रूक्ष पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे, पाणी कमी पिणे, बिअर व मद्यप्रकार सेवन करणे, जेवणात तूप, दूध न घेणे, पालेभाज्या न खाणे यांसारख्या आहारातील चुका मलावष्टंभ उत्पन्न करण्यास मदत करतात.

वर्तणुकीपैकी दिवसा झोपणे, रात्री अतिप्रमाणात जागरण, जास्त प्रमाणात कष्टाची कामे करणे, अजिबातच व्यायाम न करणे, अधिक प्रवास करणे, कामातील व्यग्रतेमुळे मलप्रवृत्तीची संवेदना टाळणे, जास्त प्रमाणात मैथुन करणे, भय, काळजी, चिंता मानसिक त्रास या सर्व गोष्टींमुळे मलावष्टंभ वाढत असतो. मलप्रवृत्ती होण्यासाठी आहारामध्ये पुरेसा पचनक्षम भसरटपणा (रफेज), स्निग्धांश असणे. या जोडीलाच आतड्यांची हालचालदेखील प्राकृतपणे होणे गरजेचे असते. या गोष्टींपैकी वरील कारणांच्या परिणामी, एकाची जरी कमतरता भासली तरी मलावष्टंभ उत्पन्न होतो.

पूर्वलक्षणे : पोट जड वाटणे, पोट फुगून राहणे, मलप्रवृत्ती साफ न होणे, भूक कमी होणे, जास्त प्रमाणात दुर्गंधीत गॅसेस सुटणे यांसारखी लक्षणे पहिल्या काळात काही दिवसांपर्यंत जाणवत राहतात. याचवेळी वैद्यांच्या सल्ल्याने उपचार, आहाराबदल केल्यास मलावष्टंभ टाळता येऊ शकतो. पूर्वलक्षणे जास्त तीव्रपणे जाणवतात व त्याच्याच जोडीला मळमळ, पोट दुखणे, जळजळणे, आबंट ढेकर, डोके दुखणे, झोप न येणे, जास्त स्वप्ने पडणे, कशातही उत्साह न वाटणे, अतिआळस येणे, स्वभाव त्रासिक होणे, मलाचे स्वरूप कठीण, रूक्ष असणे अशी लक्षणे आढळतात.

पोटात अधिक गॅसेस होणे व त्यामुळे पोटदुखी, कंबरदुखी व छातीत दुखल्यासारखे होणे, अशी लक्षणे आढळतात. अशा रुग्णास ज्या वेळी मलप्रवृत्तीला साफ होईल, त्यावेळी ही सर्व लक्षणे नाहीशी होत असतात. वरील लक्षणांकडे दुर्लक्ष करून अपथ्य सेवन चालू राहिल्यास यातूनच मूळव्याध, परिकर्तिका (फिशर), हर्निया, कंबरदुखी, विविध वातविकार यांसारख्या भयंकर व्याधींबरोबर निद्रानाशदेखील उद्भवलेला आढळतो.

औषधे : कमी झालेल्या पचनशक्तीच्या वर्धनासाठी हिंग्वाष्टक चूर्ण, लवणभास्कर चूर्ण, वडवानल चूर्ण योग्य प्रमाणात पंचासव, अभयारिष्ट घेतल्यास चांगला उपयोग होतो. याच्याच जोडीला द्राक्षा, आरंग्वध, हरितकी, एरंडेल तेल, इसबगोल, अहाळीव, निशोत्तर, यामधील योग्य औषधीचा वापर वैद्य सल्ल्याने काही काळ केल्यास उत्तम फायदा होतो.

सुवर्णभस्म, अभ्रकभस्म, वंगभस्म, नागभस्म इत्यादींच्या वापराने पचन अवयवांची ताकद वाढविता येते. काही वेळा अमिबियासीसमुळे बद्धकोष्ठता असते. अशा वेळी अल्प प्रमाणात कुटज पर्पटी वा कुटजारिष्ट यांचा उत्तम उपयोग होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news