पोटाच्या आरोग्यासाठी प्रोबायोटिक

पोटाच्या आरोग्यासाठी प्रोबायोटिक
Published on
Updated on

पोट चांगले राहणे हे पचनावर अवलंबून असते. त्यासाठी पचनयोग्य जीवाणूंची गरज असते. पोटातील जीवाणूंवर शरीराचे कार्य अवलंबून असते. प्रोबायोटिक्स (Probiotics) योग्य प्रमाणात सेवन केल्यास पोटात मायक्रोऑरगानिझम्स निर्माण करतात. त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहाते.

माणूस हा माणूस कमी आणि जीवाणूच अधिक आहे, असे म्हटले तर वेड लागले आहे का, असाच प्रश्न मनात येईल ना! पण आपल्या शरीरातील डीएनएमध्ये पोटातील जीवाणूंचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तांत्रिकद़ृष्ट्या माणूस 'माणूस' कमी आणि 'जीवाणू'च जास्त आहे. शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासाठी अन्नाचे विघटन करणे, जीवनसत्त्वांची निर्मिती तसेच इतर जीवाणूंपासून शरीराचे रक्षण करून मानवाला जिवंत ठेवणे आणि व्यक्तीची मनोवस्था चांगली राखणे या सर्व गोष्टींमध्ये पोटातील या जीवाणूंचाच वाटा आहे.

एखादी व्यक्ती प्रतिकार क्षमता अशक्त झाली तर पटकन आजारी पडू शकते. प्रतिकार क्षमता कमी होण्यासाठी आपल्या काही सवयी कारणीभूत ठरतात. पोटातील जीवाणूंचे संतुलन ढळले की पचनक्षमता खालावते. अतिगोड खाणे, प्रतिजैविके, मद्यपान करणे, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि अपुरी झोप हे सर्व पोटातील जीवाणूंच्या संतुलनावर परिणाम करत असते. त्यासाठी प्रोबायोटिक्सचे योग्य प्रमाणात सेवन झाले पाहिजे आणि त्यासाठी काही नैसर्गिक पदार्थांविषयी आपण जाणून घेऊया. (Probiotics)

लोणचे : लोणचे हा प्रोबायोटिक्सचा उत्तम स्रोत मानला जातो. उदा. काकडी चिरून त्यात मीठ पाणी घालून ते आंबट होण्यासाठी ठेवले की काकडीतील लॅक्टीक अ‍ॅसिडचे जीवाणू ती प्रक्रिया करतात. व्हिनेगर घालून लोणचे तयार केले असेल तर मात्र त्यात प्रोबायोटिक्स नसते. पण पारंपरिक पद्धतीने केलेल्या लोणच्यांमधून प्रोबोयोटिक्स अवश्य मिळते. तसेच त्यातून के जीवनसत्त्व मिळते. शिवाय उष्मांकाचे प्रमाण कमी असते. अर्थात अतितेल असलेल्या लोणच्यांपासून दूरच रहावे. भाज्या, कैरी यांचे जे पारंपरिक लोणचे मुरवले जाते त्यात प्रोबायोटिक्सचे प्रमाण भरपूर असते. लोणची घरच्या घरी सहज बनवता येतात. तसेच दुकानातही मिळतात. दुकानातील लोणच्यांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह टाकले असतील तर त्यात नैसर्गिक एन्झाईम्स नसण्याची शक्यता असते. कारण तयार करण्याच्या प्रक्रियेत हे एन्झाईम्स नष्ट होतात. आंबवलेल्या भाज्यांमधूनही प्रोबायोटिक्स मिळते. त्यासाठी भाज्या मीठ, तेल आणि पाणी यात आंबवाव्यात.

सोया मिल्क : सोयाबिनचे दूध हा देखील एक नैसर्गिक स्रोत आहे. भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्स त्यातून मिळतात. सोया मिल्क हे अत्यंत पोषक पेय आहे. बाजारात जे तयार सोया मिल्क मिळते त्यात लाईव्ह कल्चर अधिक प्रमाणात घातलेले असतात. सोया मिल्क हे प्रथिनयुक्त असते पण लॅक्टोज फ्री असते. त्यामुळे ज्या व्यक्तींना लॅक्टोजची अ‍ॅलर्जी आहे त्यांच्यासाठी सोया मिल्क हे उत्तम प्रोबायोटिक्सचा स्रोत आहे. (Probiotics)

दही : प्रोबायोटिक्स मिळण्यासाठी दही हा सर्वमान्य स्रोत आहे. हल्ली दह्याच्या म्हणजेच योगर्टचे अनेकविध प्रकार मिळतात. फ्लेवर्ड योगर्ट ही जेवणानंतरची स्वीट डिश म्हणून खाल्ली जाते, पण बाजारात मिळणार्‍या विविध स्वादांच्या योगर्टमध्ये खूप अधिक प्रमाणात साखर असते त्यामुळे हे दही किंवा योगर्ट सतत खाणे शक्य नाही. त्यामुळे नैसर्गिकपणे पारंपरिक पद्धतीने लावलेले दही खाणेच योग्य. अर्थात साधे दही विकत घेतानाही त्यावरील घटक पदार्थ कोणते ते वाचून खात्री करून घ्या. जर त्या पाकिटावर काहीही लिहिले नसेल तर कदाचित हे दही विरजण्याच्या प्रक्रियेते हे चांगले किटाणू नष्ट झाले असू शकतात.

ग्रीन ऑलिव्हज : मीठाच्या पाण्यातले ऑलिव्हज नैसर्गिकरित्या आंबवले जातात. ऑलिव्हजमध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते. त्यामुळे नैसर्गिक प्रोबायोटिक मिळण्यास नक्कीच मदत होते. ऑलिव्हमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे लाईव्ह कल्चर असतात. अन्न घशाशी येणे आणि आतड्यांमध्ये वेदना होणे, जुलाब किंवा बद्धकोष्ठता या त्रासांमध्ये हे लाईव्ह कल्चर उपयुक्त ठरतात.

डॉ. सुनीलकुमार जाधव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news